वास्तवातील राक्षस?

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रूपाने आपल्यामध्ये दाखल झालेली आभासी राक्षसी शक्ती मात्र मानवाला भीक मागायला लावणार की काय?
वास्तवातील राक्षस?

पूर्वी लहानग्यांना घाबरविण्यासाठी, भीती घालण्यासाठी राक्षसाची संकल्पना वापरली जायची. आता तंत्रज्ञानस्नेही पिढी अशा बालिश गोष्टींना भीक घालत नाही, ही गोष्ट वेगळी... पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रूपाने आपल्यामध्ये दाखल झालेली आभासी राक्षसी शक्ती मात्र मानवाला भीक मागायला लावणार की काय, अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. सध्या बोलबाला असणाऱ्या विषयासंदर्भातील हे विवेचन.

खरे पाहता सध्याचा काळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आहे. आपण अगदी काही महिन्यांचे मूलदेखील नवीन तंत्रज्ञान आत्मसात करताना पाहतो. मोडकेतोडके बोलायला शिकलेले लहानगेदेखील अतिशय आत्मविश्वासाने आणि हिकमतीने या आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त साधनांचा वापर करतात. अशी साधने आत्मविश्वासाने, सहजगत्या हाताळताना दिसतात. त्यामुळेच अशा भारलेल्या वातावरणात पुराणकथा, बिरबल आणि अकबरांच्या गोष्टी वा सात बुटके, परी आणि राक्षस अशा कथांचे प्रयोजन राहिलेले नाही, मात्र मुलांच्या भावविश्वातून राक्षसाची सद्दी संपली असली तरी वास्तवात एक ना अनेक मार्गांनी होणारे आक्रमण राक्षसी ताकदीचे असल्याने त्याच्या फटकाऱ्यातून मानव वाचणार का, हा खरा ज्वलंत प्रश्न आहे. या प्रस्तावनेचे प्रयोजन म्हणजे गेल्या काही दिवसांपासून तंत्रज्ञानाच्या जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक लोक एआयला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक मोठे पाऊल मानत आहेत, तर काही लोक याला भविष्यासाठी मोठा धोका असल्याचेही म्हणत आहेत. दरम्यान, एआय फर्मच्या संस्थापकाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत मोठे वक्तव्य केल्यामुळे याविषयी विविधांगाने चर्चा होत आहे. सद्यस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले की, ‘या तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेले रोबो भविष्यात मानवांवर नियंत्रण ठेवू शकतात. त्यांच्यामुळे संपूर्ण मानवजात धोक्यात येऊ शकते.’ साहजिकच त्यांच्या या महत्त्वपूर्ण वक्तव्याचा अर्थ गांभीर्याने समजून घ्यायला हवा.

तीन वर्षांपूर्वी विकसित केलेल्या स्टॅबिलिटी एआय फर्मचे संस्थापक इमाद मोस्ताक यांनी भविष्याचा वेध घेताना व्यक्त केलेली एआय रोबो मानव आणि मानवता या दोघांनाही नियंत्रित करू शकतो ही भीती प्रत्यक्षात अवतरली तर ती सर्वात वाईट परिस्थिती असेल हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. याचा वापर करून तयार होणाऱ्या भविष्यातील उपकरणांमुळे, गॅझेट्समुळे मानवी जीवनशैली, कार्यशैली आणि विचारक्षमता प्रभावित होऊ शकते. एआय संचालित डिव्हाइस वेअरेबल असून, त्याद्वारे संपर्क साधणे, कोणतीही माहिती मिळवणे, विश्लेषण करणे, आरोग्याविषयीची माहिती मिळवणे, आगाऊ सूचना प्राप्त होणे, धोक्याचे संकेत मिळणे अशी लक्षावधी कामे केवळ एका छोट्या चिपच्या सहाय्याने होऊ शकतात. त्यासाठी कोणत्याही सीमची गरज भासणार नाही. ते पुढे म्हणाले की, तुमच्यापेक्षा काही सक्षम असेल तर वातावरण बदलू शकते. आपण आपल्यापेक्षा चांगल्या किंवा अधिक सक्षम कशाचीही कल्पना करू शकत नाही. मात्र आता आपल्याकडे आपल्यापेक्षा अधिक बुद्धिमान, चांगले रोबोटिक एजंट आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांना आपण नियंत्रित करू शकत नाही. ते आता ऑटोमेशनच्या पातळीवर पोहोचले आहेत. ही मात्र निश्चितच काळजीची बाब म्हणावी लागेल. अशा यंत्रांचा परिणाम किती वेदनादायक ठरू शकतो याची आपण कल्पनाही करू शकत नाही. सध्या आपण या गोष्टींपासून पूर्णपणे अनभिज्ञ आहोत.

या एआयचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी भारत सरकार नवा नियम बनवणार आहे. सरकारने अलीकडेच सांगितले आहे की, ते चॅटजीपीटीसारख्या एआय-आधारित स्मार्ट टेक प्लॅटफॉर्मसाठी एक नियामक फ्रेमवर्क तयार करण्याचा विचार करत आहे, जे अल्गोरिदम आणि कॉपीराइटशी संबंधित क्षेत्रांमध्ये प्रवेश करत आहे. हा कायदा त्याच्याशी संबंधित इतर समविचारी देशांच्या सहकार्याने तयार केला जाईल. दळणवळण आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, विविध देशांद्वारे एआय प्लॅटफॉर्मचा वाढता प्रभाव पाहिला जात आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय विचारविमर्षानंतर एक फ्रेमवर्क विकसित करण्याची गरज आहे. फ्रेमवर्क काय असावे, नियामक सेटअप काय असावे, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. ‘जी सेव्हन’ गटामध्ये, या देशांचे सर्व डिजिटल मंत्री नियामक फ्रेमवर्क काय असावे याबद्दल गांभीर्याने विचार करत आहेत. त्यामुळे ही जागतिक समस्या असल्याचे स्पष्ट होते. म्हणजेच हा कोणत्याही एका देशाचा मुद्दा नसून याकडे आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच आता विविध देशांमधील विचारांची देवाणघेवाण सुरू राहील. चॅटजीपीटीसारखे एआय चॅट प्लॅटफॉर्म ‘जनरेटिव्ह एआय’ टूल्स वापरतात आणि काही सेकंदात मानवासारखा बुद्धिमान प्रतिसाद देतात.

याबद्दल विचारले असता तज्ज्ञ म्हणतात की आयपीआर, कॉपीराइट, अल्गोरिदमच्या पूर्वाग्रहाबद्दल चिंता आहे. ते एक विस्तीर्ण व्यासपीठ आहे. स्टार्टअप ओपन एआयद्वारे तयार करण्यात आलेल्या चॅटजीपीटीने गेल्या वर्षीच्या अखेरीस सेवा लाँच केली आणि लाँच झाल्याच्या अवघ्या पाच दिवसांमध्ये दहा लाखांहून अधिक वापरकर्ते मिळवले. यासाठी मायक्रोसॉफ्टने अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली. मायक्रोसॉफ्टने हे तंत्रज्ञान आपल्या उत्पादनांमध्ये समाविष्ट केले आहे. हे लक्षात घेऊन गुगलने ‘इरीव’ नावाचा एआय प्रोग्राम तयार केला आहे, जो इंटरनेट लिंक्सची यादी देण्याऐवजी वास्तविक जगाला बुद्धिमान प्रतिसाद देतो. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी या वर्षाच्या सुरुवातीला सांगितले की, बार्ड आपल्या भाषेच्या मॉडेलची शक्ती, बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलतेसह जगातील ज्ञानाची व्याप्ती एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे. तथापि, जगभरातील नियामक अशा तंत्रज्ञानाची वाढती लोकप्रियता, स्वीकृती आणि वापर यांच्याशीही ही बाब संबंधित आहे, कारण त्यात लोकांची दिशाभूल करण्याची, खोट्या आणि बनावट बातम्या पसरवण्याची, कॉपीराइट कायद्यांचे उल्लंघन करण्याची आणि लाखो नोकऱ्या काढून टाकण्याची क्षमता असू शकते.

