सेनेचं कुठे चुकलं ?

निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचं एकमेव नेतृत्व होतं पण तेव्हा बाळासाहेब ठाकरे हयात होते.
सेनेचं कुठे चुकलं ?

राज्याचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणार्‍या शिवसेनेतल्या बंडाळीमुळे राजकीय चित्र बदलून गेलं. मात्र शिवसेनेत बंडाळी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. भुजबळांपासून अशी अनेक बंडं आपण पाहिली. गणेश नाईक, राज ठाकरे, नारायण राणे ही ताजी उदाहरणं आहेतच पण त्याही आधी हेमचंद्र गुप्तेंसारखे अनेक लोक शिवसेना सोडून गेले होते, हे लक्षात घ्यायला हवं. पक्षात एखादा नेता मोठा होतोय, वाढतोय असं लक्षात येताच त्याला बाहेर काढण्यासाठी शिवसेनेचं एक वेगळं तंत्र काम करतं. त्या पद्धतीने शिवसेना काम करते. बाळासाहेब ठाकरे यांचं एकमेव नेतृत्व राहील आणि त्याला कोणाचंही आव्हान राहणार नाही, अशी स्थिती बरीच वर्षं पहायला मिळाली. मात्र बाळसाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर ही परिस्थिती बदलली. बाळासाहेबांच्या नावाने त्यांचा मुलगा आणि नातू पक्ष चालवू लागले. पण त्यांना होणारा विरोध अधिक मोठ्या प्रमाणावर होता. महापालिकेच्या २००७ च्या निवडणुकीत वा २०१२ च्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचं एकमेव नेतृत्व होतं पण तेव्हा बाळासाहेब ठाकरे हयात होते. उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर त्या निवडणुका जिंकल्या असं काही लोक सांगतात, पण बाळासाहेबांनंतर २०१७ मध्ये महानगर पालिका निवडणुकीत सेनेची सत्ता जाता जाता राहिली. शिवसेनेसाठी तो मोठा झटका होता. पहिल्या निकालात सेनेचे ८४ आणि भाजपचे ८२ अशा जागा आल्या होत्या. नंतर शिवसेनेने काही छोटे पक्ष गिळंकृत केले, मनसे फोडली. त्यानंतर ते ११३ चा आकडा गाठू शकले.

आता मात्र परिस्थिती बदलली आहे. महापालिकेतली सदस्यसंख्या आता वाढली आहे. सहाजिकच बहुमताचा आकडाही पुढे गेला आहे. आधी २२७ नगरसेवक होते. ती संख्या १०-१२ ने वाढल्याचा हा परिणाम आहे. आणि तो जादूई आकडा गाठण्याइतकी ताकद आत्ताच्या शिवसेनेमध्ये नाही. त्यामुळेच ते राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला बरोबर घेऊन पुढे जाण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र याला कॉंग्रेसचा मोठा विरोध आहे. ही निवडणूक कॉंग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यताच अधिक आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी पक्षाने शिवसेनेसह ही निवडणूक लढवण्याचं मान्य केलं आहे. याचं कारण म्हणजे मुंबईत राष्ट्रवादीची तितकी ताकदच नाही. त्यामुळे हे दोन पक्ष मुंबई महानगर पालिका निवडणूक एकत्र लढतील. शिवसेनेच्या अडीच वर्षांच्या कारभाराबद्दल बोलायचं तर तो बराच नकारात्मक राहिला. बंड करणारे सगळे आमदार स्वत:च्या मतदारसंघासाठी व्हिडिओ करताना आपण पाहिले. हे व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. त्यात सगळ्यांची एकच तक्रार होती की, आपल्या मतदारसंघाचा विकास खुंटला आहे. आपली कामं होत नाहीत. साहेब आपले आहेत, ठाकरे साहेबांना आपण देव मानतो पण अशीच स्थिती राहिली तर मतदारसंघ हातून जाईल आणि कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवाले आपल्याला मात देतील. ही भीती असणारे आमदार बंडाच्या पावित्र्यात उतरले आणि महाराष्ट्राने एक सत्तानाट्य अनुभवलं. इतकंच नव्हे तर, समाजवादी पक्षाचे रईस शेख यांची मुलाखतही लक्षात घेण्याजोगी आहे. त्यांचे विचार आणि सदा सरवणकरपासून शहाजीबापू यांच्याकडून व्यक्त होणारे विचार एकसारखेच बघायला मिळाले.

सगळ्या नाराज आमदारांनी उद्धव ठाकरे खूप बदलले असल्याची तक्रार नोंदवली. ठाणे जिल्ह्यातले भिवंडीचे आमदार असणार्‍या रईस शेख यांच्या मते, कोरोनाच्या आधीपर्यंत उद्वव ठाकरे बर्‍यापैकी संपर्क राखून होते. भेट मागतली असता वेळ मिळायची. मतदारसंघात काही समस्या सांगितल्या तर सोडवल्या जायच्या. पण कोरोनासंसर्गानंतर त्यांची भेट होणं कठीण झालं. ते अधिकारी वर्गामार्फत काम करु लागले आणि बरेचदा कामं रेंगाळू लागली. खरं सांगायचं तर कामांची गती थांबली. कामं होईनाशी झाली. हा अनुभव अत्यंत निराशाजनक होता. अशा परिस्थितीत कोण कसं काम करणार हा प्रश्‍न होता. साधारणत: अशीच काहीशी भावना शिवसेनेच्या लोकांचीही होती. वडील आणि मुलगा दोघेही मंत्रिमंडळात गेल्यामुळे पक्षाला आधारच न उरल्याची खंत अनेकांनी बोलून दाखवली. यापैकी एकाने पक्षाची जबाबादारी सांभाळण्यासाठी सेना भवनात थांबायला हवं होतं असं अनेकांनी बोलून दाखवलं. आदित्य ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून काम पहायला हवं, असं अनेकांचं मत होतं. असं झालं असतं तर परिस्थितीत फरक पडला असता. आमदारांना दिलासा मिळाला असता. मुख्यमंत्र्यांचा एक एक मिनिटाचा हिशेब असतो, ते सगळ्यांना वेळ देऊ शकत नाहीत. मात्र आदित्य ठाकरे सेना भवनात असते तर या समस्येतून काही अंशी तरी मार्ग निघू शकला असता. लोकांना आपल्या समस्या त्यांच्या कानावर घालत्या आल्या असत्या. मात्र बदलत्या स्थितीत लोकांच्या या सामान्य अपेक्षांचीही पूर्तता होत नव्हती. पत्रकार, मंत्री, सर्वसामान्य शिवसैनिक या सर्वांनीच ही बाब बोलून दाखवली. त्याकडे वेळीच लक्ष दिलं असतं तर कदाचित चित्र बदलू शकलं असतं.

