या कटकटींचं करायच काय ?

वेळेत यायला जमत नसेल सांगून टाका. दुसरा माणूस बघतो. तुम्हाला पगार काय उशिरा येण्याचे देत नाही.
या कटकटींचं करायच काय ?

काय कटकट आहे सकाळी सकाळी. तुम्हाला रविवारचं थोडं उशिरा या म्हणून किती वेळा सांगितलंय. तुम्ही ऐकतच नाही. रोजच्या प्रमाणेच रविवारीही येणाऱ्‍या दूधवाल्याची कटकट.

आई... जरा लवकर सांगत जा ना तुमची कामं. असं बाहेर पडायच्या ऐनवेळी कटकट करता. मी कशी जाणार कामावर. - सासुबाईंची कटकट

वेळेत यायला जमत नसेल सांगून टाका. दुसरा माणूस बघतो. तुम्हाला पगार काय उशिरा येण्याचे देत नाही. इथूनपुढे तीन लेटमार्क पडले तर नोकरीवर येणं बंद करा. माझ्याकडे सांगायला किंवा कोणही स्पष्टीकरण द्यायला येऊ नका. - ऑफिसमध्ये बॉसची कटकट.

या कटकटींचं करायचं काय? घरात कटकट. बाहेर कटकट. मनात गोंधळ. परिस्थिती मात्र जैसे थे. काही बदल नाही. काही क्षणांची स्वस्थता म्हणून नाही.

पैशाची तर खूप गरज आहे. काम करायलाच पाहिजे. घरात सासूबाई आणि ऑफिसमध्ये बॉस म्हणजे माझ्या कटकटींची उगमस्थानं आहेत; पण ना मी नोकरी बदलू शकते. नाही सासूबाई. दोन्ही मला हवेच आहेत; पण त्यांनी थोडं बदलावं ना. सतत मीच एकटी काय काय करू. जरा म्हणून दोघंही समजून घेत नाहीत. यांना जराशी चूक खपत नाही. सारख्या सूचना द्यायला दोघंही आघाडीवर असतात. अशी माणसं, अशा घटना आपल्या अवतीभोवती असतातच. आपण ही परिस्थिती कधीच स्वीकारत नाही. सतत नाकारण्याचीच भावना भाव खात असते. आपण वर्षानुवर्षे अशाच परिस्थितीत राहतो. अशीच कटकट रोज वाटून घेतो; परंतु ती परिस्थिती बदलण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न क्वचितच केला जातो. त्यामुळे विसंवाद आणखी वाढतात. कटकटींची रटाळवाणी मालिका सुरू होते.

या कटकटी कधी संपणार की नाही. या कटकटींचं करायचं काय? या आयुष्यभर आपल्या अशाच राहणार का? नाही... काहीतरी करायला हवं. कटकटींना पिटाळून लावायला हवं. कटकट हा शब्दच हृदयरोगाला टकटक करून निमंत्रण देईल की काय, अशी भीती निर्माण करतो. कटकटी विचाराना सकारात्मकतेत बदलणं निश्चितच शक्य आहे.

एका कंपनीमध्ये दोन सहकारी कर्मचारी एकाच पदावर कार्यरत होते. एक कर्मचारी दुसऱ्‍याला खूप कटकट करायचा, त्रास द्यायचा, त्याची कामं करायला सांगायचा. दुसरा कर्मचारी शांत होता. पहिल्याचं सगळं ऐकायचा. त्याने कधी राग धरला नाही. वाईट वाटून घेतले नाही. कधी प्रश्न विचारले नाहीत. विरोध केला नाही. काही सांगायचेच असेल तर अत्यंत सौम्य शब्दात आणि नम्रपणे सांगायचा. खरंतर कर्मचारी चांगला शिकलेला होता. चांगल्या घरातील होता. कितीही हलकी कामं सांगितली तरी तो शांतपणे करायचा. कधी कुणी अपमानास्पद बोललं तरी हा उलट उत्तर देत नव्हता. कारण त्याला माहीत होतं. आपण ही नोकरी सोडू शकत नाही. त्याला पैशाची गरज होती. तो प्रामाणिकपणे कष्ट करत होता. त्याच्याकडे जिद्द, चिकाटी होती. दोघांमधील मैत्री कायम टिकली; परंतु दुसऱ्‍याच्या कामाची पावती मिळाली. त्याची पदोन्नती झाली. थोडा पगारही वाढला. सहकारी मित्राची कटकट वाटून न घेता. सातत्याने कामावर लक्ष दिले. त्याचा परिणाम चांगला झाला.

मित्राची कटकट वाटून नोकरी सोडली असती, तर त्याची प्रगती खुंटली असती. किंवा त्याच्यासोबत वाद घालत बसला असता तर कदाचित नोकरी सोडायला लागली असती. हतबल होऊन नोकरी केली असती तर प्रचंड ताणतणाव सहन करावा लागला असता; परंतु ज्या पद्धतीने त्याने बाह्य परिस्थिती समजून विचारांमधे बदल घडवत राहिला आणि यशस्वी झाला.

कटकट वाटणं ही एक भावना आहे. त्या कटकटी बाह्य जगात नाहीत. बाह्य परिस्थितीचा अंतर्मनावर होणारा परिणाम आहे. पोटपाणी, गरज, पद, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी अशा कोणत्याही कारणास्तव आपण कार्यमग्न असतो. या ठिकाणची परिस्थिती महत्प्रयासानेही बदलत नसेल तर आपण थोडं अंतर्मुख व्हावं. अंतर्बाह्य परिस्थितीचा आढावा घ्यावा. आपल्याला हवी तशी परिस्थिती नेहमीच असते, असं कधीच होणार नाही. त्यामुळे परिस्थितीच्या साचामध्ये स्वत:ला मोल्ड करावं लागतं हेच खरं. त्यानुसार मन:स्थिती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो.

