देश-विदेश
- भावेश ब्राह्मणकर
मध्य पूर्वेतील इस्रायल हा देश आणि हमास ही दहशतवादी संघटना यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होत नाही आहे. हमास या दहशतवादी संघटनेचा बदला घेण्यासाठी इस्रायल हा देश गाझामधील निष्पाप नागरिकांना लक्ष्य करत आहे. दिवसागणिक हा संघर्ष अधिक वाढत आहे. युद्धातील बळींची संख्या हजारोंच्या घरात आहे. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक असे अनेक निष्पाप प्राण गमावत आहेत, तर लाखो जण जायबंदी झाले आहेत. या युद्धात आता इराणही उडी घेण्याची चिन्हे आहेत. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे का? अशी भीतीही या निमित्ताने व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे १२०० इस्रायली नागरिकांचा बळी गेला. दहशतवाद्यांनी गाझामध्ये सुमारे २५० नागरिकांना ओलीस ठेवले होते. इस्रायलच्या म्हणण्यानुसार, १११ नागरिक अजूनही हमासच्या कैदेत आहेत. ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या इस्रायलने हमासविरोधात युद्धाची घोषणा केली आणि थेट हमासवर धडाकेबाज हल्ले सुरू केले आहेत. या युद्धात आतापर्यंत ३२९ इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात गेल्या १०-११ महिन्यांपासून मोठा रक्तपात होत आहे. संयुक्त राष्ट्रासारखी संघटनाही या संघर्षापुढे हतबल झाली आहे. जगात शांतता नांदावी, देशोदेशींचे तंटे सामंजस्याने मिटावेत, सलोखा वाढावा या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघटनेचा जन्म झाला खरा, पण तो किती फोल ठरला हे रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास युद्धातून स्पष्ट होत आहे. सर्वसामान्य आणि निष्पापांचा जाणारा बळी हा मानवतेलाही काळीमा फासत आहे.
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने १५ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात ४० हजारांहून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. तर, जवळपास एक लाख लोक जखमी झाले आहेत. या आकडेवारीत हमासच्या दहशतवाद्यांचाही समावेश आहे. मृतांचा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. कारण अनेक मृतदेह अजूनही ढिगाऱ्याखाली दबले आहेत. काही जण बेपत्ता आहेत. इस्रायलच्या लष्कराने केलेल्या दाव्यानुसार, आतापर्यंत १५ हजारांहून अधिक हमास दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले आहे.
या युद्धामुळे बेघर होणाऱ्यांचा आणि उपासमारीचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हेलिकॉप्टरमधून गाझा भागामध्ये अन्नाची पाकिटे टाकली जात आहेत. ही पाकिटे मिळविण्यासाठी जीवाच्या आकांताने नागरिक सैरावैरा धावत आहेत. त्यावर तुटून पडत आहेत. हे चित्र आणि व्हिडीओ पाहून मन अक्षरशः गलबलून जाते. मानवाने कितीही प्रगती केली, तरी अशा प्रकारच्या परिस्थितीतून आपण मार्ग काढू शकत नाही आणि अशी वेळ नागरिकांवर येते याची सल बोचत राहते. युद्धामुळे गाझामधील सुमारे १८ लाख लोकांनी त्यांची घरे सोडली आहेत. इस्रायल आणि दक्षिण लेबनॉनमध्येही हजारो लोकांना घरे सोडावी लागली आहेत. म्हणजेच बेघर होणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. गाझामधील सुमारे ५ लाखांहून अधिक नागरिकांना येत्या काही महिन्यांत अन्नसंकटाचा सामना करावा लागणार आहे. हा आकडा गाझाच्या एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश आहे. हजारो कुटुंबे उघड्यावर पडल्याने त्यांचे भविष्य अंधःकारमय झाले आहे. गाझातील नागरिक उपासमारीच्या भीषण संकटाला सामोरे जात आहेत.
इस्रायलच्या आक्रमक हल्ल्यांमुळे गाझामधील जवळपास ६० टक्के इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. उत्तर गाझामध्ये हा आकडा ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. हॉस्पिटल असो, शाळा असोत की घरे, कुठल्याच इमारती या हल्ल्यातून सुटलेल्या नाहीत. केवळ गाझामध्येच वाताहत होते आहे असे नाही तर इस्रायलमध्येही मनुष्य आणि वित्तहानी होत आहे. पायाभूत सोयी-सुविधा उद्ध्वस्त होत आहेत. गाझामध्ये वीजपुरवठ्याची यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळेच अवघी चार ते पाच तास वीज तेथे उपलब्ध होते. यामुळे पाणीपुरवठाही प्रचंड बाधित झाला आहे. दर चार ते पाच दिवसांनी केवळ काही तास पाणीपुरवठा होतो. परिणामी, तेथील नागरिक एकाचवेळी कितीतरी समस्यांशी झगडत आहेत. दुसरीकडे आरोग्य यंत्रणाही उद्ध्वस्त झाली आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये गाझामधील अनेक हॉस्पिटल्स नेस्तनाबूत झाले आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचार मिळत नाहीत. यातील अनेकजण तडफडून आणि उपचाराअभावी मृत्यूला कवटाळत आहेत.
