शस्त्रसंधी का आणि कशी झाली?

ऐन भरात असलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ अचानक का स्थगित झाले? भारत पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी कशी काय झाली? अब्जावधींचा निधी देणाऱ्या अमेरिकेचा शत्रू लादेनला आश्रय देणारा पाक भारतासाठी विश्वासार्ह कसा झाला? वारंवार आपल्या पाठीत खंजीर खुपसणारा आणि दहशतवाद पोसणाऱ्या पाकच्या एका फोनवर आपण शस्त्रसंधी केली? अमेरिका श्रेय का घेते आहे? याबद्दल भारत सरकारला मिठाची गुळणी टाकून बोलावेच लागेल.
शस्त्रसंधी का आणि कशी झाली?
Published on

देश-विदेश

भावेश ब्राह्मणकर

ऐन भरात असलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ अचानक का स्थगित झाले? भारत पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी कशी काय झाली? अब्जावधींचा निधी देणाऱ्या अमेरिकेचा शत्रू लादेनला आश्रय देणारा पाक भारतासाठी विश्वासार्ह कसा झाला? वारंवार आपल्या पाठीत खंजीर खुपसणारा आणि दहशतवाद पोसणाऱ्या पाकच्या एका फोनवर आपण शस्त्रसंधी केली? अमेरिका श्रेय का घेते आहे? याबद्दल भारत सरकारला मिठाची गुळणी टाकून बोलावेच लागेल.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे एकाचवेळी दहशतवाद्यांच्या एकूण नऊ ठिकाणांवर जबर हल्ले केले. केवळ पाकव्याप्त काश्मीरच (पीओके) नाही, तर थेट पाकिस्तानात आणि ते सुद्धा पंजाब प्रांतातील दहशतवादी स्थळे अचूकपणे उद्ध्वस्त केली. पाक एवढा हादरला की, त्याने सीमेबरोबरच भारतीय शहरे आणि सैन्य ठिकाणांवर ड्रोन, क्षेपणास्त्र आणि मानवविरहीत वाहन (यूएव्ही) यांच्याद्वारे हल्ला चढविला. भारतीय सैन्याची जय्यत तयारी, शस्त्रांची उपलब्धता आणि कार्यक्षमता यामुळे हे हल्ले निकामी ठरले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तसेच तुर्की व चीनच्या संरक्षण सामग्रीद्वारे पाकचा प्रयत्न फसला. प्रतिहल्ला करताना पाकची सैन्य ठिकाणे लक्ष्य करून तेथे जबर धमाका भारतीय सैन्याने उडवून दिला. सर्वच आघाड्यांवर भारताने लक्षणीय आघाडी मिळवली. हडबडून गेलेल्या पाकची बाजू कमालीची लंगडी बनली आणि नेमक्या त्याचवेळी शस्त्रसंधीची घोषणा झाली. ज्या पहलगाम हल्ल्यामुळे संपूर्ण भारतवासीयांमध्ये तीव्र संताप होता तो ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे विजय आणि उत्सवात रूपांतरित झाला. परंतु, अनपेक्षित शस्त्रसंधीमुळे यावर विरजण पडले. सारासार विचार करता शस्त्रसंधी आवश्यक होतीच; मात्र, त्याचे टायमिंग चुकले की साधले? ती करण्यात आली की दबावामुळे झाली? या शस्त्रसंधीचे श्रेय अमेरिका का घेते आहे? भारताने अद्याप त्याचे खंडन का केले नाही? देशभरात निर्माण झालेले संशयाचे धुके दिवसागणिक दाट होते आहे.

