- प्रा. मुक्ता पुरंदरे
महिलायन
बलात्कारासारखा अत्याचार झालेल्या महिलांना आजही समाजात सन्मानाची वागणूक मिळत नाही. तिच्यावर झालेल्या अत्याचारासाठी समाज तिलाच दोषी ठरवतो. कुटुंबात तिच्यावरच बंधनं घातली जातात. तिचे स्त्रीत्व, तिच्या शरीराचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी तिचीच मानली जाते. माझा काय गुन्हा, हा प्रश्न प्रत्येक अत्याचारित स्त्री विचारत असते. म्हणूनच पावित्र्याच्या संकल्पनांच्या पलीकडे जात अत्याचारित मुलीला-महिलेला अत्याचारानंतर सन्मानाने जगण्याची संधी मिळाली पाहिजे. शरीरावरील अत्याचाराला एक अपघात मानले पाहिजे. असा दिन जेव्हा येईल, तो दिवसच खऱ्या अर्थाने महिला दिन असेल. अशा निकोप, समतावादी समाजात महिला दिन साजरा करण्याची गरजही राहणार नाही.
आठ मार्चच्या महिला दिनाच्या निमित्ताने समाजात महिलांना मिळणारे दुय्यम स्थान, पुरुषांप्रमाणेच आणि त्यांच्याइतकेच काम केले तरी मिळणारे कमी वेतन, रोजगाराच्या कमी संधी, अपत्यजन्मानंतर कारकिर्द नव्याने सुरू करताना येणाऱ्या अडचणी, घरातील पुरुषांच्या व्यसनाधिनतेमुळे उद्भवणारी दयनीय अवस्था, मुलांसंबंधीच्या गुंतागुंतीच्या प्रश्नांमुळे होणारी दशा या आणि अशा अनेक प्रश्नांचा उहापोह होईल. ते स्वाभाविकही आहे. कारण इतके वर्षे सातत्याने यावर बोलले जात असले तरी परिस्थिती ‘जैसे थे’ आहे हे नाकारुन चालणार नाही. आजच्या आधुनिक युगात आणि जगात नवी ओळख मिळवणाऱ्या आपल्या देशात महिलाविषयक प्रश्नांचे प्रमाण ना कमी झाले आहे, ना त्यांच्या जगण्यामध्ये आमूलाग्र बदल घडून आला आहे. ठराविक वर्ग वगळला तर सर्वसामान्य स्त्री पूर्वीच्याच पद्धतीने कौटुंबिक हिंसाचार, मुलांचे पालनपोषण, वृद्धांची जपणूक या चक्रात अडकली आहे. खेरीज आता अर्थार्जनाच्या हेतूनेही कुटुंब तिच्याकडे पाहते. त्यामुळेच घरातील जबाबदारीबरोबरच घराबाहेरील कारकिर्दीचे ओझे वागवत तिची तारेवरची कसरत आणखी कठीण झाल्याचेही दिसून येते. म्हणूनच महिलांनी रुढ चौकट ओलांडून दुसऱ्यांचा विचार करतानाच आधी स्वत:चा विचार करणेही गरजेचे आहे. हे झाले तर खऱ्या अर्थाने ‘महिला दिन’ साजरा झाला असे म्हणता येईल. अन्यथा, असे कितीही महिला दिन साजरे झाले तरी महिला दीनच राहतील.
आजही जगात स्त्रियांवरील अत्याचार ही सार्वत्रिक गोष्ट आहे. तथापि, आपल्याकडे लोकसंख्येमुळे आणि व्यामिश्रतेमुळे या अत्याचारांचे स्वरूप अधिक भयावह बनते. बदलत्या काळानुसार माहिती तंत्रज्ञानाच्या युगातदेखील स्त्रियांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे. कोणतीही स्त्री बलात्कारासारख्या आघाताने पूर्णपणे खचते. एखाद्या अनोळखी व्यक्तीने बलात्कार करणे वा एखाद्या नातेवाईकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणे यामागे पुरुषीसत्तेचा अहम् असतो. तो विकृतीचा एक वेगळा प्रकार आहे. आज कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचारही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. मात्र असे असले तरी अशा नराधमांना, लिंगपिसाट लोकांना कठोर शिक्षा करणाऱ्या कायद्यांविषयी महिला अनभिज्ञ आहेत. माहिती असली तरी कायद्याची मदत घेण्यामध्ये अनेक अडथळे येतात. यामुळेच गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण कमी आहे.
काहीजण बलात्कारासारख्या घटनेला अपघात मानण्याचे सूचवतात. मात्र एखादा अपघात झालेली मुलगी आणि बलात्कार झालेली मुलगी यामध्ये शारीरिक दुखापतीचा भाग सारखाच असला तरी बलात्कारित मुलीच्या मनावरची जखम खूप तीव्र असते. आपले स्त्रीत्व जपले पाहिजे, असे संस्कार लहानपणापासून मुलींवर झालेले असतात. मुलींना स्त्रीत्वाची जाणीव करून देणे मुळीच चुकीचे नाही. पण केवळ आपले शरीर म्हणजे आपले संपूर्ण स्त्रीत्व असा समज या जाणीवेतून निर्माण होत असेल तर अन्यायपीडित स्त्रियांना, मुलींना सर्वस्व हिरावल्याची कटू जाणीव होते. अशा परिस्थितीत अत्याचारपीडित मुलीच्या मनातून पावित्र्य गमावल्याची भावना काढून टाकून ‘हे दु:ख विसरून तू पूर्वीप्रमाणेच सन्मानाने जगू शकतेस’ असा विश्वास तिला देणे गरजेचे आहे. ही अशी सकारात्मक परिस्थिती निर्माण होईल तेव्हाच खरे तर रोजचा दिवस महिला दिन असेल.