युद्धविराम आणि ओलिसांच्या देवाण-घेवाणीसाठी इस्रायल आणि हमास यांच्यात कतारमध्ये चर्चा झाली. पण ती अपयशी ठरली. या चर्चेमध्ये कतार, अमेरिका आणि इजिप्तचे नेतेही सहभागी झाले. हमासचा कोणताही प्रतिनिधी सहभागी झाला नाही. या चर्चा आणि करारासाठी गेल्या दोन महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. गाझामध्ये तीन टप्प्यांत युद्धविराम लागू करणे, गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी ओलीस ठेवलेल्या काही लोकांना हमासने सोडणे, इस्रायली सैन्य गाझा परिसरातून मागे घेणे, इस्रायलच्या तुरुंगातून बंदिस्त पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करणे आदींचा या करारात समावेश आहे; मात्र हा करार प्रत्यक्षात येऊ शकलेला नाही. तो कधी येईल, याबाबतही संदिग्धता आहे; मात्र, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत एवढेच.
मध्य पूर्वेतील आणखी एक चिंतेची बाब म्हणजे, इस्रायल-गाझा या युद्धात आता इराण उडी घेण्याची शक्यता आहे. म्हणजेच हे युद्ध आणखी भडकेल. तसे झाले तर अतिशय भयावह चित्र निर्माण होण्याची भीती आहे. काहींच्या मते तर तिसऱ्या महायुद्धाची ही सुरुवात असेल. गेल्या महिन्यात म्हणजेच ३१ जुलै रोजी इराणमध्ये हमासचा प्रमुख हनियाचा मृत्यू झाला. तेव्हापासून इराणकडून इस्रायलवर हल्ला करण्याचा धोका वर्तविला जात आहे. इराणने हनियाच्या मृत्यूसाठी इस्रायलला जबाबदार धरले होते. यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी इस्रायलचा बदला घेण्याचे आदेश दिले. म्हणजेच, मध्य पूर्वेतील स्थिती आटोक्यात येण्याऐवजी चिघळत चालली आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर या युद्धामध्ये होत आहे. त्यामुळे युद्धाची दाहकता वाढते आहे.
इस्रायलवर इराणचा हल्ला होईल, या भीतीमुळे अमेरिकेने मध्यपूर्वेत पाणबुड्या आणि युद्धनौका तैनात केल्या आहेत. अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीसह पाच देशांच्या नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी केले आहे. त्यात इराणने इस्रायलवर कारवाई करू नये, असा सज्जड दमच जणू दिला आहे; मात्र, त्यास भीक न घालण्याचा पवित्रा इराणचा आहे.
इतिहासात डोकावले, तर लक्षात येईल की, पॅलेस्टाईन-इस्रायल यांच्यातील वाद हा १०० वर्षांपेक्षा जुना आहे. भूमध्य समुद्र, इस्रायल आणि इजिप्तने वेढलेल्या गाझापट्टीचा प्रदेश ४१ किलोमीटर लांब आणि १० किलोमीटर रुंद आहे. दोन्ही देश एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. किंबहुना ते संधी निर्माण करतात. या भागात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी अगणित प्रयत्न झाले. पण ते विफल ठरले. दिलासादायक एवढेच की, अरब राष्ट्रांच्या इस्रायलविषयीच्या धोरणात गेल्या काही वर्षांमध्ये काहीशी नरमाई आली आहे. पण गाझा पट्टा धगधगतोच आहे. गाझामधील ‘हमास’ ही दहशतवादी संघटना अतिशय आक्रमक झाली आहे. हमासने एकाच रात्रीत तब्बल ५ हजारांहून अधिक रॉकेट हल्ले इस्रायलवर केले. तसेच या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने रहिवासी ठिकाणांनाही लक्ष्य केले. हे सारे अहोरात्र सुरू आहे.
दहशतवाद हा एकविसाव्या शतकाला मिळालेला जणू शाप आहे. कुठल्याही देशावर असा हल्ला होणे हे निषेधार्हच आहे. मुंबई हल्ल्यात दिवसाढवळ्या दहशतवाद्यांनी सर्वसामान्य नागरिकांवर बेछूट गोळीबार केला, तर अमेरिकेतील ट्विन टॉवरमध्ये थेट विमाने घुसवून हाहाकार उडवून दिला. कुठल्याही दहशतवादी हल्ल्याचे समर्थन करता येणे शक्य नाही. दहशतवाद्यांनी काळानुरूप नाही, तर काळाच्या पुढे जात आपली सज्जता ठेवण्याकडे सक्रियता ठेवली आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, हेरगिरीचे साहित्य, अन्य स्वरूपाची यंत्रणा दिसून येते. क्रूरपणे आणि मानवतेलाही थिटे पाडणारे हल्ले करून दहशतवाद्यांनी त्यांचा कुटील चेहरा जगासमोर ठेवला आहे. मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित होण्यासाठी आता केवळ चमत्कार घडावा, अशी प्रार्थना तेथील नागरिक करीत आहेत.
(bhavbrahma@gmail.com) (लेखक संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक व मुक्त पत्रकार आहेत.)