का कोसळतेय मोठ्या प्रमाणात वीज ?

वीज कोसळण्याच्या घटना, त्यामागचा कार्यकारणभाव आणि वैज्ञानिक सत्य जाणून घेणं गरजेचं आहे
का कोसळतेय मोठ्या प्रमाणात वीज ?

वारंवार वीज कोसळण्याच्या घटना नैसर्गिक दुर्घटनांपैकी सर्वात धोकादायक आणि रहस्यमय आहेत. भारतात दर वर्षी वीज पडण्याच्या एक कोटींहून अधिक घटना घडतात. त्यात सरासरी दोन ते अडीच हजार लोकांचा मृत्यू होतो. वाढत्या प्रदूषणामुळे या घटना वाढत असल्याचं संशोधकांचं मत आहे. म्हणूनच वीज कोसळण्याच्या घटना, त्यामागचा कार्यकारणभाव आणि वैज्ञानिक सत्य जाणून घेणं गरजेचं आहे.

बिहारमध्ये वीज पडून १७ जणांचा अकाली मृत्यू झाला. ही घटना ताजी आहे, मात्र एकमेव नाही. एकाच दिवशी वीज कोसळून अनेकांचा बळी जाणं ही अलीकडच्या काळात वारंवार बघायला मिळणारी दुर्घटना आहे. त्यामुळे आकाशीय वीज कशी तयार होते आणि ती पृथ्वीवर का पडते, असा प्रश्‍न पडणं स्वाभाविक आहे. वातावरणात उच्च वेगाने मोठ्या प्रमाणात विजेचं विसर्जन होण्याला ‘विद्युल्लता’ म्हणतात. या विजेचा काही अंश पृथ्वीवरही पडतो. ही वीज दहा किलोमीटर उंचीच्या ढगांमध्ये निर्माण होते. सहाजिकच या ढगांमध्ये ओलावा असतो. ढगांच्या वरच्या भागात तापमान उणे ३५-४५ अंश सेल्सिअस असतं. ढगांमध्ये साठलेलं बाष्प वरच्या दिशेनं जातं तसतसं गोठू लागतं. हे गोठलेले पाण्याचे थेंब ढगांमध्ये गेल्यावर स्फटिकात बदलू लागतात. वर जाताना पाण्याचे हे स्फटिक आकाराने इतके मोठे होतात आणि खाली पडू लागतात. यामुळे त्यांच्यामध्ये टक्कर होते. परिणामी, इलेक्ट्रॉनचा जन्म होतो. हा क्रम सतत चालू राहतो आणि इलेक्ट्रॉनची संख्याही वाढत जाते. या प्रक्रियेत ढगाच्या वरच्या भागात सकारात्मक चार्ज आणि मध्यभागी नकारात्मक चार्ज तयार होतात. ढगाच्या दोन भागांमध्ये एक ते १० अब्ज व्होल्टचा फरक असतो. अत्यंत कमी वेळेत एक ते दहा लाख अँपिअर विद्युतप्रवाह निर्माण होतो. यातला १५-२० टक्के प्रवाह पृथ्वीवर पडतो. त्यामुळे पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होऊ शकते.

पृथ्वीवर थेट वीज पडण्याच्या घटना तुलनेने फारच कमी आहेत; परंतु अप्रत्यक्ष विजेमुळेही मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, कारण त्यामध्ये भरपूर विद्युतप्रवाह असतो. ‘क्लायमेट रेझिलिएंट ऑब्झर्व्हींग सिस्टीम्स प्रमोशन कौन्सिल’ (सीआरओपीसी)ने भारतीय हवामान विभागाच्या सहकार्यानं विजेचा फटका बसलेल्या क्षेत्रांचा नकाशा प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार मध्य प्रदेशमध्ये वीज पडण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा आणि बंगालचा क्रमांक लागतो. या राज्यांव्यतिरिक्त बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्येही वारंवार वीज पडण्याच्या घटना घडतात. वीज पडण्याच्या घटना शहरी भागात कमी प्रमाणात बघायला मिळतात परंतु ग्रामीण भागात या घटना अत्यंत सामान्य आहेत. २०१९-२० या वर्षात देशात वीज पडण्याच्या एक कोटी ४० लाख घटनांची नोंद झाली. २०२०-२१ मध्ये अशा घटनांची संख्या एक कोटी ८५ लाखांपर्यंत वाढली. २०२१-२२ मध्ये या घटनांची संख्या एक कोटी ४९ लाख इतकी होती. कोरोनाच्या काळातल्या टाळेबंदीदरम्यान प्रदूषणात झालेली घट आणि वातावरण स्वच्छ राहिल्याने वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये घट झाली असल्याचंही लक्षात घ्यायला हवं.