पहलगाम हल्ला झाला २२ एप्रिल रोजी. त्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित करणे, पाकिस्तानींचा व्हिसा रद्द करून त्यांना मायदेशी पाठवणे, देशोदेशीच्या राजदूतांना हल्ल्याची माहिती देणे, पाक विमानांसाठी हवाई हद्द बंद करणे, व्यापार पूर्णपणे थांबवणे आदी निर्णय घेतले. दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी भारताने पाककडे केली. आठवड्याभराचा अवधीही दिला. नेहमीप्रमाणे पाकने उलट्या बोंबा मारून वेळ घालवला. अखेर ७ मेच्या मध्यरात्री भारतीय सैन्याने पीओकेसह पाकमधील नऊ दहशतवादी स्थळे अचूक नष्ट केली. भारतीय सीमेवर गोळीबार आणि हल्ल्याद्वारे केविलवाणा प्रयत्न पाकने केला. भारताने तो हाणून पाडला. भारतीय सैन्य स्थळे आणि शहरांच्या दिशेने ड्रोन आणि क्षेपणास्त्र पाकने डागले. भारतीय सैन्याने मजबूत हवाई संरक्षण प्रणालीच्या माध्यमातून पाकचा हल्ला अयशस्वी केला. भारताचे कुठलेही नुकसान होत नसल्याचे पाहून पाक आणखीच बिथरला. देशांतर्गत आणि जगभरामध्ये होत असलेली नाचक्की लक्षात घेता पाकने अण्वस्त्रांची धमकी देण्याचे शस्त्र परजले आणि अचानक १० मे रोजी दुपारी भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्रींनी पत्रकार परिषदेत घोषणा केली की, “पाक लष्कर युद्ध महासंचालकांनी (डीजीएमओ) दुपारी तीन वाजता भारतीय लष्कर युद्ध महासंचालकांना फोन केला. शस्त्रसंधीची विनंती केली. भारताने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. आज सायंकाळी ५ वाजेपासून शस्त्रसंधी लागू होत आहे. दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये पुढील संवाद १२ मे रोजी होईल.”

अण्वस्त्र देशांमध्ये तयार झालेला तणाव, छेडली गेलेली सैन्य कारवाई आणि युद्धाच्या दिशेने होणारी वाटचाल ही चिंताजनकच. युद्ध हा सक्षम पर्याय नसला आणि त्याने सर्व साध्य होत नसल्याने शस्त्रसंधीचे स्वागतच आहे; मात्र, ज्या क्षणाला ती घोषित झाली त्यावरून शंकाकुशंकांचे जे मोहोळ तयार झाले त्याचे काय? काही नाट्यमय घडामोडीही घडल्या. अनपेक्षितरीत्या अमेरिका आणि त्याचे सर्वेसर्वा डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणा अनेक प्रश्न निर्माण करतात. आश्चर्य म्हणजे यासंदर्भात भारत सरकारने ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ का ठेवले?

‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू झाले त्यावेळी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीही अमेरिकेची भूमिका आमचा काही संबंध नाही, अशी होती. तसे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि परराष्ट्र सेक्रेटरी मार्के रुबिओ यांनी तसे माध्यमांसमोर स्पष्ट केले. धक्कादायक म्हणजे, मिस्त्रींच्या पत्रकार परिषदेपूर्वीच ट्रम्प यांनी ट्विट करून शस्त्रसंधीची घोषणा केली. शस्त्रसंधीसाठी अमेरिकेने दोन्ही देशांशी दिवसभर चर्चा केल्याचेही नमूद केले. हे कसे काय? अमेरिकेची शस्त्रसंधीत काय आणि किती भूमिका? ट्रम्प यांनी आणखी एक ट्विट करून जगात दवंडी पिटली की, व्यापार थांबवण्याच्या धमकीद्वारे आम्ही भारत आणि पाकिस्तान यांना शस्त्रसंधी करण्यास भाग पाडले. त्याचबरोबर ट्रम्प यांनी अमेरिकेत माध्यमांशी, तर सौदी अरेबिया दौऱ्यात भाषण करताना भारत आणि पाक यांच्यातील शस्त्रसंधीचे श्रेय स्वतःकडे घेतले. एवढ्यावरच ते थांबले नाही, तर काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी मी सक्रिय राहीन, असेही सांगितले. या साऱ्या प्रकारात भारताने चुप्पी धरल्याने संशयाचे भूत नाचत आहे.

