७८ वर्षांत नक्की काय कमावलं? काय गमावलं?

१५ ऑगस्ट १९४७. ही भारतभूमीसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची तारीख. ब्रिटिशांच्या जोखडातून ही भूमी स्वतंत्र झाली. लोकशाहीच्या रूपाने नवा बिजांकूर येथे रोवला गेला. या घटनेला...
७८ वर्षांत नक्की काय कमावलं? काय गमावलं?
Published on

- देश-विदेश

भावेश ब्राह्मणकर

१५ ऑगस्ट १९४७. ही भारतभूमीसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची तारीख. ब्रिटिशांच्या जोखडातून ही भूमी स्वतंत्र झाली. लोकशाहीच्या रूपाने नवा बिजांकूर येथे रोवला गेला. या घटनेला तब्बल ७८ वर्षे पूर्ण झाली आहेत. अतिशय आश्वासक म्हणावा असा हा काळ आहे. जवळपास आठ दशकांच्या काळात अनेकानेक घटना, घडामोडी घडल्या. काही विक्रम झाले तर काही नोंदी बनल्या. यातील काही अप्रिय होत्या, तर काही अभिमानास्पद. या ७८ वर्षांच्या काळात आपण नेमके काय कमावले आणि काय गमावले? याचा मागोवा घ्यायलाच हवा.

भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आव्हानांचा डोंगर उभा होता. अन्नधान्याची उपलब्धता, रोजगार, महागाई, बेरोजगारी, पायाभूत सोयी-सुविधा, आर्थिक सुधारणा, शिक्षण, संरक्षण, आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात आपण पिछाडीवर होतो. कधी काळी सोन्याचा धूर निघणारा भारत १९४७ मध्ये अविकसित राष्ट्रांच्या पंक्तीत जाऊन बसला होता. म्हणजेच आव्हाने असंख्य असली तरी संधीही मुबलक होत्या. आजवरच्या १५ पंतप्रधानांनी आणि राष्ट्रपतींनी भारताला विकसनशील देशांच्या रांगेत आणून बसवले आहे. आता तर भारत पहिल्या पाच जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये आला आहे. आगामी काळात हाच क्रमांक पहिल्या तीनमध्ये असू शकतो. म्हणजेच, अविकसित ते पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ही या ७८ वर्षांतील झेप खूपच समाधानकारक म्हणावी लागेल.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असा बिरुद मिरवण्याचाही मान भारताला मिळतो आहे. चीन हा लोकसंख्येचे वैश्विक नेतृत्व करीत असला तरी भारत हा लोकसंख्या आणि लोकशाही या दोन्ही बाबतींत जगभरात वरचष्मा राखून आहे. गेल्या सात दशकांहून अधिक काळात लोकशाही बळकट व्हावी यासाठी ठोस प्रयत्न झाले. त्यामुळेच ग्रामीण आणि दुर्गम भागातही लोकशाहीचा पाया भक्कम झालेला दिसतो. निवडणुकीच्या काळात अतिशय दुर्गम भागात हेलिकॉप्टर किंवा होडीमधून मतदानाची यंत्रणा घेऊन जातानाचे फोटो, व्हिडीओ जगभरात लोकशाही बळकटीकरणाचा संदेश देतात. १९व्या शतकाच्या मध्यात जे जे देश स्वतंत्र झाले त्यांच्याशी तुलना केली तर आपल्याला काय दिसते? बहुतांश देशांमध्ये लोकशाही फारशी रुजली नाही की बहरली नाही. त्याला विविध कारणे आहेत. काही देशांत लोकशाहीची जागा हुकूमशाहीने तर काही ठिकाणी लष्कराने घेतली आहे. अशा परिस्थितीत भारतामध्ये झालेला लोकशाहीचा बहर अतिशय महत्त्वाचा ठरतो.

मात्र गेल्या साडेसात दशकात शेजारी राष्ट्रांसोबतचे संबंध आणि मित्रत्व याबाबत फारसे समाधानकारक चित्र नाही. पाकिस्तानशी पराकोटीचे वैर आजही कायम आहे. ते कमी व्हावे म्हणून प्रयत्न झाले नाहीत असे नाही. पण पाकिस्तानने पाठीत खंजीर खुपसण्याचा सिलसिला कायम ठेवला. त्यामुळे भारत अनेकदा घायाळ झाला. सहाजिकच सद्यस्थितीत दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव आहे. आगामी काळात हे संबंध चांगले होतील याची सूतराम शक्यता नाही. श्रीलंका, म्यानमार, अफगाणिस्तान, नेपाळ, मालदीव या देशांसोबतचे संबंधही दोलायमानच राहिले. कधी चांगले तर कधी कडू. भूतानसारख्या देशाशी मात्र आपले उत्तम संबंध आहेत. भारतामुळे ज्या देशाची निर्मिती झाली त्या बांगलादेशसोबतचे सख्य फार दृढ झालेले नाही. सध्या तेथे अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. नजीकच्या काळात काय होईल, याबाबत साऱ्यांनाच साशंकता आहे.

