आरबीआय क्या कहेता है?

आजही आर्थिक व्यवहारातील आम्हाला काही कळत नाही, असे म्हणणारी मंडळी भरपूर आहेत. एखाद्याला या विषयातील अगदी प्राथमिक गोष्टींची माहिती करुन घ्यायची असेल तरी तशी खात्रीशीर माहिती कुठून मिळवायची, असा प्रश्नही असतो. अशा वेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची वेबसाईट हा विश्वसनीय मार्ग असतो. सुरक्षित आर्थिक व्यवहारांसाठी या वेबसाईटवरील माहिती अतिशय उपयुक्त आहे.
आरबीआय क्या कहेता है?
Published on

ग्राहक मंच

अभय दातार

आजही आर्थिक व्यवहारातील आम्हाला काही कळत नाही, असे म्हणणारी मंडळी भरपूर आहेत. एखाद्याला या विषयातील अगदी प्राथमिक गोष्टींची माहिती करुन घ्यायची असेल तरी तशी खात्रीशीर माहिती कुठून मिळवायची, असा प्रश्नही असतो. अशा वेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची वेबसाईट हा विश्वसनीय मार्ग असतो. सुरक्षित आर्थिक व्यवहारांसाठी या वेबसाईटवरील माहिती अतिशय उपयुक्त आहे.

मागच्या आठवड्यात आपण आरबीआयच्या वेबसाईटवर दिलेल्या महत्त्वाच्या बाबींबद्दल माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. उदा. प्राथमिक बचत खाते, बँकिंगमधील सोयी, परदेशी चलन, वेगवेगळ्या नोटा इत्यादी. रोजचे वर्तमानपत्र उघडले की कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या फसवणुकीची बातमी आढळतेच. आपल्याला प्रश्न पडतो की इतके लोक एखाद्या भीतीला किंवा मोहाला कसे बळी पडतात? जसजसे अत्याधुनिक तंत्रज्ञान रोजच्या वापरात येऊ लागले, तसतसे हे प्रकार वाढत चालले. आजच्या लेखात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

सुरक्षित डिजिटल बँकिंग

यात डिजिटल बँकिंग करताना कोणती काळजी घ्यावी ते परत एकदा सांगितले आहे. कार्ड वापरून केलेल्या व्यवहारांची मर्यादा निश्चित करणे आवश्यक आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्डांद्वारे होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण मोठे आहे. तुम्ही कार्ड वापरत असाल तर जास्तीत जास्त किती पैसे काढता येतात अथवा कार्डामार्फत व्यवहार करता येतात, ते माहिती करुन घ्या. कार्डमार्फत होणाऱ्या व्यवहाराच्या मर्यादा कशा निश्चित कराव्यात ते समजून घ्या.

समाजमाध्यमे

यांचा वापरही आता अतोनात वाढला आहे आणि त्यामुळे फसवणुकीचे प्रमाणही वाढले आहे. त्याबद्दल स्लाईड्सद्वारे संदेश दिलेले आहेत. ते समजून घ्या आणि आचरणात आणा.

आरबीआयच्या योजना

यात आरबीआयच्या माध्यमातून सरकारी रोख्यात गुंतवणूक कशी करावी याची आणि बँकिंग लोकपाल याबद्दलची माहिती दिलेली आहे.

अपूर्ण राहिलेले व्यवहार

काही कारणामुळे ऑनलाईन व्यवहार पूर्ण होत नाहीत, तर कधी एटीएममधून पैसे मिळत नाहीत. अशा वेळी घाबरून जायचे कारण नाही. हे पैसे परत खात्यात कसे जमा होतात ते जाणून घ्या.

क्रेडीट / डेबिट कार्डद्वारे टोकन वापरून सुरक्षित व्यवहार

हे व्यवहार करताना आपल्या कार्डाचा तपशील द्यावा लागू नये यासाठी आरबीआयने कोणता नवीन पर्याय उपलब्ध करुन दिला आहे, त्याची माहिती दिली आहे.

परदेशी चलनातील व्यवहार

शेअर बाजाराप्रमाणेच परदेशी चलनातील व्यवहारांचे प्रमाणही खूप मोठे आहे. त्यासाठी काय काळजी घ्यावी ते इथे सांगितले आहे.

आरबीआय रिटेल डायरेक्ट

केंद्र व राज्य सरकारे विविध कारणांसाठी कित्येक हजार कोटींची कर्जे घेतात. यांना सरकारी कर्जरोखे म्हणतात. किरकोळ गुंतवणूकदारही आता या रोख्यांतील व्यवहार करू शकतात. ते कसे करावे ते इथे जाणून घ्या.