भारताने अद्यापही ट्रम्प यांच्या एकाही ट्विटला किंवा दाव्याला उत्तर दिलेले नाही, की त्याचे खंडन केलेले नाही, असे का? भारत अमेरिकेला घाबरतो का? की अमेरिकेने असा कुठला सज्जड दम भारताला दिला आहे? ‘माय डिअर फ्रेन्ड’ म्हणणारे ट्रम्प यांची मोदींशी मैत्री नाही? की तो केवळ दिखावा आहे? ‘नमस्ते ट्रम्प’ आणि ‘हाऊ डी मोदी’ या जगभर गाजलेल्या कार्यक्रमांचे काय? अमेरिका ही भारत आणि पाकिस्तानला एकाच पातळीवर कशी मानू शकते? पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने पाकला खडसावले का नाही? त्यांच्यावर निर्बंध का लादले नाही? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकला अब्जावधीचे कर्ज मंजूर केले. त्यात अमेरिकेने हस्तक्षेप का केला नाही? भारत-अमेरिका संबंध केवळ ‘बोलाचा भात आणि बोलाची कढी’ आहे? की दाखवायचे आणि खायचे दात वेगळे? ते कुणाचे?

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केवळ एवढेच स्पष्ट केले की, काश्मीर प्रश्नात तिसरा देश किंवा संस्थेचा हस्तक्षेप नाही. भारत आणि पाकिस्तान हे दोघेच तो प्रश्न सोडवतील, त्यावर चर्चा करतील. तसेच, भारतीय नेते आणि अधिकाऱ्यांशी अमेरिकेच्या प्रतिनिधींची चर्चा झाल्याचे त्यांनी कबूल केले; मात्र, त्यात काय चर्चा झाली? ते अनुत्तरितच राहिले.

‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने निर्णायक आघाडी घेऊनही माशी कुठे शिंकली? विश्वासघातकी पाकच्या एका फोनवर आपण विश्वास ठेवला, तो कसा? दहशतवाद्यांना तो पोसतो म्हणून आपण ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आणि काही तासांमध्येच पाक आपल्यासाठी विश्वासार्ह कसा बनला? शस्त्रसंधीनंतरही भारतावर पाकने हल्ले केले, तरीही आपण शस्त्रसंधीवर कायम का राहिलो? आपल्यावर कुणी आणि का दबाव आणला? पंतप्रधान मोदींनी सांगितले की, अण्वस्त्राच्या ब्लॅकमेलिंगला आम्ही बधणार नाही. म्हणजे, तो प्रयोग भारतावर झाला का? म्हणून शस्त्रसंधी झाली का? अमेरिकेचा दबाव झुगारूनच आपण अण्वस्त्र चाचणी केली, १९७१मध्ये युद्ध करून पाकिस्तानचे दोन तुकडे केले. मग, आता आपण अमेरिकेच्या दबावात का आलो? भारताची मुत्सद्दी कमी पडली का? आपण विश्वगुरू म्हणत स्वतःची पाठ थोपटवून घेतो, पण पाकला एकाही देशाने दोषी ठरवले नाही. कुणीच पाकवर निर्बंध लादले नाही की, त्यांच्याशी व्यापार करणार नाही, असे घोषित केले नाही. याउलट चीन व तुर्कीने पाकला शस्त्रास्त्रे पुरवली. दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि मृतांपैकी श्रद्धांजली अर्पण करण्याचे कोरडे सोपस्कार अनेक देशांनी पार पाडले. त्यात आपण समाधानी आहोत? पुलवामा हल्ल्यानंतर ना खटला चालला ना दोषी सापडले. आताही तसेच होणार का? पहलगामचे आरोपी मोकाटच राहणार? ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये किती भारतीय ठार झाले? किती जवान शहीद झाले? लढाऊ विमान किंवा शस्त्रास्त्रांची किती हानी झाली? सीमेवर किती मालमत्तेचे नुकसान झाले? देशवासीयांच्या शंकानिरसनासाठी तिरंगा यात्रा काढली जात आहे का? शस्त्रसंधी का आणि कशी झाली? हे कोडेच राहणार की, देशाला त्याचा उलगडा होणार? एकतर्फी संवाद साधणारे पंतप्रधान पत्रकार परिषद घेणार की, सर्वपक्षीय बैठक बोलवून त्यास उपस्थिती लावणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे जोपर्यंत भारतीयांना मिळत नाहीत, तोवर शंकेचा धूर आकाश व्यापत राहील. त्यात मात्र सैन्याचा पराक्रम झाकोळला जाईल. शिवाय राजकीय किंवा अन्य स्वरूपाचे श्रेय घेणेही दुरापास्तच ठरेल.

संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक व मुक्त पत्रकार.

bhavbrahma@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in