या शिकवणी वर्गांचे काय करायचे?

शासनाने देखील गुणवत्तेच्या दृष्टीने शिक्षणावरील गुंतवणूक उंचावण्यासाठी पावले टाकण्याची गरज आहे. उद्याच्या दृष्टीने आजचे पाऊल महत्त्वाचे असल्याने आज तरी या निर्णयाचे स्वागत व्हायला हवे.
या शिकवणी वर्गांचे काय करायचे?

संदीप वाक‌चौरे

शिक्षणनामा

भारत सरकारच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने १६ वर्षांच्या आतील विद्यार्थ्यांना शिकवणीसाठी प्रवेश देता येणार नाही अशा प्रकारचे निर्देश दिले आहेत. या निर्देशामुळे देशातील पाच लाख शिकवणी वर्ग चालकांपुढे मोठ्या प्रमाणावर प्रश्न निर्माण झाले आहेत. या शिकवणी वर्गावर सुमारे पन्नास लाख लोकांचा रोजगार अवलंबून असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अशा स्वरूपाच्या निर्देशाला काही प्रमाणात विरोध केला जात आहे.

खरेतर जेथे विद्यार्थ्यांचे गुणवत्तापूर्ण शिकणे महत्त्वाचे आहे, विद्यार्थ्यांच्या जीवनातील आनंद महत्त्वाचा आहे तेथे रोजगाराचा विचार दुय्यम ठरायला हवा. असे असताना शिकवणी वर्ग देशभरात का फोफावले? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. जेथे अपेक्षित गुणवत्तेचे शिक्षण मिळावे तेथे जर अपेक्षित गुणवत्तेचे शिक्षण मिळत नसेल तर पालक नवा मार्ग शोधत राहणार. पालकांना अपेक्षा शिक्षण संस्था पूर्ण करत नसतील तर शिकवणीचे हे पीक फोफावत राहणार, यात शंका नाही. आता या फोफवणाऱ्या पिकावर शासनाने बंदी आणण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचे परिणाम भविष्यात सकारात्मक येतील पण त्यासाठी शिक्षण संस्थांनी अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज आहे. शासनाने देखील गुणवत्तेच्या दृष्टीने शिक्षणावरील गुंतवणूक उंचावण्यासाठी पावले टाकण्याची गरज आहे. उद्याच्या दृष्टीने आजचे पाऊल महत्त्वाचे असल्याने आज तरी या निर्णयाचे स्वागत व्हायला हवे.

शिक्षणासाठी शाळा, महाविद्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालय म्हणजे व्यक्तिमत्त्वाला आकार देणारी व्यवस्था आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांच्या विकासासाठी शिक्षण असते. बालकांच्या समग्र विकासाच्या दृष्टीने शाळांचे अस्तित्व अधिक महत्त्वाचे आहे. असे असताना देखील शिकवणीचे नवे वर्ग सुरू झाले आहेत. देशात शाळा जितक्या आहेत त्याच्या सुमारे तीस टक्के शिकवणीचे वर्ग कार्यरत आहेत. देशातील शाळांमध्ये शिकणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सुमारे ४० टक्के विद्यार्थी शिकवणी वर्गात सहभागी असलेले विविध अहवालातून समोर आले आहे. शिकवणी वर्गाचे उंचावलेले पीक हे केवळ पालकांच्या भविष्याच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग म्हणून अस्तित्वात आले आहेत. आपल्या पाल्याला भविष्यात काय बनवायचे आहे हा विचार पालकांच्या मनात बालकांच्या जन्मापासूनच रूंजी घालत असतो. पालकाला स्वतः काही बनायचे होते, पण आपले स्वप्न पूर्ण करता आले नाही म्हणून पाल्यांकडून त्या अपेक्षा ठेवल्या जातात. एक प्रकारे आपले स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग म्हणून मुलांकडे पाहिले जाते. त्यामुळे पाल्यांवरच अपेक्षांचे ओझे लादले जात आहे. त्याचबरोबर भविष्याची चिंता म्हणूनही उद्याच्या भविष्यासाठी अधिक हितदायी अभ्यासक्रमाची निवड करण्याकडे पालकांचा कल असणे साहजिक आहे. त्यासाठी बालकांचा बौद्धिक विकास महत्त्वाचा ठरत आहे. आज बालकांना अभियंता, डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पाहिले जाते. त्यासाठी त्यांच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने शिकवणीचा पर्याय निवडला जातो. शिकवणी वर्ग म्हणजे मागणीप्रमाणे पुरवठा करणारी व्यवस्था ठरू पाहत आहे.

