नितीशकुमार यांनी काय साधला ?

बिहारमधल्या सत्ताधारी संयुक्त जनता दल आणि भाजपमध्ये गेल्या वर्षापासून विस्तव जात नव्हता.
नितीशकुमार यांनी काय साधला ?

महाराष्ट्रात शिवसेनेच्या बंडखोरांना हाताशी धरून उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यात भाजपला यश आलं. त्यासाठी काही व्यक्ती आणि यंत्रणांना हाताशी धरण्यात आलं, तसंच बिहारमध्ये करण्याचा भाजपचा प्रयत्न होता; परंतु संयुक्त जनता दल पक्षावर नितीशकुमार यांची पकड होती. त्यामुळेच त्यांनी भाजपलाच कात्रजचा घाट दाखवला. या बंडाचा परिणाम लोकसभेच्या २०२४च्या निवडणुकीवर होणं अपरिहार्य आहे.

बिहारमधल्या सत्ताधारी संयुक्त जनता दल आणि भाजपमध्ये गेल्या वर्षापासून विस्तव जात नव्हता. नवीन नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय सुरक्षितता आणि बिहारला विशेष राज्याचा दर्जा या मुद्द्यांवरून भाजप आणि संयुक्त जनता दलात वाद सुरू होते. त्यातच आरसीपी सिंह या भाजपशी जवळीक असणाऱ्या आपल्या नेत्याला संयुक्त जनता दलाने मंत्रिमंडळातून वगळलं. याच सिंह यांना भाजपने हैदराबादच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला नेलं. सिंह यांना बिहारचा एकनाथ शिंदे करण्याचा भाजपचा प्रयत्न होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने लोकजनशक्क्ती पक्षाला हाताशी धरून संयुक्त जनता दलाच्या जागा कमी केल्या. संयुक्त जनता दलाला मुख्यमंत्रिपद देताना भाजपने महत्त्वाची खाती स्वतःकडे घेतली. शिवाय नितीशकुमार यांची कायम या ना त्या कारणाने कोंडी केली. आता तर गृहमंत्री अमित शहा संयुक्त जनता दलाला संपवायला निघाले होते. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या वेळीही संयुक्त जनता दल आणि भाजपचं वाजलं. गेल्या काही दिवसांमध्ये तर भाजप आणि संयुक्त जनता दलामधली दरी रुंदावत गेली. गेल्या काही दिवसांमध्ये अशा अनेक घटना सातत्याने घडत राहिल्या. त्या नितीशकुमार यांच्यासाठी त्रासदायक ठरल्या. महाराष्ट्रातल्या शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला भाजपने जसा सुरुंग लावला, जसे एकनाथ शिंदे तयार झाले; तसं बिहारमध्ये संयुक्त जनता दलातही उभी फूट पाडता येईल का, हे भाजपनं आजमावून पाहिलं. उद्धव ठाकरे विधिमंडळातील लढ्यातील कच्चे खेळाडू ठरले. नितीशकुमार यांचं तसं नाही. ते मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांनी सिंह यांच्या महत्त्वाकांक्षांना वेळीच सुरुंग लावला.

उद्धव ठाकरे यांचे सहकारी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि अखेर सरकार पडलं. बिहारमध्येही नितीशकुमार यांना भाजपकडून असाच धोका जाणवू लागला होता. शिंदे यांच्याप्रमाणेच संयुक्त जनता दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सिंहदेखील पक्षाचे महत्त्वाचे नेते होते. ते भाजपच्या नेतृत्वाखालील नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्री होते. नितीशकुमार यांच्याशी त्यांचा दीर्घकाळ संबंध आहे. अधिकारी आणि नेता म्हणून ते जवळपास तीन दशकं नितीशकुमार यांच्याशी जोडले गेले होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून ते पक्ष आणि नितीश यांच्यापासून दूर जात होते. आरसीपी सिंह यांनी संयुक्त जनता दलाच्या अनेक आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. त्यांना नितीशकुमार यांच्या विरोधात भडकावून भाजपमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं गेलं. यातल्या काही आमदारांनी हा मुद्दा उपस्थित केल्यावर नितीशकुमार यांना कठोर आणि मोठा निर्णय घ्यावा लागला. सिंह केंद्रीय मंत्री झाल्यापासून नितीशकुमार आणि पक्षातल्या लोकांशी त्यांचे संबंध बिघडले होते. गेल्या काही वर्षांमध्ये सत्ताधारी पक्षांमध्ये फूट निर्माण करून मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकमध्ये भाजपला आपलं सरकार स्थापन करण्यात यश आलं आहे. त्यामुळे नितीशकुमार यांनाही महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये भाजप खेळी करेल, असं वाटू लागलं. नितीशकुमार यांनी आरसीपी सिंह यांना पुन्हा राज्यसभेवर न पाठवून प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला; पण डोक्यावरून पाणी जाऊ लागल्यावर नितीशकुमार यांनी भाजपपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

बिहारमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या रणनीतीला नितीशकुमार यांनी जोरदार झटका दिला आहे. नितीशकुमार आणि भाजपमध्ये चार महिन्यांपासून संघर्ष सुरू होता, त्यात भाजपच्या रणनीतीकारांना पराभव पत्करावा लागला. युती तुटल्यानंतर भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बिहारमधल्या ‘कोअर ग्रुप’ची बैठक घेतली. तज्ज्ञांच्या मते, या घटनेमुळे भाजपच्या ‘मिशन २०२४’ला धक्का बसला आहे. दक्षिण भारतात भाजपला कर्नाटक सोडून इतर राज्यांमध्ये पाय रोवण्यात आतापर्यंत यश आलेलं नाही. आकडेवारीवर नजर टाकल्यास २०२४ मध्ये भाजपसाठी २६६ लोकसभा जागांवरची लढत २०१९ पेक्षा कठीण असू शकते. बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत. २०१९ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३९ जागा जिंकल्या होत्या. बिहारमध्ये भाजपला २० टक्के, तर महागठबंधनाला ८० टक्के मतं मिळाली आहेत. आता महाआघाडी झाल्यामुळे भाजप आणि इतरांमध्ये ६० टक्के मतांचा फरक असेल. फोडाफोडीत अव्वल असलेल्या भाजपचा नितीशकुमार यांनी पराभव केला आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये भाजपने चार राज्यांमध्ये सरकारं पाडली; पण बिहारमध्ये दुसऱ्यांदा स्वतःचं सरकार गमावलं. ईशान्येकडील सात भगिनी राज्यांमध्ये भाजप किंवा एनडीएचं सरकार आहे; परंतु त्यांच्याकडे लोकसभेच्या केवळ २५ जागा आहेत. त्याच वेळी, बिहार, बंगाल, ओडिशा आणि झारखंडमध्ये एकूण ११७ जागा आहेत. नितीशकुमार यांची खेळी परिस्थिती बदलू शकते.

भाजपने उत्तर प्रदेश (६५ जागा), मध्य प्रदेश (२८), राजस्थान (२५), गुजरात (२६), छत्तीसगड (९), उत्तराखंड (५), हिमाचल (४), दिल्ली (७), हरियाणा (९), महाराष्ट्र (२३) अशा २००हून अधिक जागा जिंकल्या. २०२४मध्ये पूर्ण बहुमत हवं असेल तर या २६३ जागा जिंकाव्या लागतील. त्याच वेळी नवीन क्षेत्रांमध्ये प्रवेश करावा लागेल. या पार्श्‍वभूमीवर नितीशकुमार यांनी काही मोठं ध्येय डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे. २०२४च्या निवडणुकीत विरोधी पक्षांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार बनणं हे त्यांचं लक्ष्य असू शकतं. २०१४च्या तुलनेत पुढील काळात नितीशुकमार यांच्यासाठी परिस्थिती अधिक अनुकूल आहे. त्या वेळी संयुक्त पुरोगामी आघाडीची सत्ता होती आणि पंतप्रधानपदाचे नैसर्गिक उमेदवार त्या युतीचे असू शकत होते. आज विरोधकांकडे असा तगडा चेहरा नाही. नितीशकुमार ही रिक्त जागा भरण्यास सक्षम आहेत, असा विश्‍वास संयुक्त जनता दलाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्यास सक्षम असा हा नेता असल्याचा अनेक राजकीय मुत्सद्द्यांचाही दावा आहे.

बिहारमधल्या सत्ताधारी आघाडी सरकारमध्ये विविध मुद्द्यांवरून बराच काळ नाराजी होती. आता नितीशकुमार तेजस्वी यादव यांच्यासोबत सरकार स्थापन करत आहेत. २०१७मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन नितीशकुमार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केलं. तेजस्वी यादव नितीशकुमार यांना ‘पल्टू राम’ म्हणत. आता भाजपने नितीश यांना ‘पल्टू राम’ म्हटलं आहे. नितीशकुमार यांना कमजोर करण्यासाठी भाजपने चिराग पासवान यांचा वापर करून घेतला, असाही आरोप आहे. नितीशकुमार यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या नाराजीचं मुख्य कारण म्हणजे अमित शहा यांना रिमोटद्वारे बिहारवर ताबा मिळवायचा होता. याविरुद्ध आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी शहा आणि पंतप्रधानांनी बोलावलेल्या अनेक बैठकांमध्ये नितीशकुमार सहभागी झाले नाहीत. नितीशकुमार यांनी पंतप्रधानांनी बोलावलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित न राहण्यामागे प्रकृती अस्वास्थ्याचं कारण सांगितलं; मात्र त्यादरम्यान त्यांनी पाटणा इथल्या दोन सरकारी कार्यक्रमांना हजेरी लावली. गेल्या दोन वर्षांपासून नितीशकुमार यांना भाजप आपलं राजकीय अवकाश कमी करण्याचा प्रयत्न करत आहे असं वाटत होतं, तर भाजप याला नितीशकुमारांची धास्ती म्हणत आहे. नितीशकुमार यांचं पुढील लक्ष्य लोकसभा निवडणूक आहे आणि त्यांना पंतप्रधानपदाचं उमेदवार व्हायचं आहे.

भाजपसोबतची युती तोडण्याबाबत नितीशकुमार म्हणाले की, बिहारमध्ये दोन समाजांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, याचं आपल्याला वाईट वाटलं. भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी नितीशकुमार यांच्यावर जनादेशाचा घात केल्याचा आरोप केला आहे.

इतकंच नाही, तर तेजस्वी यादव आपला २०२०चा अजेंडा राबवण्याबाबतही बोलले आहेत. याचा अर्थ नितीशकुमार यांना राष्ट्रीय जनता दलाच्या अनेक मागण्या मान्य कराव्या लागतील. मग त्यांची इच्छा असो वा नसो. नितीशकुमार यांचा हा निर्णय कितपत योग्य आहे, याचं उत्तर काळच देईल; पण या परिस्थितीमुळे भाजपसाठी थोडी कठीण परिस्थिती निर्माण झाली असून बिहारमध्ये आपले पाय रोवण्याची एक चांगली संधी या पक्षाने गमावली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in