संपत्तीची निर्मिती; पी.व्ही. सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत (भाग२ )

मेडिकल इन्शुरन्स ही माझ्या दृष्टीने अतिशय विरोधाभास असलेली अत्यंत हास्यास्पद संकल्पना आहे.
संपत्तीची निर्मिती; पी.व्ही. सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत (भाग२ )

पीव्ही. सुब्रमण्यम हे भारतातील अग्रगण्य प्रशिक्षक असून त्यांनी आर्थिक नियोजन या विषयावर पुस्तकेही लिहिली आहेत. २३ ऑगस्ट रोजी एका वेबिनारमध्ये त्यांनी दिलेल्या मुलाखतीच्या वृत्तांताचा हा दुसरा भाग.

इन्शुरन्स नक्की किती रकमेचा असावा?

माझ्या दृष्टीने प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तो कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणारा असावा. मेडिकल इन्शुरन्स ही माझ्या दृष्टीने अतिशय विरोधाभास असलेली अत्यंत हास्यास्पद संकल्पना आहे. ज्याला जरुरी नाही त्याला तो सहज मिळतो आणि ज्याला खरोखरच जरुरी आहे तो त्याच्या आवाक्यातील नसतो. ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत त्याच्या दृष्टीने यासाठी केला जाणारा खर्च तुलनेने किरकोळ असतो तर ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्याच्या दृष्टीने काही खर्च करायची वेळ आली तर तो आपली मोठी कमाई हरवून बसतो. ज्यांच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत त्याला ३० लाख हॉस्पिटल बिल ही किरकोळ गोष्ट असते पण ज्यांच्याकडे २ कोटी रुपये आहेत त्याला हेच तीस लाख खूप जास्त वाटतील तर अनेकांच्या दृष्टीने ही न परवडणारी रक्कम होईल. तेव्हा आपण जितका हप्ता सहज भरू शकतो तेवढे टॉपअपसह किमान कव्हर असावे. सरसकट सर्वांसाठी निश्चित रक्कम ठरवणे कठीण आहे. जरी तुमच्याकडे तुमच्या मालकाने दिलेला आरोग्यविमा असला तरी स्वतःचा विमा असणे जरुरीचे आहे.

राखीव निधी म्हणून किती रक्कम असावी आणि ती कुठे ठेवावी.

 याचंही उत्तर व्यक्तीनुसार बदलेल. ही गरज नेमकी किती असेल याचा तुम्हीच अंदाज घेऊ शकता. तेवढी रक्कम तुम्ही रोखीने घरात, सेव्हिंग खात्यात, मुदत ठेवीत विभागून ठेऊ शकता. पैशाच काम पैसाच करू शकतो, तुम्हाला तुमची मुले किंवा आईवडील यांच्याकडून आणीबाणीच्या प्रसंगी पैसे मिळू शकतील याची खात्री असेल तर तुमच्याकडे स्वताकडे पैसे नसतील तर चालू शकतं. या सर्व शक्यता तपासून पहा. म्युच्युअल फंडाच्या लिक्विड फंडात पैसे ठेवण्याचा अनेकजण सल्ला देतात पण हे पैसे मिळण्यास १ ते ३ दिवसाचा कालावधी लागू शकतो हे समजून घ्या. अशाच व्यक्ती किंवा नातेवाईक यांच्यावर विश्वास ठेवा जे तुम्हाला नक्की उपयोगी पडू शकतील. नाहीतर तुम्हाला जेव्हा पैसे हवे असतील तेव्हा हे लोक वेगवेगळी कारणे पुढे करतील. असे लोक कोण हे अनुभवाने तुमच्या लक्षात आले असेलच किंवा मोठ्या रकमेचे लिमिट असलेल्या क्रेडिट कार्डनेही ही गरज भागू शकते. त्याचा वापर आपले मित्र नातेवाईक यांच्यासाठीही अडीअडचणीसाठी करता येईल.