जगात बुद्धी संशोधनाच्या दृष्टीने वेगाने पावले पडत आहेत. अमेरिकास्थित हॉवर्ड गार्डनर यांनी प्रत्येक व्यक्तीत दहा प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात अशी मांडणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, प्रत्येक व्यक्तीत दहा बुद्धिमत्तांपैकी एखादी बुद्धिमत्ता अधिक असते आणि इतर बुद्धिमत्ता काही प्रमाणात कमी अधिक असतात. जी बुद्धिमत्ता अधिक असते त्यात विद्यार्थी अधिक रस घेतात. त्यांचा कल आणि अभिरूची त्या बुद्धिमत्तेत अधिक असते. त्यामुळे एखादा विद्यार्थी क्रीडाविषयक बुद्धिमत्तेचा असेल तर तो विद्यार्थी त्या क्षेत्रात अत्यंत उंचावर पोहचला जाईल. मात्र त्याच्यावर काही इतर लादले जाणार असेल तर तेथे फार काही हाती लागणार नाही. आज मुलांचा कल, अभिरूची लक्षात न घेता केवळ पालकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बौद्धिक विकासाच्या दृष्टीने पालक भूमिका घेत आहेत. त्याचा दुष्परिणाम हा मुलांचा शिक्षणातील रस कमी होत जातो. मुलांसाठी शिक्षण निरस बनण्याचा धोका तयार होतो. त्यामुळे शिक्षणाचा विचार शास्त्रीय अंगाने करण्याची गरज आहे. मुळात प्राथमिक शिक्षण हे मूलभूत संकल्पना शिकण्याचे दृष्टीने महत्त्वाचे आहे. प्राथमिक स्तरावर श्रवण, भाषण, वाचन, लेखन, संभाषण, संख्याज्ञान, संख्यावरील क्रिया यासारख्या गोष्टी शिकण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जातात.

प्राथमिक स्तरावर अध्ययन करणाऱ्या वयातील बालकांना शारीरिक विकासासाठी अधिक वेळ द्यायला हवा. त्यांचे मैदानाशी नाते जुळवायला हवे. मुलांच्या बुद्धी विकासाच्या दृष्टीने मैदानावरील खेळ अधिक महत्त्वाचे असतात. खेळ खेळल्याने बालकांच्या मेंदूला अपेक्षित असलेला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. त्याचबरोबर विविध विकासाच्या दृष्टीने अपेक्षित असलेले स्नायू देखील विकसित होण्यास मदत होत असते. मैदानावरील खेळांचा संबंध केवळ शारीरिक विकासाशी नाही, हेही लक्षात घ्यायला हवे. बालक कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षणासारख्या विषयाच्या अनुषंगाने शाळेच्या बाहेर बरेच काही शिकत असते. बालकांचा सामाजिक विकासाच्या दृष्टीने हे विषय अधिक मदत करत असतात. निरीक्षण शक्तीचा विकास याच टप्प्यावर अधिक होत असतो. बालकांचा संवाद याच टप्प्यावर अधिक फुलतो आणि बहरतोही. बालकांच्या समग्र विकासाच्या दृष्टीने प्राथमिक स्तरावरील वयाच बरीच काही पेरणी करण्याची गरज आहे. या वयातील ही पेरणी बालकांच्या बौद्धिक विकासाला हातभार लावणारी ठरत असते. उद्याच्या भविष्यासाठी मुलांच्या शारीरिक, मानसिक विकासाकडे आज लक्ष देण्याऐवजी पालक केवळ बौद्धिक विकासाकडे लक्ष देत आहेत. बौद्धिक विकासाकडे लक्ष देताना त्यासाठीच्या पुरक विकासासाठीचे मार्ग आपण बंद करत आहोत. त्याचे दुष्परिणाम वर्तमानात दिसत आहेत. शिकण्याचा विद्यार्थ्यांवर ताण येतो आहे. या ताणतणावाचा परिणाम म्हणून विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. अनेक विद्यार्थी विविध विकाराने ग्रस्त आहेत. अगदी शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना हृदयविकाराचे झटके येऊ लागले आहेत. विद्यार्थी शिकण्यातील आणि जीवनातील आनंदाला पारखे झाले आहेत. त्याचे कारण सतत शिकण्यासाठीचा ताण मुलांना अधिक कमजोर करत आहे. शिक्षणाची प्रक्रिया केवळ बौद्धिक नसते हेही लक्षात घेण्याची गरज आहे. वर्तमानात केवळ बौद्धिक विकासाला प्राधान्य दिले जात असल्याने शिकवणीकडील ओढा वाढत चालला आहे.