सर्वसामान्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करण्याचं एक कारण ‘आम्ही ठाकरे आहोत...’ या शैलीत दडलं आहे. याला आपण अहंगंडही म्हणू शकतो. महाराष्ट्रात ठाकरेंना सगळं माफ आहे, हा अतिआत्मविश्‍वास त्याला कारणीभूत होता. तुम्ही ठाकरे यांच्याशी बोलू शकत नाही, विचारांचं आदानप्रदान करु शकत नाही, ही वतुस्थिती आहे. हा एकतर्फी मार्ग असतो. त्यांना हवं आहे तेच मिळतं. ते तुमचं ऐकून घेतील असं नाही. हा अनेकांना आलेला अनुभव आहे. याच स्वभावामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेणंही बंद करुन टाकलं. कोरोना आणि स्वत:चा आजार हे निमित्त पुढे करत पत्रकारांचे प्रश्‍न टाळले. या सगळ्याचा नकारात्मक प्रभाव निर्माण झाला असंही आपण म्हणू शकतो. शिवसेनेच्या या सगळ्या स्थितीचा सामान्य शिवसैनिकांवर निश्‍चितच मोठा परिणाम होईल. याचं कारण म्हणजे मुंबई वगळता ग्रामीण भागामधल्या सगळ्या आमदारांनी आणि त्यांच्या पाठिराख्यांनी हेच अनुभवलं आहे. मुख्य म्हणजे मुंबईतले आणि बाहेरचे शिवसैनिक यांच्यात मोठा फरक आहे. त्यांच्या विचारांमध्ये, अभिनिवेशामध्ये फरक आहे. पक्ष म्हणून त्यांच्यावर होणार्‍या संस्कारांमध्ये आणि जडणघडणीमध्ये फरक आहे. परभणी, औरगांबाद, पुणे अशा काही भागांमध्ये खूप आधीपासून सेनेबरोबर असणारे कट्टर शिवसैनिक आहेत. पण विशेषत: ग्रामीण भागामध्ये आपल्या आमदाराचं ऐकण्याचा, त्याचं नेतृत्व मानण्याचा विचार असणारे शिवसैनिक आहेत. ते आपल्या आमदाराला आपला नेता मानतात आणि ते सांगतील तसं वागतात. दुसरं म्हणजे मुंबईतून बाहेरच्या मतदारसंघांमध्ये जाणार्‍या सेनेच्या प्रतिनिधींबद्दल वर्षानुवर्षं बरी मतं नसणारे अनेक लोक आहेत. थोडक्यात, छोट्या शहरांमध्ये सेनेची वाईट इमेजही बघायला मिळते. आगामी काळात शिवसेनेला आपली ही प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करावा लागेल.

अलिकडेच श्री. केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या एका वक्तव्याचा समाचार घेतला. बंड करणार्‍यांना उद्देशून ‘तुम्ही शिवसेनेच्या नावावर निवडून येता’ असं ठाकरे यांनी म्हणताच केसरकर म्हणाले की, सेनेच्या नावावर निवडून येत असतो तर उभे करु तेवढे सगळेच निवडून यायला हवे होते. पण वस्तुस्थिती तशी नाही. आम्ही ५४-५५ लोकच निवडून येतो, कारण आम्ही काम करतो. हे एक बिनतोड उत्तर होतं. लक्षात घेण्याजोगी आणखी एक महत्वपूर्ण बाब म्हणजे सेनेतली बंडाळी उघड झाली तेव्हा शिवसैनिकांनी तोडफोडीचं हत्यार उचललं. काही ठिकाणी हिंसेच्या घटना घडल्या पण त्या विशेषत: शहरी भागात पहायला मिळाल्या.

याउलट अब्दुल सत्तार शिंदेंच्या गटामध्ये जाताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोश केला. गुलाबराव पाटील गेल्यावर जळगावमधल्या कार्यकर्त्यांनी जल्लोश केला. असाच जल्लोश आपण ठाण्यामध्ये बघितला. म्हणजेच संजय राऊत अथवा ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे शिवसैनिक प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर उतरलेला पहायला मिळाला नाही. आदित्य ठाकरे यांनीही बंडखोरांना दिलेली धमकी पोकळच होती. नंतर पोलिसांची भूमिकाही बदललेली दिसली. त्यांनी रस्त्यावर उतरणार्‍यांना चोपायला सुरूवात केली. थोडक्यात, आता शिवसेनेची ताकद सगळीकडेच कमी झाली आहे. त्यामुळेच यापुढे त्यांना मनगटशाही राबवणं खूप अवघड आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे आता खरोखरच त्यांच्यावर पहिल्यापासून सुरूवात करण्याची वेळ आली आहे, यात शंका नाही..

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in