देवेंद्र फडणवीसांचे घडले-बिघडले!

२०१४ सालापासून देवेंद्र फडणवीस यांची मुरब्बी राजकीय मांडणी आणि मोदी लाटेचे बळ यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक जिल्ह्यांच्या राजकारणाची समीकरणे बदलली आहेत.
देवेंद्र फडणवीसांचे घडले-बिघडले!

राजा माने

राजपाट

२०१४ सालापासून देवेंद्र फडणवीस यांची मुरब्बी राजकीय मांडणी आणि मोदी लाटेचे बळ यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक जिल्ह्यांच्या राजकारणाची समीकरणे बदलली आहेत. फडणवीसांची त्या जिल्ह्यांवरील राजकीय पकड आजवर मजबूत होती. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फडणवीसांचा अतिआत्मविश्वास आणि दुर्लक्ष यामुळे अनेक जिल्ह्यांमधली त्यांची राजकीय पकड ढिली आणि खिळखिळी झाली आहे. म्हणूनच या निवडणुकीत ‘मोदी करिश्मा’ कार्ड न चालल्यास देवेंद्र फडणवीस यांना ‘घडविले, बिघडविले’चा अनुभव येऊ शकतो. त्याचीच साक्ष माढा लोकसभा मतदारसंघातील विविध घटना आणि घडामोडी देत आहेत.

शरद पवारांच्या राजकीय वाटचालीची सुरुवात राज्यमंत्री म्हणून आणि सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून झाली होती. सत्तरच्या दशकांपासून त्यांचा लाडका जिल्हा म्हणून सदैव सोलापूरचा उल्लेख झाला. २००९च्या लोकसभा निवडणुकीत तर याच जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघाने मोठ्या आस्थेने त्यांना लोकसभेत पाठवले! पण केळी बागायतदारांपासून ते सर्वसामान्यांना त्यांनी दिलेली आश्वासने हवेतच विरली! खासदार म्हणूनही ते जिल्ह्याशी संवाद वा संपर्कही राखू शकले नाहीत. त्यांना जाब कोण विचारणार? परिणामी २०१४ मध्ये ‘साहेब, तुम्ही उभे राहू नका!’, अशा संदेशांचा समाज माध्यमांवर महापूर आला होता आणि त्यांच्याऐवजी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील या मतदारसंघातून लोकसभेत गेले. तसा हा ताजा इतिहास सोबत घेऊनच सोलापूर जिल्हा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरा जात आहे. या मतदारसंघात अगदी सुरुवातीपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत आणि त्या लक्षवेधीदेखील ठरत आहेत. या सर्व घडामोडींचे केंद्रबिंदू ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा’चे नेते शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे ठरले आहेत. शरद पवार आणि मोहिते-पाटील यांनी या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यामुळे या दोन्ही दिग्गज नेत्यांचा या मतदारसंघातील बारकाव्यांचा अभ्यास आहे. त्यामुळे शरद पवार यांनी अत्यंत चतुराईने माढ्याचे गणित जुळवून आणण्याचा प्रयत्न केला. एकवेळ माढ्याची जागा सहजपणे भाजपच्या हाती येईल, असे वाटत होते. परंतु विजयसिंह मोहिते-पाटील आणि फलटणच्या रामराजे नाईक-निंबाळकर घराण्यांनी भाजपविरोधी ठाम भूमिका घेतल्याने भाजपसमोर आता तगडे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे मजबूत महायुती असूनही एका-एका जागेसाठी त्यांना झगडावे लागत आहे, हे विसरता येणार नाही.

राज्यात लोकसभेच्या एकूण ४८ जागांसाठी निवडणूक होत आहे. यातल्या बऱ्याच लढती वेगवेगळ्या कारणाने लक्षवेधी ठरत असतील. मात्र, माढ्याची लढत वेगळ्याच कारणाने चर्चेत आली. माढ्याचे भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपने यावेळी उमेदवारी जाहीर केली आणि तिथेच माशी शिंकली. मुरब्बी राजकारणी असलेल्या शरद पवार यांनी हे सर्व हेरले आणि त्यांनी बारामतीतून एक-एक फास टाकायला सुरुवात केली. माढा तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची संख्या मोठी आहे. मतदानात निर्णायक ठरू शकेल इतपत त्यांचे बळ आहे. याचा विचार करून रासपचे नेते महादेव जानकर यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी बारामतीनेही डाव टाकायला सुरुवात केली. त्यासाठी शरद पवार यांनी थेट महादेव जानकर यांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न केले. हे समीकरण जुळतेय असे वाटत असतानाच महायुतीमध्ये आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या महादेव जानकर यांचे महत्त्व वाढले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक होताच एका रात्रीत त्यांनी रंग बदलत महायुतीचा आश्रय घेतला. त्यामुळे शरद पवार यांचा पहिला डाव फसला.