ऑनलाईन सुरक्षा तज्ज्ञांच्या एका गटाला आढळले आहे की, वापरले जाणारे ५० टक्क्यांहून अधिक पासवर्ड कृत्रिम बुद्धिमत्ता एका मिनिटापेक्षा कमी वेळात क्रॅक करू शकते. ‘होम सिक्युरिटी हिरोज‌्’ असे या ग्रुपचे नाव आहे. हा अभ्यास ‘पास जी-एन’ नावाच्या एआय पासवर्ड क्रॅकरवर केंद्रित आहे. त्यांनी १५,६८०,००० पासवर्डची यादी तपासली आहे. अभ्यासात दिसून आले आहे की, एआय ६० सेकंदांपेक्षा कमी वेळेत ५१ टक्क्यांपेक्षा जास्त पासवर्ड क्रॅक करू शकते. अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त एका मिनिटात सोपे पासवर्ड क्रॅक करण्यास सक्षम आहे, ही दिलासा देणारी बाब आहे. ते लहान पासवर्डचा सहज अंदाज लावू शकते. म्हणजेच तुम्ही तुमचे नाव किंवा जन्मतारीख पासवर्ड म्हणून वापरत असाल तर ते शोधणे एआयला खूप सोपे होईल. त्यामुळेच सध्या आपण या धोक्यापासून दूर राहण्यासाठी काही काळजी घेऊ शकतो. त्यातील एक भाग म्हणजे पूर्वीपेक्षा अधिक क्लिष्ट, गुंतागुंतीचा पासवर्ड ठेवून आपण आपल्या महत्त्वपूर्ण माहितीची, विदेची, संदर्भांची सुरक्षा वाढवू शकतो.

एआयला अक्षर संयोजनासह पासवर्ड शोधण्यासाठी जास्त वेळ लागतो. अभ्यासात दिसून आले आहे की, १८ किंवा त्याहून अधिक अक्षरे असणारे पासवर्ड एआय पासवर्ड क्रॅकर्सपेक्षा अधिक सुरक्षित आहेत. १८ वर्णांचा पासवर्ड क्रॅक करण्यासाठी एआयला दहा महिने लागतील. तसेच एआयसाठी चिन्हे, संख्या, अपरकेसमधील अक्षरे आणि लोअरकेसमधील अक्षरांचे मिश्रण असणारे पासवर्ड क्रॅक करणे कठीण आहे. असे पासवर्ड सुरक्षित असतात, कारण ते डिक्रिप्ट करण्यासाठी एआयला बराच काळ लागू शकतो. ‘पास जी-एन’मधील जी-एन म्हणजे जनरेटर अ‍ॅडव्हर्सरियल नेटवर्क. हे मॅन्युअल पासवर्ड विश्लेषणाची गरज दूर करते आणि वापरकर्त्यांना स्वायत्तपणे पासवर्ड शिकू देते. म्हणूनच पासवर्ड-क्रॅकिंग एआयपासून सुरक्षित राहण्याचे काही मार्ग आता सर्वसामान्यांनी शिकून घ्यायला हवेत. त्यातील पहिली बाब म्हणजे सामान्य पासवर्ड वापरणे टाळायला हवे. सुरक्षेच्या दृष्टीने पासवर्डमध्ये किमान १५ वर्ण असणे आवश्यक आहे. त्यात चिन्हे, अक्षरे आणि संख्या यांचे मिश्रण असणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या खात्यांसाठीचे पासवर्ड सेव्ह करण्यासाठी पासवर्ड मॅनेजर वापर करता येईल. पासवर्डमध्ये किमान दोन अक्षरे लहान आणि कॅपिटल वापरावीत. सरावाची बाब म्हणून दर तीन ते सहा महिन्यांनी पासवर्ड बदलावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व खात्यांसाठी सामान्य पासवर्ड वापरणे टाळायला हवे. या सर्व पार्श्वभूमीवर चॅटजीपीटी म्हणजे काय आणि ज्याच्या आगमनानेच एआयवर गांभीर्याने चर्चा का सुरू झाली, हेदेखील पाहावे लागेल. चॅटजीपीटीने जागतिक बाजारपेठेत प्रवेश केला तेव्हा याविषयीच्या चर्चेचा वेग वाढला. बाजारात दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांनंतरच एक दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांपर्यंत तो पोहोचला असल्याने ही चर्चा होणे स्वाभाविकच होते. या एआयचे काम लाखो वेबसाइट्सवर उपलब्ध असलेल्या माहितीमध्ये बदल करणे आणि वापरकर्त्यांना प्रतिसाद देण्यासाठी सोप्या भाषेत रूपांतरित करणे हे आहे. त्याच्या मदतीने कोणत्याही विषयावर लेख लिहिता येतो. त्या विषयीची माहिती आधीपासूनच गुगलवर उपलब्ध आहे. हे जगातील विविध भाषांमध्ये कार्यरत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in