शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचे कुणी?

ऐन दिवाळीच्या धामधुमीत मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या बहुसंख्य परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला
शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचे कुणी?

मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये सध्या दिवाळी सण जोरात सुरू आहे. बाजारपेठा माणसांच्या गर्दीने अक्षरश: फुलून गेल्या आहेत. खरेदीसाठी एकच झुंबड उडाल्याचे चित्र बड्या शहरांमध्ये दिसत आहे. एकीकडे सण-उत्सवाचा उत्साह दिसून येत आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना चिंतेने व नैराश्याने ग्रासले आहे. मागील आठवड्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. हातातोंडाशी आलेले शेतातील उभे पीक पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसवे उभी राहिली आहेत. शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे. ज्या शेतात काबाडकष्ट केले, बी-बियाणे, खतांसाठी कर्ज घेतले, मेहनत केली, त्या पिकातून चारपैसे हाताला लागतील अशा आशा पल्लवित झालेल्या असतानाच, निसर्गाची अवकृपा झाली. ऐन दिवाळीच्या धामधुमीत मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या बहुसंख्य परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. परिणामी, अहमदनगर, नाशिक याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत शेती पाण्याखाली गेली. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ आणि जिंतूर तालुक्यातील काही भागांमध्ये, तसेच हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा, कळमनुरी तालुक्यासह काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होऊन काढणीला आलेल्या कापूस, सोयाबीन, ऊस, तूर आणि हळदीचे मोठे नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात अतिवृष्टीमुळे फळबागांचे नुकसान झाले आहे. पांढरे सोने असलेला कापूस, तसेच, सोयाबीन काळवंडले आहे. या आर्थिक नुकसानीने शेतकरीवर्ग अधिक चिंतातूर झाला आहे. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे नैराश्य येऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढीस लागण्याची भीती व्यक्त होत आहे. अशाप्रकारे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकरीबांधवांना दिलासा देण्यासाठी सरकारने तत्काळ पावले उचलण्याची गरज ओळखून माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचा दौरा जाहीर केला व त्यानुसार ते शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी शेताच्या बांधावर गेले. त्यांनी शेतकऱ्यांची गाऱ्हाणी ऐकली. ही गाऱ्हाणी सरकारच्या कानावर जावीत यासाठी त्यांनी त्यांच्याशी संवाद साधणाऱ्या शेतकऱ्यांनाच दूरचित्रवाहिन्यांच्या कॅमेऱ्यासमोर उभे केले. तसेच, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपले म्हणणेही मांडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार हे केवळ उत्सवप्रिय असून, शेतकऱ्यांप्रती ते अतिशय निर्दयीपणे वागत आहे. भावना नसलेले हे सरकार असून, त्यांच्याकडे भावनांचा दुष्काळ आहे. हे उत्सवी सरकार, उत्सव साजरे करताना राज्यातील प्रजा दु:खात आहे, हेदेखील पाहत नाही. माझ्याशी आणि शिवसेनेशी गद्दारी केली; मात्र बळीराजाशी गद्दारी करू नका, अशी टीका ठाकरे यांनी केली. त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी केली. हे सरकार बेदरकारपणे सांगतेय की, ओला दुष्काळ जाहीर करण्याची स्थिती नाही. शेतकरी संकटात असताना मी इथे आलो, कारण शेतकऱ्यांच्या नुकसानीची स्थिती राज्यातील आणि देशातील जनतेला कळायला हवी. संकटे येत असतात, त्या काळात सरकारला तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसला, तरी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारचे घटक पक्ष तुमच्या पाठीशी आहेेत. शेतकरी म्हणून एक व्हा, शेतकऱ्यांनी आसूड वापरायला हवा, आसूड तुमच्या हातामध्येच शोभून दिसतो. शेतकऱ्यांनी आसूडाच्या माध्यमातून सरकारला घाम फोडला पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. सरकारला पाझर फुटत नसेल, तर आम्ही त्यांना घाम फोडू, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. घोषणांची अतिवृष्टी करणाऱ्या सरकारकडे भावनांचा दुष्काळ आहे. हे सरकार उत्सवात मग्न आहे. काही झाले तरी तुम्ही धीर सोडू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली. आता ठाकरे यांच्या दौऱ्यावरून राजकारण सुरू झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याऐवजी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी ठाकरे यांच्यावर टीकेची सरबत्ती केली आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना अडीच वर्षांमध्ये काहीही केले नाही. ते फक्त घरात बसून होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अगोदर त्यांच्यावरच आसूड ओढावा, अशी खरमरीत टीका भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केली आहे. ठाकरे यांचा दौरा केवळ चोवीस मिनिटांचा असल्याचे टीकास्त्र सोडत, सध्या ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती नाही, असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. मुळात ठाकरे यांच्या दौऱ्यावर टीका करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. सध्या शेतकरी अडचणीत आहेत. त्यांना सरकारने दिलासा देऊन त्यांचे अश्रू पुसायचे नाही तर कुणी?

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in