एक डाव फसला तरी शरद पवारांनी आशा सोडली नाही. त्यांनी लगेचच दुसरा डाव टाकला. यामध्ये थेट माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची साथ मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्यांनी दूत पाठवून चाचपणी केली. यामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. तसेच राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांच्या मदतीने चाचपणी करतानाच मोहिते-पाटील घराणे राष्ट्रवादीसोबत कसे आणता येईल, यासाठी चाचपणी केली आणि अखेर भाजपच्या विरोधात वातावरण पेटवत मोहिते-पाटील घराण्याला आपल्यासोबत घेतले आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांना पक्षात घेऊन लगेचच उमेदवारी जाहीर करून टाकली. माढ्याची सूत्रे खऱ्या अर्थाने मोहिते-पाटील यांच्या अकलूजमधूनच फिरतात, याची पुरेपूर कल्पना असूनदेखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जानकर यांच्याप्रमाणे हा डाव अयशस्वी करू शकले नाहीत. या एका डावामुळे माढा लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण वारेच फिरले आणि माढ्यात शक्ती उभी करायची असेल, तर मोहिते-पाटील घराण्याशिवाय ती उभी राहू शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना याची पूर्ण कल्पना होती. त्यामुळे अतिशय सावधपणे डाव टाकत एक-एक मोहरा गळाला कसा लागेल, याची काळजी ते घेत राहिले. त्यामुळे मोहिते-पाटील यांच्यासोबत करमाळ्याचे नारायणआबा पाटील हेही राष्ट्रवादीसोबत आले. त्यामुळे करमाळा विधानसभा मतदारसंघातील ताकद त्यांच्या माध्यमातून उभी राहिली. त्यामुळे माढ्याची लढत अधिक सोपी झाली. त्यातच फलटणचे रामराजे निंबाळकर यांचे राजघराणेही मोहिते-पाटील यांच्या बाजूनेच भक्कमपणे उभे आहे. कारण शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने त्यांचीही साथ मोहिते-पाटील यांना मिळू शकते. त्याचा फटका माढ्यातील भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना बसू शकतो.

माढा लोकसभा मतदारसंघ जवळपास हातातून जात आहे, याची कल्पना येताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपामध्येच असून, भाजपावर राग काढणारे धनगर समाजाचे आणखी एक नेते उत्तम जानकर हा मोहरा तरी पक्षात कायम राहावा, यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्यांनी तत्काळ बारामतीला विमान पाठवून त्यांना नागपूरला बोलावून घेतले. त्यांच्यासोबतच माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील नागपुरात दाखल झाले. तिथे व्यापक चर्चा झाली आणि जानकर यांना आमदारकी आणि पक्षात योग्य सन्मान मिळेल, याची ग्वाही दिली गेली. मात्र नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी भाजपासोबत राहण्यास विरोध केला. त्यामुळे उत्तम जानकरही आता वेगळा विचार करीत आहेत. त्यांनी थेट पुण्यात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडूनही बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. उत्तम जानकर हे एकेकाळी मोहिते-पाटील यांचे कट्टर शत्रू मानले जात होते. कारण माळशिरस विधानसभा मतदारसंघात मोहिते-पाटील यांच्याशी तोडीस तोड लढत देण्याइतपत त्यांची ताकद आहे. त्यामुळे हे दोन गट एकत्र आले तर माळशिरस विधानसभा मतदारसंघात दुसऱ्यांचे चालूच शकत नाही, याची कल्पना उत्तम जानकर यांना आली आहे. त्यामुळे विधानसभेचे आश्वासन मिळाले तर ते मोहिते-पाटील यांच्यासोबत जाऊ शकतात. तसे झाले तर फडणवीस यांचा माढ्यातील शेवटचा डावदेखील फसू शकतो. अर्थात या सगळ्या राजकीय समीकरणांमुळे माढा लोकसभा मतदारसंघात भाजपसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे, एवढे मात्र खरे.

(लेखक नवशक्ति व फ्री प्रेस जर्नल समूहाचे राजकीय संपादक आहेत.)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in