पालक स्वत:च्या स्वप्नपूर्तीसाठी बालकांना शाळांसोबत शिकवणी वर्गाला धाडत आहेत. हे धाडणे बालकांचे शिकणे परिणामकारक करणारे आहे की, बालकांच्या मनात निराशा निर्माण करणारे आहे याचा विचार करण्याची गरज आहे. राज्यातील शाळांचा विचार करता सकाळी दहा ते पाच अशी वेळ प्राथमिक शाळांची गृहीत धरली तर विद्यार्थी सकाळपासूनच शिक्षणात गुंतलेले असतात. खरेतर हा वेळ बालकांच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने पुरेसा आहे. मात्र आज मार्कांच्या वाढत्या अपेक्षांमुळे शाळेपूर्वी एखाद्या विषयाची शिकवणी आणि शाळा सुटल्यावर एखाद्या विषयाची शिकवणी ठरलेली आहे. आता सकाळी शिकवणीला जायचे म्हणून पालक बालकाला लवकर उठवणार. त्यामुळे बालकाची वयानुरूप गरजेची असलेली झोपही पुरेशी होत नाही. त्यात सायंकाळी पुन्हा शिकवणीचा तास. म्हणजे बालकांचे खेळणे बंद होते. शिकवणीनंतर शाळेत शिकवलेल्या भागाचा गृहपाठ, शिकवणी वर्गाचा गृहपाठ करावा लागतो. पालकही घरी हा गृहपाठ करून घेण्याबरोबर शिकवत असतात. दिवसभर हा बौद्धिक मारा बालकांच्या विकासाला पुरक ठरण्याऐवजी मारक ठरण्याचा धोका अधिक आहे.

शिकवणीचे वाढते फॅड लक्षात घेऊन राष्ट्रीय शिक्षण धोरणातही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आजचा शासननिर्णय हा राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या प्रक्रियेचा भाग मानायला हवा. अर्थात त्यासाठी शिक्षणाच्या प्रक्रियेत देखील बदल घडवून आणावा लागणार आहे. पालकांनी शिक्षणाचा मूलभूत अर्थ लक्षात घेऊन समग्र विकासाच्या दृष्टीने विचार करायला हवा. शिकवणी वर्गात ना ग्रंथालय, ना प्रयोगशाळा, ना मैदान, तरी शिकणे सुरू असते. ते शिकणे हे केवळ मार्कांसाठीचे आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू पडण्याची शक्यता नाही. आपल्यासाठी उत्तम नागरिक निर्मिती महत्त्वाची आहे. केवळ मार्कांच्या फुगवट्यावरील तरुणाई देश समृद्ध करू शकणार नाही. त्यासाठी उत्तम, समृद्ध विचारधारेची आणि शारीरिक, मानसिक, भावनिक विकास झालेली तरुणाई महत्त्वाची आहे. त्यामुळे शाळांच्या वाटा अधिक समृद्ध करण्याची गरज आहे. शासनाने शाळा समृद्ध केल्या नाहीत, तर शिकवणीच्या वाटांचा महामार्ग होण्याचा धोका आहे. आज सरकारने पावले टाकली असली तरी शेवटी पालकांच्या मानसिकतेवर यश-अपयश अवलंबून असेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in