निवडणूक संपत असताना ही संभ्रमावस्था कशाला?

राज्य सरकारबद्दल संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला असून आताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल उमाळा का आला आहे? राष्ट्रवादीच्या शरद पवारांची नेहमी अशीच चाल असते की, लोकांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण करून राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न ते करतात.
निवडणूक संपत असताना ही संभ्रमावस्था कशाला?

-अरविंद भानुशाली

सह्याद्रीचे वारे

राज्य सरकारबद्दल संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला असून आताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल उमाळा का आला आहे? राष्ट्रवादीच्या शरद पवारांची नेहमी अशीच चाल असते की, लोकांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण करून राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न ते करतात.

सन २०१४ मध्ये शिवसेनेला भाजपपासून दूर ठेवण्यासाठी शरद पवारांनी निवडणूक निकाल येण्यापूर्वीच भाजपला पाठिंबा देऊन टाकला होता. त्या काळात शरद पवार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रेम उतू गेले होते. पवारांनी एकदा नव्हे तर दोन वेळा मोदी यांना बारामतीत नेऊन भोजन दिले होते. २०१९ पासून शरद पवार यांनी मोदींविरोधी भूमिका घेऊन भाजपला विरोध केला होता. आता तर पवारांनी मोदी यांच्याशी दोन हात केले आहेत. आता याच मंडळींची दुसरी संभ्रमावस्था मुख्यमंत्रीपदावरून सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीची समाप्ती होत असताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांमुळे मी २००४ मध्ये मुख्यमंत्री झालो नाही तर पवार म्हणतात, भुजबळांना मुख्यमंत्री केले असते तर राष्ट्रवादीत फूट झाली असती. तर एकनाथ शिंदेंना आम्ही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून नाव पुढे केले तेव्हा शिवसेनेचा अंतर्गत विरोध होता. शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले तर प्रारंभीच्या काळात शिंदेंचे नाव आम्ही पुढे केले तेव्हा भाजप नेत्यांनी विरोध केला असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. अडीच वर्षांनंतर उद्धवजींनंतर शिंदे यांना मुख्यमंत्री करायचे असे शिवसेनेने ठरवले असता अजितदादा, तटकरे, भुजबळ यांनी विरोध केला असेही राऊत म्हणतात, तर राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांनी म्हटले आहे की, अडीच वर्षांनंतर अजितदादा मुख्यमंत्री असे ठरले होते. यावर राऊतांनी कानावर हात ठेवले आहेत.

२०१९ मध्ये प्रथम राज्यपालांना शिवसेनेचे शिष्टमंडळ भेटले. त्यात ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, आदित्य ठाकरे व एकनाथ शिंदे हे होते. त्यावेळी जे पत्र राज्यपालांना दिले होते त्यात मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदेंचे नाव सुचवले होते. राष्ट्रवादी व काँग्रेस आमदारांच्या साह्याने पत्र राजभवनात न गेल्याने शिवसेना शिष्टमंडळाला हात हलवीत परत यावे लागले ही वस्तुस्थिती शरद पवार मान्य करीत नाहीत. मुळात पवारांना ‘मराठा’ मुख्यमंत्री होऊ द्यायचा नव्हता म्हणून तर घोळ घातला होता. हे शरद पवार का मान्य करीत नाहीत. मग शिंदेंना विरोध करायची काय आवश्यकता होती.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हेतुपुरस्सर चिखल करण्यात आला असून नैतिकता, निष्ठांना तिलांजली देण्यात आली आहे. अजित पवार यांची स्पष्ट भूमिका नगरमध्ये दिसून आली. भाजप उमेदवार विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय यांच्या सभेत दादांनी समोर विरुद्ध असलेला उमेदवार निलेश लंके यांना आव्हान दिले. तू कसा निवडून येतो ते मी पाहतो? असे आव्हान त्यांनी दिले होते. लंके यांनी राष्ट्रवादीत अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला. पुढे लंके हे आमदार राष्ट्रवादीचे झाले. मधल्या बंडखोरीनंतर लंके हे अजितदादांबरोबर गेले होते. मात्र त्यानंतर लोकसभा निवडणूक जाहीर होताच त्यांनी महायुती सोडून महाआघाडीत प्रवेश केला आणि नगरमधून महाविकास आघाडीतर्फे नगर जिल्ह्यातून महायुतीचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्या विरोधात अर्जही भरला. त्यानंतर लंके यांनी अजितदादांविरुद्ध भूमिका घेताच अजितदादांनी लंकेंना आव्हान केले की, तू कसा निवडून येतो ते मी पाहतो.

२०१४ मध्ये भाजपची नरेंद्र मोदी लाट आली आणि भाजप मोठा भाऊ ठरला आणि येथेच शिवसेनेचा अहंकार डिवचला गेला. तो भाजपला मोठा भाऊ मानण्यास तयार नव्हता आणि नेमका याचा फायदा राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी घेतला. महाराष्ट्रात पूर्ण बहुमत नव्हते. १२६ आमदार भाजपचे निवडून आले होते. निवडणुकीचे संपूर्ण निकाल हाती येण्यापूर्वीच भाजपला सत्तेत बाहेरून राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केला आणि पवारांनी नेहमीप्रमाणे कारणे काय दिली, राज्याला मुदतपूर्व निवडणूक परवडणार नाही म्हणून भाजपला पाठिंबा देत आहोत हे किती थोतांड होते. हे मोदींच्या बारामती वारीवरून दिसून आले.