चीनसारख्या बलाढ्य आणि बेभरवशाच्या देशासोबत भारताचे संबंध सध्या तणावपूर्ण आहेत. मात्र, गेल्या सात दशकांचा विचार करता ते फारच कटू आहेत. भारतावरील आक्रमण, अधूनमधून होणारी घुसखोरी, दहशतवाद, भारतीय सैन्यावरील हल्ले, भारताला अडचणीत आणण्यासाठी अन्य देशांचा वापर आदी कारवायांमुळे चीनचा कुटील चेहरा सतत समोर येत आहे. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले, तर चीनमध्ये १९४९ मध्ये क्रांती झाली. म्हणजे, दोन्ही देशांची नवी वाटचाल जवळपास एकाचवेळी सुरू झाली. भारतात लोकशाही बळकट झाली तर तेथे हुकूमशाही. मात्र, जवळपास सर्वच क्षेत्रात चीनने बलाढ्य झेप घेत महासत्ता होण्याच्या दृष्टीने आपले मार्गक्रमण सुरू ठेवले आहे. पहिल्या तीन जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये असलेला चीन स्वतःला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी धडपडतो आहे. अर्थात साम्राज्यवादाच्या स्वप्नाने पछाडलेल्या चीनला त्यात यश येईल की नाही, याबाबत जगभर साशंकता आहे. त्या तुलनेत भारताची वाटचाल धिमी असली तरी ती आश्वासक आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांची कुठल्याच बाबतीत तुलना होऊ शकत नाही. लोकसंख्या, भूभाग, पायाभूत सुविधा असोत की तंत्रज्ञान, या सर्वच आघाड्यांवर चीन भारताच्या अनेक पावले पुढे आहे. एकहाती कारभार असल्याने हे शक्य झाले, हा कयास बरोबर असला तरी इच्छाशक्ती, दूरदृष्टी, नियोजन, कल्पकता यांचाही त्यात मोठा वाटा आहे. भारताच्या बाजूने मात्र याची गती अतिशय धीमी आहे. म्हणूनच आपण वेगवेगळ्या आघाड्यांवर अद्याप धडपडतो आहोत.

अंतराळ, विज्ञान, तंत्रज्ञान, संरक्षण अशा बहुविध क्षेत्रात भारताने चमकदार कामगिरी केली आहे. चांद्रयान, मंगळयान असो की परमकॉम्प्युटर असो, भारताने जगासमोर आपले कर्तृत्व दाखवून दिले आहे. कोरोना काळात भारताची प्रतिमा लख्ख बनली. कोविड लशीची निर्मिती आणि मित्रत्वाच्या नात्याने अनेक देशांना या लशींचे मोफत वितरण ही बाब अतिशय प्रभावी ठरली. त्याचबरोबर नैसर्गिक किंवा मानवी आपत्तीच्या काळात भारताने त्या त्या देशांपुढे केलेला मदतीचा हात स्पृहणीयच ठरला आहे. निधी, साधनसामग्री किंवा मनुष्यबळ पुरवठ्यातून भारताने संकटग्रस्त देशांना दिलासा दिला आहे.

बॉम्बस्फोट, मुंबई किंवा पुलवामा हल्ला, आर्थिक निर्बंधांचे जोखड, नैसर्गिक आपत्तींचा घात यासारखे कसोटीचे असंख्य क्षण भारताच्या वाट्याला आले. पण त्याला समर्थपणे तोंड देण्यात आले. शीतयुद्धाच्या काळातही भारत एकाकी पडला नाही की जागतिकीकरणाच्या काळात अधोगतीच्या वाटेवर गेला नाही. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वामुळे संरक्षण क्षेत्रात भारताला आघाडी मिळाली. व्हिजन २०२०च्या माध्यमातून त्यांनी भारतीयांमध्ये स्फूर्तीचा हुंकार भरला. नृत्य, कला, क्रीडा अशा बहुविध क्षेत्रात भारताच्या प्रगतीचा आलेख चढताच आहे.

पण अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. कुपोषण, दारिद्र्य निर्मूलन, अन्नधान्याचा पुरवठा, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, प्रदूषण निर्मूलन, गरीब-श्रीमंती यातील दरी, सुमार शैक्षणिक दर्जा, दहशतवाद, नक्षलवाद ही सारी आव्हाने कायम आहेत. ८१ कोटी नागरिकांना मोफत धान्याचे वितरण करावे लागत आहे. संरक्षणाच्या क्षेत्रात पाक आणि चीन या दोन देशांचे मोठे आव्हान आहे. शस्त्रास्त्रांसह संरक्षण सामग्रीच्या देशांतर्गत उत्पादनाला अधिकाधिक चालना देणे, प्रदुषणाला आळा घालून शाश्वत विकासाची वाट चोखाळणे, आपत्तींमधून योग्य तो धडा घेत उपाययोजना करणे, आर्थिक आघाडीवर बळकटी मिळविणे, आरोग्याच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणे, आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आदींसाठी ठोस कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने नजीकच्या काळात योग्य ती पावले उचलली जातील, या अपेक्षेसह आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. जय हिंद.

bhavbrahma@gmail.com (संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार)

logo
marathi.freepressjournal.in