आपण जे काम करत आहोत ते आधीपासूनच आवडत असेल तर इतरांकडे दुर्लक्ष करणं फारसं अवघड जाणार नाही; परंतु काम नावडीचं असेल तर मात्र ते काम आवडून घ्यावं लागेल. वयाच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर नात्यात, कार्यात स्थैर्य नसेल तर मानसिकता सैरभैर होऊ शकते. अशा वेळी नवं काम शोधणं अतिशय कठीण होतं आणि आपल्या अपयशी भावनांवर नियंत्रण राहत नाही. इतरांना दोष देण्याचा स्वभाव बनतो. इतर लोक समजून घेत नाहीत. मुद्दाम त्रास देतात. माझं चांगलं कुणाला बघवत नाही. मला माहीत आहे, मी बरंच काही शकतो; पण लोक सहकार्य करत नाहीत. अशा तक्रारी सुरू होतात. आपण स्वत:वर नाराज होतो. घरच्यांवर नाराज होतो. आपल्यामुळेच आपल्या सभोवतालचं वातावरण बिघडतं. आपल्या कटकटी वाढतात. बरीचशी माणसं - घटना कटकटीच्या वाटायला लागतात.

ऊन पडलं तरी कटकट, पाऊस पडला तरी कटकट, थंडी आली तरी कटकट, अशी आपली वृत्ती तयार होऊ शकते. त्यामुळे समाधान हरवतं. ताणतणाव वाढतो. अर्थात, तणावाची कारणं, तीव्रता आणि मार्ग प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळे असतात. सविता, बबिता, कविता तिघी जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या. तिघींचे विवाह झाले. त्यानंतर १४-१५ वर्षांनी त्या पुन्हा भेटल्या. सविताकडे सोनं खूप आहे; पण सासुबाई हिला हवं तेव्हा वापरू देत नाहीत. बबिताला दागिने नको असतात; पण सासुबाई जबरदस्तीने घालायला लावतात. कविताला हवे ते दागिने घालू दिलं जातं; पण खूप घोळ घातला जातो. इतका की, बऱ्याच वेळा उशीर झाला म्हणून दागिने घालता येत नाहीत. सासुबाई पटकन दागिने काढून देत नाहीत. तिघींनाही त्यांच्या सासुबाई कटकट्या स्वभावाच्या वाटायच्या. तिथे त्यांना कसलाच दुसरा पर्याय नसायचा. सासुबाई जे सांगतील ते आणि तसंच व्हायला लागायचं. कालांतराने सासुबाई सौम्य झाल्या. हवं तेव्हा हवं तसं आपल्या मनासारखं वागता न येण्यामुळे आजूबाजूचं वातावरण त्रासदायक झालं होतं. तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली होती. अशा वेळी त्यानी मनाचा मनाशी सामंजस्य करार केला.

आपली नाती, आपलं कार्यक्षेत्र याचा कोणत्याही टप्प्यावर बारकाईने निरीक्षण केले पाहिजे. आपली मतं आणि परिस्थितीमधील नेमका विरोधाभास शोधून काढला पाहिजे. आपल्याला आपली परिस्थिती न आवडण्याची कारणं शोधावी लागतील. जिथे नाती बदलणं, नोकरी-व्यवसाय बदलणं शक्यच नाही. मिळालेल्या नात्यांबरोबर, कामाबरोबर टिकून राहण्याशिवाय पर्यायच नाही, अशा वेळी श्वासांबरोबर सकारात्मक विचारांची पेरणी उपयोगी पडू शकते. वाईटात वाईट परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला म्हणजे वाईटातून चांगलं घडू शकतं, यावर विश्वास ठेवला पाहिजे. कारागृहात राहून चांगली पुस्तकं लिहिणारे, सुंदर चित्रं काढणारे, भरपूर वाचन करणारे बंदी बाहेर पडून स्वत:मध्ये परिवर्तन घडवू शकतात.

जास्तीत जास्त काय होईल, हेही दिवस जातील, अशा काही मंत्रांचा श्वासासहित उच्चार करण्याने थोड्या आशा पल्लवित होतात. कटकटी कमी होण्याची शक्यता वाढते. कटकट ही त्रासदायक तक्रार आहे, असं न म्हणता ती एक छोटी समस्या आहे. समस्या थोड्या प्रयत्नाने दूर होऊ शकते. कटकटीला नाहीसं करण्यासाठी फारच जास्त मानसिक कष्ट करावे लागतात. तेव्हा आपल्या अंतर्मनातून कटकट हा शब्दच नाहीसा करता आला तर...!! त्यासाठीच अंतर्बाह्य परिस्थिती पहिल्यांदा जशी आहे तशी स्वीकारणे. त्या परिस्थितीतील योग्य अयोग्य बारकावे शोधणे. बदलांसाठी स्वयंप्रेरणा जागृत करणे. बदलांसाठी जाणीवपूर्वक सातत्याने प्रयत्न करत राहणे, अशा पद्धतीने आपल्या कटकटींना कायमस्वरूपी नाहीसे करू शकतो

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in