दखल
प्रभा पुरोहित
मानसिक एकटेपणा, आळस, सोप्या मार्गांचा शोध आणि कळपात राहण्याची आवड यामुळे लोक बाबा-बुवांकडे आकर्षित होतात. त्यांच्या प्रभावी मार्केटिंगमुळे ही गर्दी वाढते. वैज्ञानिक दृष्टिकोन, जादूटोणाविरोधी कायदा आणि मानसिक आरोग्य सुविधांनी ही गर्दी कमी करता येऊ शकते.
बाबा, बापू, माता इत्यादींकडे लोक प्रचंड संख्येने जातात, हे वास्तव आहे. ज्याअर्थी एवढ्या मोठ्या संख्येने स्त्री-पुरुष बुवांकडे जात आहेत, त्याअर्थी हे उघड आहे की, हे बाबा-बुवा त्यांची कुठली ना कुठली गरज पूर्ण करत आहेत किंवा ही माणसे त्यांच्या जबरदस्त मार्केटिंगला बळी पडत आहेत. अशा कोणत्या गरजा वा मनाचा कमकुवतपणा लोकांना बुवाच्या दरबारात आणून हजर करत आहे, हे पाहूया.
आजच्या वेगवान जगात माणसाला एकटेपणा जाणवत असतो. ‘हे दिवसही जातील आणि सर्व काही ठीक होईल’ असा दिलासा देणारे बाबा, माता अशा वेळी आपलेसे वाटतात.
बाबा करायला सांगत असलेल्या गोष्टी त्याच्या, तिच्या आवाक्यातील असतात, मग त्या निरर्थक का असेनात. बाबा सांगतो माझे/देवाचे नाम घे किंवा ते नाम वहीमध्ये भरभरून लिही. माझ्या पादुकांची पूजा कर वा उपवास कर. हे सर्व करणे त्याला सहज शक्य असते. त्यामुळे बाबांकडील गर्दी वाढत जाते.
माणूस हा जन्मतःच आळशी आणि निष्क्रिय प्राणी आहे. तो सतत सोप्या पर्यायांच्या शोधात असतो. परंतु बुवाबाजी हा पर्यायच नाही, हे एकतर त्याला उमगत नाही. चांगली नोकरी मिळवण्यासाठी नवी कौशल्ये आत्मसात करणे, धंद्यात भरभराटीसाठी अथक परिश्रम करणे आणि नवनव्या कल्पनांचा विचार करणे आवश्यक आहे. लवकर लग्न जुळवायचे तर पत्रिका, जात, पोटजात, गोरेपण अशा निरर्थक गोष्टी विचारात घेऊ नयेत.
अभ्यासातील यशासाठी अभ्यासाचे तास वाढवणे, योग्य मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. असे कठीण पण विवेकी मार्ग बाबा सांगत नाहीत. त्यामुळे ते लोकप्रिय होतात.
माणसाला कळपात राहायला आवडते. एखाद्या गटात सामील होण्यास तो उत्सुक असतो. बाबाची लबाडी कळूनही या उबदारपणासाठी तो बाबा-बुवांच्या कळपात शिरतो. बाबाचा बिल्ला लाव, ठराविक पोशाख कर. उदाहरणार्थ, एका मांच्या स्त्रीभक्त पांढरी साडी नेसतात. एका बापूचे भक्त, दुसरा भक्त भेटला की, ‘हरि ॐ’सारखा परवलीचा शब्द उच्चारतात. अशा साध्या गोष्टींमधून त्यांच्यात एकजुटीची भावना निर्माण होते. अशा संघटित जीवनाची माणसाची ओढ बाबा, माता पूर्ण करत असतात. तिथे अनुभवास येणारे जेवण, जपजाप, भजन असे सामूहिक जीवन सुखावणारे वाटते.
आपल्याकडे पूर्वापार गुरू महात्म्याचे मोठे स्तोम आहे. बाबा-बुवांकडे जाण्याला समाजमान्यता असते. त्यांच्यापासून येणाऱ्या आनंदलहरींनी आजार बरे होतात असा जोरदार प्रचार चालू असतो. दुर्धर आजार बरा झाल्याची गोष्ट तपासू गेल्यास ती कुठल्यातरी दूरच्या गावी घडल्याचे सांगण्यात येते. लोकांचा कर्मविपाकाच्या सिद्धांतावर एवढा जबरदस्त विश्वास असतो की, बाबाचे शब्द खरे ठरले तर त्याचे श्रेय बाबाला आणि खोटे ठरले तर पूर्वजन्मीच्या पापाला दोषी ठरवले जाते.
स्त्रियांसाठी तर कित्येकदा गुरूच्या मठात जाणे ही एकमेव हक्काची उसंत ठरते. मी एकटी वा मैत्रिणींबरोबर चौपाटीवर फिरायला जाते म्हटले तर भुवया उंचावतात, परंतु मी हरे कृष्ण मंदिरात प्रवचनाला जाते म्हटल्यावर ती अभिमानाची बाब ठरते.
