नातीगोती : शरदरावांचे बिनसले कुठे?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकारणाची खिचडी झाली असून नातीगोती विसरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या जीवावर उठले आहेत...
नातीगोती : शरदरावांचे बिनसले कुठे?

- अरविंद भानुशाली

सह्याद्रीचे वारे

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकारणाची खिचडी झाली असून नातीगोती विसरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. नणंद-भावजय, मुलगा-बाप अशा एकमेकांविरोधात लढती होत आहेत. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार हे माझे गुरू आहेत, अशी स्तुतिसुमने उधळली होती. पण यंदाच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात बिनसले कुठे? असाच प्रश्न विचारला जात आहे.

सन २०१४-१९ या काळात शरद पवार व नरेंद्र मोदी यांनी एकत्र भोजन केल्याच्या घटना अनेक वेळा घडल्या होत्या. शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तब्बल दोन वेळा बारामतीत नेऊन भोजन देऊन मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा केली होती. एवढेच कशाला तर २०१४ मध्ये भाजपने पाठिंबा न मागताही, शरद पवारांनी भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा दिला. मग त्यानंतर मोदी-पवारांचे बिनसले कुठे? एकापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते गजाआड होऊ लागल्याने तसेच संजय राऊत यांच्यासारखे कट्टर समर्थक ईडीच्या जाळ्यात अडकल्याने शरद पवारांनी मोदीविरोधी पवित्रा घेतल्याचे दिसून येते.

महाराष्ट्रात पूर्वी राजकारणात नातीगोती जपण्याला महत्त्व होते. परंतु या लोकसभा निवडणुकीत मुलगा विरुद्ध बाप, नणंद विरुद्ध भावजय एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभ्या ठाकल्या आहेत. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असते परंतु कुटुंबे फुटली जातील, याची जाण ‘जाणत्या राजा’ला नाही का? गोपीनाथ मुंडे यांचे घर कुणी फोडले. जयदत्त क्षीरसागर (बीड) यांचे घर कोणी फोडले? हे का होते? हे समजत नाही असे नाही. निव्वळ राजकारणाची पोळी भाजण्यासाठी हे केले जाते एवढे निश्चित! आज पवार घराण्यातील भाऊ-बहीण वेगळ्या पटलावर प्रचार करतात. तर मुंबईचे कीर्तीकर हे बाप-बेटे समोर रणांगणात लढतात!

आता बीडमध्ये बहीण-भाऊ लोकसभा निवडणुकीत एकत्र आल्याचे दृश्य दिसत आहे. मधल्या काळात राष्ट्रवादीमधील धनंजय मुंडेंना देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद असल्याने, पंकजा मुंडेंचे बिनसले होते. परंतु आता अजित पवारांचा राष्ट्रवादी व भाजप एकत्र आल्याने या बहीण-भावांचे मिलन झाले आहे. बीड जिल्ह्यात मराठे विरुद्ध ओबीसी या वादामुळे पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदारसंघात पराभव झाला होता. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष भुजबळ विरुद्ध जरांगे-पाटील यांच्यात सुरू होता. त्यावेळी ओबीसीच्या नेत्या पंकजा मुंडे मूग गिळून गप्प होत्या. हे सर्व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच होते?

बारामतीत संघर्ष सुरू आहे, याला पार्श्वभूमी अशीच आहे. गेली चार-पाच वर्षे शरद पवारांविरुद्ध अजित पवार यांच्यात सुप्त संघर्ष सुरू आहे. शरद पवारांना पुतण्यापेक्षा पुत्रीप्रेम अधिक आहे, हे गेल्या वर्षभरात उघडपणे दिसून येत आहे. सुप्रिया मुख्यमंत्री कशी होईल, याचे वेध पवारांना यापूर्वी लागले होते. तर अजित पवारांचे पहाटेचे बंड हे शरद पवारांच्या संमतीनेच झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर त्यापाठोपाठ गेल्या वर्षात ज्या एकापाठोपाठ एक घटना घडल्या, त्या काय दर्शवितात? राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना, शरद पवारांनी वार्धक्याचा उल्लेख केला होता. तो शेवटी ड्रामाच ठरला ना! उलटपक्षी अजित पवारांनी संयम दाखविला, असेच म्हणावे लागेल. अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी विरोधी भूमिका घेतली होती. किती पवारांना राजकारणात आणता, अशी टिप्पणी करणारे शरद पवार यांनी दुसरे नातू रोहित पवार यांना निवडणुकीत पाठिंबा देऊन पारनेरमधून निवडून आणले. अजित पवार यांचे हेच म्हणणे आहे की, साहेबांना एक नातू चालतो आणि केवळ माझा मुलगा असलेला पार्थ नातू चालत नाही आणि मग त्यातून घराघरातून वाद सुरू झाले. आत्ताही असेच झाले आहे. मुलगी घरची आणि सून बाहेरची? यामुळे यापुढे नात्यात अधिक विरोध होणार? मग याला जबाबदार कोण?