वीज पडणं ही आपल्या देशात नैसर्गिक आपत्ती मानली जात नाही. अलीकडच्या काळात वीज कोसळणं थांबवणारी यंत्रणाही तयार झाली आहे. त्यामुळे जीवित आणि मालमत्तेची हानी कमी होण्यास मदत झाली आहे. वीज पडून होणाऱ्‍या मृत्यूंपैकी ९६ टक्के मृत्यू ग्रामीण भागात होतात. अशा स्थितीत ग्रामीण भागात वीज संरक्षण यंत्रं बसवण्यावर भर देण्याची गरज आहे हे या निमित्तानं समजून घ्यायला हवं. देशात दरवर्षी वीज कोसळण्याच्या घटना सरासरी एक कोटीहून अधिक प्रमाणात घडतात, यावरुनच या समस्येची तीव्रता समजू शकते. या घटनांमध्ये साधारणत: दोन ते अडीच हजार लोकांचा मृत्यू होतो. भारताप्रमाणेच जगाचीही तीच स्थिती आहे. जगभरात वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं. दरवर्षी पृथ्वीच्या पृष्ठभागाचं तापमान सरासरी ०.०३ डिग्री सेल्सियसने वाढत आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये पृथ्वीच्या जागतिक तापमानात सरासरी दीड अंशाने वाढ झाली आहे. यासोबतच महासागरांच्या पृष्ठभागाच्या पाण्याच्या तापमानात ०.६ ते १.८ अंश सेल्सिअसची वाढ नोंदवण्यात आली आहे. या बदलांमुळे वातावरणातली अस्थिरता आणि बाष्पाचं प्रमाण पूर्वीपेक्षा जास्त नोंदवलं जात असल्याचं शास्त्रज्ञांचं मत आहे.

प्रदूषण वाढत असल्यामुळे उंचावर तयार झालेल्या ढगांमध्ये अचानक अत्युच्च क्षमतेचा प्रवाह निर्माण होण्याची शक्यता वाढू लागली आहे. हा बदल वीज पडण्याच्या घटनांना कारणीभूत आहे. यामुळेच गेल्या ५२ वर्षांमध्ये भारतात वीज पडण्याच्या घटनांमध्ये तब्बल ३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हवामानशास्त्रज्ञांच्या मते विजेचे दोन प्रकार असतात. एका प्रकारची वीज ढगातून ढगात जाते तर दुसऱ्‍या प्रकारची वीज ढगातून पृथ्वीवर पडते. पावसाळ्यात शेत, मोकळं मैदान, झाडं किंवा उंच खांबांवर वीज पडण्याचा धोका जास्त असतो. मार्च २०२० पासूनच जगभरातल्या अनेक देशांमध्ये एकापाठोपाठ टाळेबंदी जाहीर होऊ लागली. मागील दोन वर्षांमध्ये मानवी जीवनावर खूप मोठे परिणाम दिसून आले. कोरोनानंतर मानवी जीवनशैलीत अनेक बदल स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. असेच अनेक बदल निसर्गातही झाल्याचं आता समोर आलं आहे. त्यात वीज पडण्याच्या घटना कमी होण्याचाही समावेश असल्याचं अभ्यासात आढळून आलं आहे.