शरद पवारांना शिवसेना संपवायची होती आणि सेनेने भाजपबरोबर जाऊ नये यासाठी ही रणनीती खेळली होती. २०१४ च्या भाजपच्या सत्ताग्रहणाच्यावेळी शिवसेना विरोधी पक्षात होती, कारण सेनेचे भाजप पाठोपाठ ६३ सदस्य निवडून आले होते. काँग्रेस व राष्ट्रवादी ४१-४२ च्या पुढे नव्हते. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद शिवसेनेकडे आले आणि एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षनेते झाले.

नवी दिल्लीतील राजकारण आज काय तर उद्या काय? याचा थांगपत्ता नसतो. वाळीत टाकलेल्या नेत्याचे पुनर्जीवित होऊ शकते. तर सतत भाजप मुख्यालयाशी संबंधितांना बाहेर हुसकले जाते. गेल्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांना भाजपने आमदारकीचे तिकीटही नाकारले होते. ज्यांना बेदखल केले ते विनोद तावडे भाजपचे महासचिव दिल्लीत झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील असंतुष्टांना दिल्लीत आता तावडेंची शिडी प्राप्त झाली आहे. आता विनोद तावडे दिल्लीत आल्याने महाराष्ट्रातील असंतुष्ट नेत्यांना एक वाली निर्माण झाला. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा दिल्लीत मोठा दबदबा होता. आता तीच जागा विनोद तावडे यांनी घेतली आहे.

नुकताच देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिस्पर्धी एकनाथ खडसे यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांबरोबर झालेले वैर हे त्यापैकी एक आहे. तर नुकतेच मनसे नेते राज ठाकरे अमित शहांना भेटले ते विनोद तावडें यांच्या मार्फतच

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूक या महत्त्वाच्या ठरणार आहेत. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीतील यश-अपयशावर राज्यात नेतृत्वबदल होऊ शकतो. नवी दिल्लीत विनोद तावडेंचे वर्चस्व वाढत चालले असून त्याचा महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वावर परिणाम होऊ शकतो. राजकारणात काहीही होऊ शकते याची जाणीव सर्वच नेत्यांनी ठेवलेली बरी.

हैदराबादमध्ये भाजपने माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. माधवी लता यांच्या आक्रमक प्रचारामुळे हैद्राबादमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. त्यांच्या बद्दल सर्व नागरिकांमध्ये कौतूक आहे. हैदराबाद मार्केटमध्ये बहुसंख्येने मुस्लिम व्यापारी आहेत तेथे ज्या प्रकारे स्वागत होते ते अभूतपूर्व असे होते. मुस्लिम महिलाच काय दुकानदार माधवी लतांच्या अंगावर आले, पुष्पहार घातले आणि हे करताना ती फक्त नमस्कार करते आणि पुढे धावतच असते. मुस्लिम महिला ‘दीदी ठहरो ना’ असे म्हणत तिला थांबविण्याचा प्रयत्न करतात.

महायुती-महाआघाडीचे विजयाचे दावे

देशभरात लोकसभा निवडणुकीचे पाचही टप्पे पूर्ण झाले असून महाराष्ट्रातील मतदान झालेले आहे. ‘अब की बार ४००’ हा आवाज पहिल्या, दुसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळत होता. मात्र तिसऱ्या टप्प्यानंतर हा आवाज क्षीण झाल्याचे जाणवले आहे. आता राज्यात खान्देश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील चार लोकसभा मतदारसंघांत मतदान होत आहे आणि शेवटच्या २० मे च्या टप्प्यात मुंबईचे ६, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, धुळे, दिंडोरी अशा १३ लोकसभा मतदारसंघांत अत्यंत चुरशीच्या निवडणूक होत्या. शरद पवारांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी ३५ जागा जिंकेल असा दावा केला आहे, तर भाजप नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही ४० च्या पुढे जाऊ असे म्हटले आहे. २०१९ मध्ये भाजप, सेना युती होती तेव्हा ४१ जागा मिळाल्या होत्या. यावेळी शरद पवारांच्या विरोधातील अजित पवार गट भाजप-सेनेसोबत असताना ४५-४८ जागा जिंकणे आवश्यक होते. परंतु हे आता ४०वर आले आहेत आणि यामधूनच ४०५, आवाज क्षीण झाला आहे.

महाराष्ट्रात चौथ्या टप्प्याचा प्रचार सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी म्हटले होते की आता निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. म्हटले तर तामिळनाडूमधील द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) , अण्णा द्रमुक हे पक्ष मजबूत आहेत. ओदिशात, आंध्र प्रदेश प्रादेशिक पक्ष मजबूत असताना विलीन होऊ शकतो, उर्वरित राष्ट्रवादी, उबाठा व इतर पक्षांचा समावेश आहे.

शरद पवारांनी हे संकेत उरलेल्या राष्ट्रवादी पक्षास विशेष करून दिले असावेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याऐवजी एकनाथ शिंदे-अजित पवारांबरोबर हात मिळवणी करा, असा सल्ला दिला आहे. त्यावर प्रतिक्रिया पाहा, मोदी घाबरले आहेत, म्हणून ते पवार, ठाकरेंना विलीन होण्याची भाषा करतात, हे आश्चर्य आहे. कारण मोदींनी पवार-ठाकरे यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे म्हटल्याने त्यावर नरेंद्र मोदी यांनी स्पष्टीकरण दिले आहे, असो हे सर्व २० मेपर्यंत चालणार? यामुळे लोकांची करमणूक होते.

logo
marathi.freepressjournal.in