नात्यामध्ये म्हणाल तर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर विरुद्ध त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर हे उबाठामधून लोकसभेसाठी लढत देत आहेत. अमोल कीर्तीकर यांना कोरोना काळात खिचडी प्रकरणात ईडीने बोलावले, तेव्हा गजानन कीर्तिकर यांच्यातील बाप जागृत झाला. अमोलला कशाला ईडीने बोलावले, त्याने कोणताच भ्रष्टाचार केला नाही, असे सर्टिफिकेटही गजाभाऊ देताहेत आणि तेच आज त्याच्या विरोधात लोकसभेसाठी दोन हात करण्यासाठी उभे आहेत. कीर्तीकर हे मुळात शिवसेनेच्या लोकाधिकार चळवळीतील अग्रणी नेते. मात्र मधल्या काळात काय माशी शिंकली की, त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. गजानन कीर्तीकर हे भाजपचे कडवे विरोधक आहेत. त्यामुळे एक निश्चित की, या लोकसभा निवडणुकीत भाजपची मते गजानन कीर्तीकर यांना पडणार नाहीत. त्यावरूनच शिंदेंची ही सीट धोक्यात येऊ शकते, असा अंदाज आहे. हे त्याचेच निर्देशांक आहेत!

मुंबई म्हणजे शिवसेना. परंतु त्याचे आता दोन विभाग झाले आहेत. आमदार, खासदार, नगरसेवक हे शिंदे गटात असले तरीही अजून शिवसैनिक मूळ शिवसेनेपासून दुरावला नाही. त्यांना सेनेने काँग्रेसमध्ये जाणे पसंत नसले तरी मूळ शिवसेना ही बाळासाहेबांची आहे आणि आम्ही शिवसैनिक बाळासाहबांचे आहोत आणि याची कल्पना भाजप नेत्यांना असून त्यामुळेच मोदी-शहांनी फार टीकाटिप्पणी केलेली नाही. परंतु आगामी प्रचारात काय होते, हे आज सांगता येणार नाही.

शिवसेना-भाजप युतीने २०१४ मध्ये २३+१८=४१ जागा जिंकल्या होत्या. आता शिवसेनेतील एक मोठा ४२ आमदारांचा गट व राष्ट्रवादीकडे तेवढ्याच आमदारांचा पक्ष व निशाणी घेऊन भाजपबरोबर राज्य सरकारमध्ये सत्तेत आला. त्यानंतरही सर्व्हेचे निकाल महायुतीला अनुकूल नाहीत. महायुती ३०-३२ च्या पुढे जात नाही, असेच बहुतेक सर्व्हेची आकडेवारी आहे. याचे मुख्य कारण लोकांना जशी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस ही महाविकास आघाडी आवडली नव्हती, तशीच आता सत्ताधारी गटाची महायुतीही भावलेली दिसत नाही. मुंबई-ठाण्याचा कायापालट होत असताना, तो मतपेटीत होणाऱ्या मतांनीच उमटेल की नाही, याबद्दल शंका वाटते. मुंबईचे ६ आणि ठाणे-पालघरचे ५ असे ११ लोकसभा मतदारसंघ निर्णायक आहेत. मात्र अजूनही भाजप, शिवसेनेची दोन लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून लढाई सुरू आहे.

सोलापूर हा लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला! आज या मतदारसंघात काय परिस्थिती आहे. भाजपने ज्यांना उमेदवारी दिली आहे त्यांना कोणी ओळखत नाही. २०१९ मध्ये वंचितचे प्रकाश आंबेडकर ज्या मतदारसंघात उभे होते, त्यांच्यामुळे सुशीलकुमार शिंदे पराभूत झाले. २०२४ मध्ये वंचितने पाठिंबा काँग्रेसला दिला आहे. २०१४-१९ पर्यंत शरद पवारांना मोदी हे उत्तम प्रशासक वाटत होते. एवढेच कशाला, शरदरावांनी २०१४ मध्ये भाजपला पाठिंबा देताना म्हटले होते की, राज्याला फेरनिवडणुका परवडणाऱ्या नाहीत, म्हणून आपण देवेंद्र फडवणीस सरकारला पाठिंबा देतो. त्यानंतर वक्तव्य तर त्याहीपेक्षा गंभीर आहे. म्हणे शिवसेनेला भाजपपासून दूर करावयाचे होते म्हणून पाठिंबा दिला. पवारांना इकडून तिकडे उडी मारणे जमते. शिवसेनेचे ४२ आमदार, मंत्री फुटून एकनाथ शिंदेेंच्या नेतृत्वाखाली बाहेर पडले. त्यापूर्वी शरद पवारांनी बैठक घेऊन भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु तो डाव हुकला आणि त्या अगोदर शिंदे जाऊन भिडले आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. शरद पवार व मोदींमध्ये बिनसले कुठे? अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली, तेव्हा मिठाचा खडा पडला. त्यापाठोपाठ नवाब मलिक आणि संजय राऊत यांना अटक झाली. तेथून शरद पवार यांनी मोदीविरोध सुरू केला. नवाब मलिक यांना तर दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यवहारात गुटखाप्रकरणी अटक झाली. यावर शरद पवार संतापले. सत्ताधाऱ्यांकडून ईडी, सीबीआय यांसारख्या यंत्रणांचा होणारा गैरवापर, हा मुद्दा येत्या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा ठरणार आहे. या सर्व खिचडीचा परिणाम मुंबई तथा अन्य शहरांत मतदानावर दिसणार आहे. राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला असला तरी ते अजून प्रचारासाठी बाहेर पडलेले दिसत नाहीत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in