अत्याचारग्रस्त, भयग्रस्त मुलींची-महिलांची मानसिक अवस्था भेदरलेली असते. समाजात वावरताना तिला सतत मान खाली घालून लोकांचे टोमणे ऐकावे लागतात. पण अशाही परिस्थितीत डगमगून न जाता अन्यायातून सावरण्यासाठी तिने स्वत: प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्रासदायक घटना मागे टाकत खंबीरपणे उभे राहणे आणि भविष्याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. आपल्या विचारात एकदम बदल करून त्याची अंमलबजावणी करणे अवघड आहे हे मान्य. आतापर्यंतच्या संस्कारातून किंवा परंपरेतून निर्माण झालेली मानसिकता बदलताना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. एखादी अन्यायपीडित तरुणी काही दिवसातच समाजात पूर्वीप्रमाणे वावरू लागली किंवा आपल्या नेहमीच्या कामांना तिने सुरळीतपणे सुरूवात केली तर समाजाची दूषणे निश्चितपणे सहन करावी लागतात. पण अशा परिस्थितीत ‘माझा गुन्हा काय’ अशी भूमिका घेऊन आयुष्याची सुरुवात नव्याने करण्यातच शहाणपणा आहे. कारण आयुष्य संपवून प्रश्न संपत नसतात. या प्रश्नांना, समस्यांना धाडसाने सामोरे जाणे हेच त्यावरचे उत्तर असते.
प्रत्येकाच्या जडणघडणीत कुटुंब संस्था मोलाची कामगिरी बजावते. पण अलीकडच्या काळात ही संस्थाच विस्कळीत होत आहे. या ना त्या कारणाने कुटुंबात संवाद कमी होत आहे. यामुळे सदस्य आपल्या समस्या आणि प्रश्न मोकळेपणाने मांडत नाहीत. अजूनही चर्चा करून, एकमेकांना समजून घेण्याची लोकशाहीवादी संस्कृती आपल्या कुटुंबव्यवस्थेत फारशी विकसित झालेली नाही. मुली आणि महिलांवर पुरुषप्रधान कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचा, आई-वडिलांचा धाक असतो. यामुळे आपल्या प्रश्नांविषयी आई-वडिलांबरोबर,जोडीदाराबरोबर त्या मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. उदा. एखाद्या कॉलेज युवतीला काही तरुणांकडून त्रास होत असला तरी हा प्रश्न आपल्या पालकांना सांगण्याचे धाडस तिच्यामध्ये नसते. तर कधी आपलीच मुलगी अधिक मोकळेपणाने वागते, मित्रांबरोबर फिरते म्हणून अशा प्रश्नावर चर्चा करणाऱ्या मुलीला पालकांकडूनच दटावणी मिळते आणि तिच्यावर अनेक प्रकारची बंधने घातली जातात.
एकूणच, समाज काय म्हणेल या आवरणाखाली सगळे प्रश्न झाकून ठेवण्याची वृत्ती कुटुंबांमध्ये असते. आजही अशा प्रश्नांना धाडसाने सामोरे जाण्याची हिंमत दाखवली जात नाही. थोड्या फार फरकाने अन्यायपीडित स्त्रीच्या बाबतीत असेच घडते. समाजात बेअब्रू होण्याच्या भीतीपोटी अशा स्त्रीच्या स्वातंत्र्यावरच बंधने घातली जातात. या अपघाताला ती स्त्रीच कारणीभूत असल्याच्या भावनेतून कुटुंबियांकडून सतत टोचून बोलले जाते. खरे तर अशा परिस्थितीत कुटुंब तिचा आधारस्तंभ ठरायला हवा. पण तसे कमी वेळा बघायला मिळते. त्यामुळेच कुटुंबातील सदस्यांनी अशा स्त्रीची मानसिकता लक्षात घेतली पाहिजे. तिचे मानसिक खच्चीकरण थांबवणे आणि समाजात सन्मानाने उभे करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. शेजारी किंवा समाजाकडून अवहेलना सहन करावी लागू नये म्हणून अशा स्त्रीची विशेष काळजी घेण्याची गरज आता तरी लक्षात घ्यायला हवी. यासाठी काही दिवस तिला जवळच्या व्यक्तींबरोबर दुसऱ्या नवीन ठिकाणी ठेवले तर वातावरणातील बदलामुळे दु:ख हलके होऊ शकते.
अन्यायपीडित स्त्रियांकडे बघण्याची समाजाची ही नजर अधिक भयानक आणि तितकीच विकृत म्हणावी अशी आहे. यामुळे स्त्रियांच्या मनावर अन्यायाची खोलवर जखम होते आणि ती भरून काढणेदेखील अवघड होऊन बसते. हे टाळण्यासाठी पुरुषांमध्ये जागृती आणण्याची मोठी गरज आहे. याची सुरूवात मुलांच्या संगोपनापासूनच व्हायला हवी. महिला प्रश्नांची तीव्रता आणि संख्या कमी करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. महिला आणि पुरुष असे दोघेही महिलांची काळजी घेतील, त्यांच्या भावनांशी समरस होतील आणि समाजातील एक सन्मान्य घटक म्हणून वागणूक देतील तेव्हाच खऱ्या अर्थाने महिला दिनाचे साजरीकरण ही केवळ नाममात्र घटना ठरेल. तो दिवस लवकरात लवकर येवो हीच इच्छा.