माळ कोणाच्या गळ्यात?

पक्षश्रेष्ठींना देण्यासंदर्भातील प्रस्ताव संमत करण्यासाठी रविवारी जयपूरमध्ये काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली
माळ कोणाच्या गळ्यात?

काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष निवडण्यासाठी येत्या १७ ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात आतापर्यंत अशोक गेहलोत, तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांची नावे चर्चेत होती. पण राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या समर्थकांनी जो बंडाचा झेंडा फडकविला त्यामुळे काँग्रेस श्रेष्ठींच्या मनात जे होते त्यावर पाणी फिरले गेले. ‘एक व्यक्ती, एक पद’ यानुसार अशोक गेहलोत हे मुख्यमंत्री किंवा काँग्रेस अध्यक्षपद यावर राहू शकले असते. गेहलोत यांना दोन्ही डगरीवर पाय ठेवून राहून राजकारण खेळायचे होते. जर मुख्यमंत्रीपद सोडावे लागले तर आपल्याशी एकनिष्ठ असलेल्या नेत्याचीच या पदावर निवड व्हावी, असे त्यांना वाटत होते. मध्यंतरी शशी थरूर हे काँग्रेस पक्ष सोडणार , अशीही चर्चा होती. नवा मुख्यमंत्री निवडण्याचे अधिकार पक्षश्रेष्ठींना देण्यासंदर्भातील प्रस्ताव संमत करण्यासाठी रविवारी जयपूरमध्ये काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. पण त्या बैठकीकडे गेहलोत समर्थक ९२ आमदारांनी पाठ फिरविली. या बैठकीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून आलेले अजय माखन आणि मल्लीकार्जुन खर्गे यांना तेथून हात हलवीत परत यावे लागले! गेहलोत यांच्या जागी सचिन पायलट यांच्या नावाची चर्चा होत होती. पण गेहलोत यांचा पायलट यांच्या नावास कडाडून विरोध होता. त्यातूनच गेहलोत समर्थक असलेल्या आमदारांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. राजस्थानमधील घडामोडीमुळे जे आडाखे बांधण्यात आले होते ते पार कोलमडले! गेहलोत यांची आतून फूस असल्यानेच या आमदारांनी बंडाचा पवित्रा घेतला, हे सांगायला कोणा राजकीय विश्लेषकाची गरज नाही. गेहलोत यांच्या समर्थकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षाला जबर धक्का बसला. आता अशोक गेहलोत ‘बॅकफूट’वर गेले आहेत. गेहलोत यांनी, जयपूरमध्ये घडलेल्या घडामोडीची आणि पक्षाच्या आमदारांच्या समांतर बैठकीची आपल्याला कल्पना नव्हती, असे स्पष्टीकरण दिले आहे. काँग्रेस पक्षात यावरून जे वादळ उठले ते लक्षात घेता झालेल्या प्रकारांबाबत पक्षश्रेष्ठींची माफी मागण्याशिवाय गेहलोत यांच्यापुढे पर्याय उरला नाही. गेहलोत यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे एकीकडे भारत जोडण्यास निघालेल्या काँग्रेसला पक्षातील बंड शमविण्यासाठी धावपळ करावी लागली. राजस्थानमध्ये घडलेल्या घडामोडींनंतर अशोक गेहलोत हे पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी १० जनपथवर धडकले. राजस्थानमधील घटनांबद्दल गेहलोत यांनी सोनिया गांधी यांची सपशेल माफी मागितली. अशोक गेहलोत यांच्या नावाचा अध्यक्षपदासाठी मोठ्या विश्वासाने विचार करण्यात आला होता. पण गेहलोत यांच्या छुप्या आशीर्वादाने त्यांचे समर्थक आमदार जी खेळी खेळले त्यामुळे गेहलोत यांच्या विश्वासार्हतेला जबरदस्त तडा गेला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींची खप्पामर्जी ओढवून घेतलेल्या अशोक गेहलोत यांच्या मुख्यमंत्रीपदावर आज ना उद्या गदा येऊ शकते. राजस्थानमधील चित्र एक- दोन दिवसांमध्ये स्पष्ट होईल आणि नवा मुख्यमंत्री कोण हे कळेल, असे पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी मलप्पुरम येथे बोलताना स्पष्ट केले आहे. पक्षश्रेष्ठींच्या ‘आशीर्वादा’मुळे त्यांना काँग्रेसचे अध्यक्षपद मिळण्याची दाट शक्यता होती पण आता त्यापासून ते दुरावले. सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर, आपण अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार नसल्याचे गेहलोत यांनी घोषित केले. आता काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिग्विजयसिंह हेही उतरले आहेत. शशी थरूर यांनी या आधीच अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी दिग्विजयसिंह आणि शशी थरूर यांच्यात लढत होण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपत आहे. अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे, कमलनाथ, मीरा कुमार, मुकुल वासनिक, कुमारी सेलजा, अंबिका सोनी, पवनकुमार बन्सल आदी नावांची चर्चा आहे. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास खर्गे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास तयार असल्याचे त्यांच्या एका निकटवर्तीने म्हटले आहे. गांधी घराण्यातील कोणीही निवडणूक रिंगणात उतरणार नाही. असे असले तरी काँग्रेसचे एक खासदार अब्दुल खलीक यांनी, प्रियांका गांधी यांना पक्षाध्यक्ष करावे, अशी मागणी केली आहे. प्रियांका गांधी या गांधी परिवाराचा भाग नसल्याने त्यांच्या नावाचा विचार करावा, असा युक्तिवाद या खासदाराने केला आहे. शशी थरूर हे काँग्रेसच्या ‘जी - २३’ गटातील आहेत. त्यामुळे निवडणुकीत त्यांना पक्षश्रेष्ठींच्या ‘आशीर्वाद’ मिळण्याची शक्यता कमी आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भातील चित्र लवकरच स्पष्ट होईल. अध्यक्षपदाची निवडणूक होणार की बिनविरोध निवड होऊन अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in