पुरोगामी राज्यात चाललेय काय?

उलट अवघड व जोखमीची कामेही त्या आपल्या हिमतीच्या जोरावर लीलया पार पाडत आहेत
पुरोगामी राज्यात चाललेय काय?

स्त्री-पुरुष समानतेच्या आधुनिक युगात प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला आपले कार्यकर्तृत्व सिद्ध करीत आहेत. अंतराळात भराऱ्या घेत आहेत. संशोधनात क्रांती घडवित आहेत. एवढेच काय, बर्मिंगहॅमची राष्ट्रकुल स्पर्धाही गाजवित आहेत. चंदेरी-सोनेरी पदके जिंकून आपल्या देशाचा नावलौकिक वाढवित आहेत. खरेतर, नोकरी-व्यवसायात महिला कुठेही मागे नाहीत. उलट अवघड व जोखमीची कामेही त्या आपल्या हिमतीच्या जोरावर लीलया पार पाडत आहेत. एवढे असूनही महिलांना घरात व घराबाहेर दुय्यम स्थान दिले जात आहे. अबला सबला झाल्याचे गोडवे कितीही गायिले जात असले तरी प्रत्यक्षात घरात, समाजात अजूनही महिलांना सन्मानजनक वागणूक मिळत नाही. देशभरात मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या, विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचेच पाहायला मिळत आहे. अलीकडच्या काळात घरगुती हिंसाचारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पुरोगामी महाराष्ट्रही महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मागे नाही, हे इथे लक्षात घेणे आवश्यक आहे. उपराजधानी नागपूरच्या भंडारा जिल्ह्यात घरगुती वादातून माहेरी जाणाऱ्या एका ३६ वर्षीय महिलेवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उजेडात आली आहे. सदर महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. हे दिल्लीच्या ‘निर्भया’सारखेच प्रकरण असून त्यावर देशपातळीवर आवाज उठविण्यात आल्यानंतर याप्रकरणी कर्तव्यात हयगय केल्याबद्दल अखेर दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयाकडे देऊन सदर महिलेस न्याय देण्याची मागणी केली जात आहे. आणखी एका घटनेत चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील आश्रमशाळेत एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आला. या घटना ताज्या असतानाच, नागपुरात भूतबाधेतून मुक्त करण्यासाठी स्वत:च्या आई-वडिलांनी केलेल्या मारहाणीत पाच वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यूट्यूबवर स्थानिक वृत्तवाहिनी चालवणारा सिद्धार्थ चिमणे हा गेल्या महिन्यात गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपली पत्नी आणि दोन मुलींना घेऊन दर्ग्यात गेला होता. तेव्हापासून आपल्या लहान मुलीच्या वागण्यात बदल झाल्याचा त्याला संशय येत होता. आपल्या मुलीला भूतबाधा झाली असून, ती घालवण्यासाठी त्याने तथाकथित काळी जादू करण्याचे ठरवले होते. मुलीच्या आई, वडील आणि मावशीने मिळून काळी जादू केली आणि हा सगळा प्रकार मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला. पोलिसांनी मोबाइलमधून हा व्हिडीओ मिळवला. या व्हिडीओत आरोपी वडील रडणाऱ्या आपल्या मुलीला काही प्रश्न विचारत असल्याचे दिसत आहे. तथापि, त्यांचे प्रश्न समजत नसल्याने मुलगी काहीच उत्तर देत नव्हती. यातूनच तिघांनीही सदर मुलीला बेदम मारहाण केली. यानंतर मुलगी बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर कोसळली. यानंतर आरोपीने मुलीला शनिवारी सकाळी दर्ग्यात नेले. त्यानंतर तिला सरकारी रुग्णालयात दाखल करून तेथून त्या तिघांनी पळ काढला. डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित करून पोलिसांना कळवले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आपल्या पोटच्या पोरीला एवढी अमानुष मारहाण करताना, नराधम आई-बापाचे हृदय कसे द्रवले नाही? ही अमानुषता त्यांच्यात आली कुठून? काळी जादू की कमकुवत मानसिकता, अशिक्षितपणा या घटनांमागे आहे, याचा कुणी विचार करणार आहे की नाही? संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथांची संतपरंपरा जपणाऱ्या, शाहू-फुले-आंबेडकर यांचा प्रबोधनाचा वैचारिक वारसा अन‌् शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची गौरवगाथा सांगणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवर जुलूम, अन्याय-अत्याचाराच्या घटना वाढीस लागणे ही लाजिरवाणी बाब आहे. ज्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाचे दरवाजे खुले केले, त्याच महाराष्ट्रात आज महिलांवरील अत्याचार काही कमी होताना दिसत नाहीत. अंधश्रद्धा, जादूटोणा प्रतिबंधक कायदा होऊनही राज्याच्या ग्रामीण भागात आजही अंधश्रद्धा पाहायला मिळत आहे. एकीकडे पतीनिधनानंतर महिलांचे कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे, मंगळसूत्र तोडणे, यासारख्या अमानुष प्रथांविरुद्ध गावोगावी ग्रामपंचायतींचे ठराव होत आहेत. महिलांवरील अन्याय, अत्याचाराविरोधात जनमत संघटित होत आहे. दुसरीकडे महिलांना या ना त्या कारणाने दुय्यम लेखून अपमानित केले जात आहे, म्हणूनच आता ज्यांनी राज्याला दिशा द्यायची, त्या जाणत्या नेत्यांनी पुढे येऊन सदर घटनांचा निषेध नोंदवायला हवा. त्याचबरोबर अमानुष रूढीपरंपरांविरुद्ध आवाज उठवायला हवा. जोपर्यंत हा आवाज समाजातील शेवटच्या वर्गापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत समाजात सुधारणा घडून येणार नाहीत. समाजात सकारात्मक बदल घडणार नाहीत. आदर्श शिक्षण, उच्च नीतीमूल्ये यातूनच समाजपरिवर्तन घडत असते व त्यासाठी समाजधुरिणांनीच राज्याला दिशा द्यायला हवी.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in