टाळेबंदीच्या काळात लोकांनी अधिकाधिक वेळ घरात घालवला. ऊर्जेचा वापर कमी झाला, प्रवाशांच्या संख्येत मोठी घट झाली. यामुळे वायू प्रदूषण कमी झालं. पाणीही स्वच्छ झालं. यामुळे या काळात वीज कोसळण्याच्या घटनाही कमी झाल्याचं नवीन संशोधनातून दिसून आलं. वीज कोसळण्यामागील घटकांचा प्रभाव कमी झाल्यामुळे हा बदल घडल्याचं अभ्यासात आढळून आलं आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ‘सायन्स डायरेक्ट’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात दिसून आलं आहे की, टाळेबंदीमधील मानवी व्यवहारांमधून एरोसोल उत्सर्जन कमी झालं होतं. त्यामुळे वातावरणातल्या एरोसोलचं प्रमाणही कमी झालं. वातावरणातले एरोसोल वाफेमध्ये मिसळतात तेव्हा ढगांमध्ये पाण्याचे थेंब तयार होतात. एरोसोलचं प्रमाण वाढतं तेव्हा ढगांमधली पाण्याची वाफ अधिक थेंबांमध्ये वितरीत केली जाते. हे कारण नसेल तर थेंब लहान असतात तेव्हा त्यांचं मोठ्या थेंबात रूपांतर होण्याची शक्यता कमी असते. हे लहान थेंब ढगांमध्ये राहतात आणि लहान गारपीट आणि अगदी लहान बर्फाचे स्फटिक तयार करण्यास मदत करतात. लहान गारा आणि स्फटिक यांच्यातली टक्कर ढगांच्या मध्यापासून तळापर्यंत या गारांवर ‘निगेटिव्ह चार्ज’ आणते. त्याच वेळी ढगांच्या वरच्या भागात ‘पॉझिटिव्ह चार्ज’चे स्फटिक असतात. ढगांच्या दोन भागांमधल्या चार्जच्या या मोठ्या फरकामुळे वीज चमकणं किंवा पडणं यासारख्या घटना घडतात. प्रदूषण कमी असेल तर ढगांमध्ये मोठे आणि गरम पाण्याचे थेंब तयार होतात. अशा स्थितीत ढगांमध्ये बर्फाचे कण बरेच कमी होतात. त्यामुळे प्रभारात फारसा फरक होत नाही. त्यामुळेच ढगांमधून वीज चमकणं किंवा पडणं अशा घटना फारशा दिसत नाहीत. टाळेबंदीच्या काळात असाच काहीसा प्रकार घडला असावा.

कमी प्रदूषण असताना पडणाऱ्या विजेमध्ये दोन प्रकारचे थेंब संशोधकांना आढळून आले. त्यातले एका प्रकारचे थेंब जमिनीवर पडतात आणि दुसरे फक्त ढगांमध्ये चमकतात. याचाच परिणाम म्हणून मार्च २०२० ते मे २०२० च्या तुलनेत २०२१ च्या याच महिन्यांमध्ये विजेची चमक १९ टक्के कमी असल्याचं एका पाहणीत आढळून आलं. एरोसोलमध्ये लक्षणीय घट झालेल्या ठिकाणी वीज पडण्याच्या घटनांमध्येही मोठी घट झाल्याचंही संशोधकांना आढळून आलं. म्हणजेच आता या दृष्टीने वातावरणातलं प्रदूषण कमी करणं आणि इंधनाचा वापर अत्यंत मर्यादित ठेवणं किती गरजेचं आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. आपल्या या चुकीचे परिणाम आता सर्व अंगांनी जाणवू लागले आहेत. आधीच प्रचंड आणि बेशिस्त वाहतूक, वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे होणारे अपघात आणि त्यात जीव गमवणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. आता वीज पडल्यामुळे वाढणारी मृत्यूसंख्या आपल्याला परवडणारी नाही. म्हणूनच ती रोखण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न करणं गरजेचं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in