स्त्रियांना समाजात आणि कुटुंबात दुय्यम स्थान असते; त्या दुर्लक्षित असतात. नेमका याच गोष्टीचा पुरेपूर फायदा स्त्रीलंपट बाबा घेत असतात. पुण्याचे वाघमारे, लातूरचे मल्लिनाथ, गुजरातचे आसारामबापू अशा या स्त्रियांशी गैरवर्तन करणाऱ्या बाबा-बुवांचा सुकाळ आहे. बऱ्याच वेळा ते स्त्रियांची भावनिक आणि शारीरिक भूक भागवत असतात. त्यामुळे फारसा प्रतिकार होताना दिसत नाही.
बुवाबाजीच्या प्रसाराला एक फार मोठी आर्थिक बाजू आहे. विशिष्ट देवस्थान हमखास नवसाला पावणारे आहे, सर्व संकटे दूर करणारे देवस्थान आहे, असा पद्धतशीर प्रचार केला जातो आणि त्यांच्या आश्रयात बुवाबाजी फोफावते. हा हा म्हणता त्या जागी विविध व्यवसायांचे जाळे उभे राहते. आधी चहाची टपरी, मग उपहारगृह, त्यानंतर अतिथीगृह, फुले-बिल्ले-माळांची दुकाने जागोजागी उगवतात. वाहतूक व्यवसायही तेजीत असतो. एका ठराविक मार्गावर अपघातांचे प्रमाण का वाढले, याचा शोध घेतला असता वाहतूक खात्याला पोटावर हात फिरवून पुत्रप्राप्ती करून देणाऱ्या भावनगरच्या पार्वतीमाचा शोध लागला. या व्यवसायात आर्थिक लाभ होणारे लोक या स्थानांचा आणि बुवांचा जोरदार प्रचार करतात.
ज्यांच्या जीवनात अनिश्चिततेची सतत टांगती तलवार असते आणि मन त्याला सामोरे जाण्यास कमकुवत असते, असे लोक बाबा-बुवांच्या जाळ्यात येतात. माझी फिल्म चालेल की पडेल, माझे शतक झळकेल की मी शून्यावर बाद होईन, अशा संभ्रमात असलेल्या नटाला वा खेळाडूला गुरू-बाबाची उपासना दिलासा देते.
आपल्या देशाला हजारो वर्षांची आध्यात्मिक परंपरा आहे. इथे पोथ्या-पुराणांची रेलचेल आहे. हे वातावरण बुवाबाजीला अत्यंत पोषक ठरते.
ही गर्दी कमी करण्यासाठी, विज्ञानाचा सूर्य जसजसा वर येऊ लागेल, तसतसा अंधश्रद्धेचा अंध:कार आपोआप दूर होईल, असे वाटले होते. परंतु झाले उलटेच. विज्ञानाचाच वापर अंधश्रद्धा प्रसारासाठी होऊ लागला. गणपती दूध पिऊ लागला, ही चंद्रास्वामींनी दिल्लीत पसरवलेली अफवा दूरदर्शन, दूरध्वनीमार्गे भारतातच नव्हे तर अमेरिकेतील गणेशभक्तांपर्यंत हा हा म्हणता पोहोचली. तेव्हा बाबा-बुवांचे मायाजाल कमी करण्यासाठी शालेय शिक्षणापासून मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याची गरज आहे. त्यांच्यात प्रश्न विचारण्याची चौकस बुद्धी विकसित करायला हवी. तेव्हाच हवेत हात फिरवून विभूती वा सोन्याची साखळी काढण्याची सत्यसाईबाबांची कृती हा चमत्कार नसून साधी हातचलाखी आहे, हे लोक समजू शकतील आणि बाबांच्या दरबारात होणारी गर्दी कमी होईल.
माणसाच्या अगतिकतेचा गैरफायदा घेणाऱ्या बाबावर वचक ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्याने अलीकडेच पारित केलेला जादूटोणाविरोधी कायदा नक्कीच उपयोगी पडेल आणि कालांतराने अशा कारवायांना काही प्रमाणात रोखणारा ठरेल, असे वाटते.
बाबाकडे गर्दी करणाऱ्यांमध्ये भीती, संशय, असूया किंवा औदासिन्य यांनी त्रस्त अशी बरीच माणसे असतात. त्यांना खरे तर मानसोपचाराची गरज असते. असे मानसोपचारतज्ज्ञ प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध हवेत. त्याचप्रमाणे समाजात मानसिक आजारांबद्दल योग्य ती जाणीव निर्माण करायला हवी, ज्यामुळे अशा गरजूंना बाबा-बुवांकडे जाण्याची वेळ येणार नाही.
आपले छंद, वा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांतून माणसाला आनंदी सामूहिक जीवन अनुभवता यायला हवे. सार्वजनिक क्रीडा केंद्र व छंदवर्ग, ध्यानधारणेसाठी शांत जागा अशा तऱ्हेची विरंगुळ्याची ठिकाणे व अवकाश अल्प मोबदल्यात जनतेला उपलब्ध व्हायला हवा. अशा सुविधा नागरी व सरकारी व्यवस्थापनाने दिल्या तर गुन्हेगारी, अनारोग्य यालाही आळा बसू शकेल आणि भोंदू बुवा-बाबांकडे जाणारी गर्दी पण आटोक्यात येईल.
सामाजिक कार्यकर्त्या