क्यूआर कोडद्वारे फसवणूक

जसजसे युपीआयमार्फत होणारे व्यवहार वाढू लागले, तसतशी या प्रकारे केली जाणारी फसवणूकही वाढू लागली. त्यामुळे काय काळजी घ्यावी ते इथे सांगितले आहे.

पॉझिटिव्ह पे पद्धती

धनादेशाद्वारे अनेक मोठमोठ्या रकमांचे व्यवहार होत असतात. त्यात फसवणुकीची शक्यताही अधिक असते. ती टाळण्यासाठी आरबीआयने ही पद्धती अमलात आणली आहे.

डिजिटल व्यवहार

आरबीआयला या माध्यमातून होणाऱ्या ग्राहकांच्या फसवणुकीबद्दल चिंता वाटते. त्यामुळे या विषयावरील आणखी एक प्रकरण आपल्या संकेतस्थळावर टाकून कोणती काळजी घ्यावी ते आरबीआयने सुचवले आहे.

अॅपद्वारे कर्ज वितरण

याला अनेकजण फशी पडत असून अशा कर्जावर अव्वाच्या सव्वा व्याज द्यावे लागत आहे. अलीकडेच आरबीआयने अशा अनेक अनधिकृत अॅपवर निर्बंध आणले आहेत. शिवाय अशी अॅप हाताळताना कोणती सावधगिरी बाळगावी त्याची माहिती दिली आहे.

आपल्या खात्यांची एकत्रित माहिती

आपल्या खात्यांच्या एकत्रित माहितीला इंग्रजीत ‘अकाऊंट ॲग्रीगेटर’ ( Account Aggregator) असे म्हटले जाते. आपल्या देशात ही संकल्पना तशी नवीनच आहे. तिची अवश्य माहिती घ्या.

डिजिटल रुपया

रोख रकमेसारखी ही एक सुरक्षित सुविधा आरबीआयने नुकतीच अमलात आणली आहे. त्याविषयी नक्की जाणून घ्या.

मनी म्यूल

म्यूल म्हणजे दुसऱ्याची ओझी वाहणारे खेचर. आपण काय करतोय हे त्या बिचाऱ्या मुक्या प्राण्याला कळत नसते. पण तुम्ही असे होऊ नका. आपले खाते दुसऱ्या कोणालाही वापरायला देऊ नका. ते बेकायदेशीर आहे. त्याविषयी गंभीरपणे सर्व काही माहिती करून घ्या.

आधार’ च्या माध्यमातून पैसे देणे

याला AEPS (Aadhaar enabled Payment System) म्हणजेच आधार कार्डाचा वापर करून पैसे देणे म्हणतात. असे पैसे देण्याआधी त्यातील धोके ओळखा आणि काळजी घ्या.

सावध कुटुंब

आरबीआयने आर्थिक जागरुकतेवर प्रसिद्ध केलेली ‘राजू आणि चाळीस चोर’ ही पुस्तिका खूपच लोकप्रिय झाली. याच मालिकेतील ‘सावध कुटुंब’ ही आणखी एक पुस्तिका आरबीआयने वेगवेगळ्या भाषांत प्रसिद्ध केली आहे, त्याविषयी वाचा. या पुस्तिकेत तुम्हाला माहितीचा खजिना सापडेल.

री-केवायसी

‘नो युवर कस्टमर’ (Know your customer - kYC) म्हणजे तुमच्या ग्राहकाविषयी जाणून घ्या, असे आरबीआय बँकांना सांगते. तुम्हीही या मार्गात असलेले अनेक अडथळे पार केलेले असतील किंवा कदाचित नसतीलही. पुन्हा केवायसी का करावे लागते, त्याचा एक छोटा व्हिडिओ इथे पाहायला मिळतो. पण सध्यातरी याबद्दल अधिक माहिती इथे उपलब्ध करून दिलेली नाही. त्यासाठीचे माहिती पत्रक आपल्या बँकेकडून घ्या.

वाचकहो, आपली आर्थिक सुरक्षितता आपणच बघायची असते, आपले पैसे आपल्या चुकीमुळे भलत्याच्याच हातात पडणार नाहीत ही काळजी आपणच घ्यायची असते. दोन लेखांद्वारे आरबीआय काय सांगू पाहत आहे, ते इथे तुमच्यासमोर मांडले आहे. पहिल्या लेखात दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन प्रत्येक विषयाची माहिती स्वत: घ्या आणि तिचा जास्तीत जास्त प्रसार-प्रचार करा, अशी आग्रहाची विनंती आहे.

मुंबई ग्राहक मंच

mgpshikshan@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in