माळ कोणाच्या गळ्यात?

राहुल गांधी यांनीच पुन्हा अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी, अशा आशयाचे प्रस्ताव एकामागून एक संमत केले जात आहेत.
माळ कोणाच्या गळ्यात?

प्रदिर्घ कालखंडानंतर देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये निवडणुका होत आहेत. पक्षाचा अध्यक्ष निवडण्यासाठी १७ ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदासाठी केवळ एकच अर्ज आल्यास ही निवडणूक बिनविरोध होणार हे उघड आहे. एकीकडे काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांची नावे चर्चेत असताना दुसरीकडे विविध राज्यांच्या प्रदेश काँग्रेस समित्यांकडून पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा एकदा सांभाळलेले राहुल गांधी यांनीच पुन्हा अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी, अशा आशयाचे प्रस्ताव एकामागून एक संमत केले जात आहेत. एकीकडे, शशी थरूर आणि अशोक गेहलोत यांच्यात लढत होणार अशी हवा आहे, तर विविध राज्यातील काँग्रेस पक्षामधील घडामोडी पाहता अध्यक्षपदाची माळ पुन्हा राहुल गांधी यांच्या गळ्यात पडणार का, याविषयी तर्क-वितर्क लढविले जात आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे २५ ते २८ सप्टेंबरदरम्यान काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नवी दिल्लीस जात आहेत, अशी माहिती गहलोत यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मंगळवारी रात्री घाईगडबडीत आपल्या पक्षाच्या आमदारांची एक बैठक आपल्या निवासस्थानी बोलाविली होती; मात्र या बैठकीला गेहलोत यांचे कट्टर विरोधक सचिन पायलट अनुपस्थित होते. सचिन पायलट हे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होण्यासाठी ज्या दिवशी केरळला गेले, त्याच दिवशी अशोक गेहलोत यांनी ही बैठक आयोजित केली होती. ‘मी जरी दिल्लीला गेलो तरी राज्याची काळजी घेणे आपण सुरूच ठेवू’, असे पक्षाच्या आमदारांना गेहलोत यांनी सांगितल्याचे समजते. याचाच दुसरा अर्थ राजस्थानवरची आपली पकड सोडण्याची त्यांची तयारी नसल्याचे दिसून येते. गेल्या सोमवारी, खासदार शशी थरूर यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. अध्यक्षपदाची निवडणूक मोकळ्या आणि पारदर्शी वातावरणात होईल, असे या भेटीदरम्यान थरूर यांना सांगण्यात आले. ज्या कोणाला ही निवडणूक लढवायची आहे ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात, असे त्यांना सांगण्यात आले. अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची तयारी शशी थरूर यांनी दर्शविल्याची चर्चा आहे; पण शशी थरूर किंवा अशोक गेहलोत या दोघांपैकी कोणीही अद्याप, आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार असल्याचे अधिकृतपणे स्पष्ट केलेले नाही. २२ वर्षांपूर्वी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी जी निवडणूक झाली होती, त्यामध्ये पक्षाच्या विद्यमान हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि जितेंद्र प्रसाद यांच्यात लढत झाली होती. त्यामध्ये जितेंद्र प्रसाद पराभूत झाले होते. आता सोनिया गांधी या अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट संकेत आहेत. राहुल गांधी यांनी, विविध प्रदेश काँग्रेस समित्यांकडून आग्रह झाला असतानाही निवडणूक लढण्यास नकार दिला, तर गेहलोत आणि थरूर यांच्यात या पदासाठी निवडणूक होईल, असे बोलले जात आहे. आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार की नाही, याबद्दल राहुल गांधी यांनी अद्याप काहीच म्हटलेले नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी केले आहे. त्याच वेळी, राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी, यासाठी विविध राज्यांमध्ये जे प्रस्ताव होत आहेत त्यामध्ये गैर काय, असा प्रश्न वेणुगोपाल यांनी विचारला आहे. दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी, काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका कोणीही लढवू शकतो. त्यासाठी राहुल गांधी वा सोनिया गांधी यांची अनुमती घेण्याची गरज नाही, असे म्हटले आहे. एकीकडे, राहुल गांधी यांनी अध्यक्ष व्हावे म्हणून विविध प्रदेश समित्या ठराव करीत असताना काँग्रेसमधील ‘जी- २३’ या बंडखोर गटातील नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, राहुल गांधी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्यास विरोध केला आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक व्हावी आणि त्यात राहुल गांधी यांनी भाग घ्यावा, अशी पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून सध्या सगळीकडे जोरदार मंथन सुरू आहे. अध्यक्षपदाची निवडणूक होणार की, राहुल गांधी यांच्याच गळ्यात पुन्हा अध्यक्षपदाची माळ पडणार इथपर्यंत चर्चा सुरू आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ‘भारत जोडो’ यात्रा, प्रदेश समित्यांकडून राहुल गांधी समर्थनार्थ होत असलेले प्रस्ताव हे सर्व पाहता वारे कोणाच्या दिशेने वाहत आहेत त्याची कल्पना यावी! पाहू या माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते ते!

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in