गुंतवणूक काढून घेता येईल असे कोणते सहज गुंतवणूक पर्याय आपण सांगू शकाल?

 सर्वच गुंतवणूक सहज काढता यावी अशी नसावी, नाहीतर त्यातून सुयोग्य परतावा मिळणार नाही. तेव्हा आपली गरज ओळखून तेवढीच रक्कम सहज मिळेल अशी ठेवावी. ही गरज व्यक्तीनुसार वेगवेगळी असू शकते. सहज परत मिळणाऱ्या गुंतवणुकीतून फारसा परतावा मिळू शकत नाही हे सत्य आहे.

आपण वेगवेगळे उत्पनाचे मार्ग कसे निर्माण करू शकतो.

 याचा संबंध आपल्या रोखता प्रवाहाशी आहे जर तुम्ही उत्पन्न मिळवत असाल तर भविष्याचा विचार संपत्ती निर्माण करूनच त्याद्वारे वेगवेगळे उत्पनाचे मार्ग निर्माण होऊ शकता. संपत्ती ही शेअर्समधून निर्माण होऊ शकेल त्यातून तुम्हाला कदाचित फारसा डिव्हिडंड मिळणार नाही पण त्यातून भविष्यात मूल्यवृद्धी झालेली दिसून येईल. याशिवाय एसआयपी करून त्यात वाढ करूनही आपल्या संपत्तीचे मूल्य वाढू शकेल काही कारणाने एसआयपी करणे जड जात असेल तर स्थगित करा पण पैसे काढून घ्यायचा विचारसुद्धा मनात आणू नका जमेल तशी त्यात वाढ करा तरच दीर्घकाळात संपत्तीत आणि त्यामुळे उत्पन्नातही वाढ होईल.

 शेअरबाजार अशाश्वत आहे म्हणून लोक त्याकडे पाठ फिरवतात त्यांनी प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष बाजारात यावे म्हणून काय प्रयत्न करायला हवेत.

 अशाश्वतीच्या भीतीने तुम्ही बाजारापासून लांब रहात असाल तर महागाईवर मात करणारा परतावा आपण कधीच मिळवू शकणार नाहीत. तुम्हाला आयुष्यभर कष्टच करावे लागतील. तुम्ही कधीही निवृत्तीचा विचार करू शकणार नाही. पारंपारिक गुंतवणूक तुम्हाला जोखिमरहित परतावा देईल पण त्यातून तुमच्या संपत्तीत वाढ होणार नाही. तुमच्याकडे प्रचंड पैसा असेल तर तुम्हाला ही चैन परवडेल अन्यथा बचत करून जमा झालेल्या पैशातून गुंतवणूक करावी लागेल अशी जोखीम घ्यावीच लागेल.

 पूर्वी राजेशाही होती तेव्हा राजवाडा, अंतःपुर, सैन्य, खजिना राजाकडे असायचा. यात बदल झाल्यावर गावातील एखाद-दुसऱ्या श्रीमंत व्यक्तीकडे या गोष्टी असायच्या. अनेकांना त्याचे आकर्षण वाटायचं. याच अनुकरणातून चैनीच्या गोष्टी आपल्याकडे आहेत म्हणजे आपण श्रीमंत झालो अशी भ्रामक कल्पना अनेकांच्या मनात रुजली आहे. आज जगात श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक व्यक्ती अत्यंत साधेपणाने रहातात हे लक्षात घ्या. वास्तविक ते इतकं कमावत आहेत की त्याच्या दृष्टीने आपण ज्याला चैन समजतो, ती करणं ही अगदीच क्षुल्लक बाब आहे.

बाजारात तुम्ही गुंतवणूक करणार तर कशी करणार, स्वतः करणार की कुणाची मदत घेणार, प्रत्यक्ष करणार की अप्रत्यक्षपणे करणार यात बदल होऊ शकतो पण संपत्तीत वाढ करायची असल्यास अशी गुंतवणूक तुम्ही टाळू शकत नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in