
- सह्याद्रीचे वारे
- अरविंद भानुशाली
मुंबईत सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. एकमेकांवर चिखल फेकण्याचे उद्योग सुरू आहेत. राज्यातील प्रश्नांची उकल होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आरोप-प्रत्यारोपाचा मारा सुरू आहे. विशेष म्हणजे या काळात नागपूरमध्ये झालेली दंगल ही राज्याच्या दृष्टीने अत्यंत क्लेशदायक घटना आहे. महाराष्ट्रात यापूर्वी अनेक दंगली झाल्या. परंतु नागपूरसारख्या ९० ते ९५ टक्के हिंदू वस्ती असलेल्या शहरात हा दंगलीचा भडका उडाला.
गपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. येथे यापूर्वी केवळ स्वतंत्र विदर्भासाठीच आंदोलने झाली; परंतु प्रत्यक्षात नागपूर येथे हिंदू-मुस्लिम दंगलीचे स्वरूप आले ते भयानक होते. कुणाची चूक, कोण बरोबर याची शहानिशा करण्यापूर्वी जे काही झाले ते दुर्दैवी होते. आज गेले पाच दिवस नागपूर शहरात शांतताप्रिय उपराजधानीत संचारबंदी आहे हे दुर्दैव आहे. या दंगलीतून जे काही पुढे येते आहे ते वेदना देणारे आहे. औरंगजेबाची कबर पाडा म्हणून आरोळी ठोकली ती खासदार उदयनराजे यांनी. त्यात छावा चित्रपट प्रदर्शित झाल्याने एका विशिष्ट समाजाच्या भावना तीव्र झाल्या. त्या पार्श्वभूमीवर नागपुरात विश्व हिंदू परिषदेने व इतर हिंदू संघटनांनी औरंगजेबाच्या कबरीविरुद्ध आंदोलन सुरू केले. हे सगळे घडत असताना एक विशिष्ट समाज हा प्रार्थनास्थळातून एकत्र येत होता आणि हिंदू वस्तीवर हल्ले करण्याचा कट शिजत होता. या दंगलीनंतर आता जे पुढे येत आहे ते भयानक आहे. नागपूरसारख्या शांततामय शहरात कट-कारस्थाने करून दंगल घडवली जाते हे समोर आले. यापूर्वी दंगली झाल्या, परंतु त्या अशा नव्हत्या. बाबरी मशीद पडल्यानंतर मुंबईत आगडोंब उसळला. त्याची परिणती दंगलीनंतर बाॅम्बस्फोटात झाली. आता बाबरीप्रमाणेच औरंगजेबाचा कबर पाडण्याबाबत घोषणा सुरू आहेत. १६व्या शतकात औरंगजेबाने संभाजीराजांचे जे हाल केले त्याचे चित्र `छावा`मधून नव्याने पुढे आले आहे. या प्रकारामुळे विधिमंडळाचे कामकाज दोन दिवस चालले नाही. यामधून हिंदू संघटनांच्या बाजूने कोण आहे व इतर समाजाच्या बाजूने कोण, याबाबत पर्दाफाश झाला आहे. यावेळी उबाठा शिवसेनेची भूमिका जर-तरची होती, तर शिंदे यांची शिवसेना प्रभावी ठरली. औरंगजेबाची कबर पाडली पाहिजे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे घेतली.
महाराष्ट्रात यापूर्वी अनेक दंगली झाल्या. या दंगलीतून होरपळून निघाल्यामुळे २०१४ पासून या दंगलींना पूर्णविराम मिळला होता; परंतु नागपूरसारख्या ९० ते ९५ टक्के हिंदू वस्ती असलेल्या शहरात हा दंगलीचा भडका उडाला. यामुळे सर्वांनाच चिंताग्रस्त व्हावे लागले आहे. दंगलीत ठरवून बहुसंख्य असलेल्या समाजाच्या मालमत्तेला नुकसान झाले. घरे, दुकाने जाळली गेली. गाड्या पेटवून दिल्या. एवढे होऊनही पोलिसांनी जो संयम दाखवला तो कौतुकास्पद होता. एवढ्या मोठ्या दंगलीत गोळीबाराची घटना घडली नाही, हे सुदैव म्हणावे लागेल. एक निश्चित की, हे सगळे घडत असताना राज्याचा गुप्तचर विभाग काय करत होता? एक व्यक्ती ५०० ते ६०० लोकांचा जमाव घेऊन हल्ले करते तेव्हा आंदोलन करणारे नेते तरी काय करत होते?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय हे नागपूरमध्येच आहे. औरंगजेबाची कबर आहे खुल्ताबादमध्ये आणि आंदोलन कुठे झाले, तर नागपुरात. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व इतर हिंदू संघटनांनी यापूर्वी बाबरीचा ढाचा पाडला. आज तेथे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रभू रामचंद्राचे भव्य मंदिर उभे राहिले आहे, तर नुकतेच प्रयागराजमध्ये कोट्यवधी हिंदूंनी कुंभमेळ्याच्या निमित्ताने गंगा स्नान केले. औरंगजेब हा अत्यंत क्रूर होता यामध्ये वादच नाही. परंतु नेमकी हीच वेळ कबर पाडण्यासाठी कुठून आली, यामागे काही आंतरराष्ट्रीय कट होता की काय, अशी शंका येत आहे.
नागपूरचे प्रतिध्वनी महाराष्ट्रभर उमटत आहेत. विशेष म्हणजे रा. स्व. संघाने औरंगजेबाच्या कबरीबाबत जे मत व्यक्त केले त्यामुळे शांततेला महत्त्व प्राप्त झाले आहे. नागपूरमध्ये जे प्रकार झाले त्यामुळे निश्चितच गृह खात्याची इभ्रत गेल्याचे दिसून आले. एका पोलीस महिलेवर अत्याचार झाल्याचे पुढे आले आहे. मुंबईत हा प्रकार यापूर्वी निघालेल्या मुस्लिम मोर्चात, मुंबईतील पोलीस महिलांवर अत्याचार झाले होते त्याची दखल शासनाने घेतली होती. नागपूरची दंगल ही पूर्वनियोजित होती, असे म्हटले जात आहे. तर मग त्यामधून अनेक प्रश्न पुढे उभे राहतात.
नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होम ग्राऊंड. येथील दंगलीचे लोण महाराष्ट्रभर उमटले नाही, हे सुदैव म्हणावे लागेल. दंगलीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळात जे काही झाले ते शोभणारे नव्हते. सत्ताधारी तीन पक्षांच्या सरकारमध्ये मतभेद असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. एकदा दंगल पेटली की मग सुक्याबरोबर ओलेही जळते याचे अनेक अनुभव महाराष्ट्राने घेतले आहेत. नागपूर दंगलीत बांगलादेशचे नाव घेतले जाते. याचे धागेदोरे लांबपर्यंत पोहचत असतील तर राज्य सरकारच्या गृह खात्याने याची वेळीच दखल घेऊन योग्य ती कारवाई करणे आवश्यक होते. तथापि, हे झाले नाही हे खेदाने म्हणावे लागेल.
उत्तर प्रदेशच्या संभल येथेही जातीय तणाव निर्माण झाला. मात्र तेथील सरकारने कडक भूमिका घेतली. नवी दिल्लीमधील अनेक मार्गावर मोगल साम्राज्याचे पुरावे दिसत आहेत. उद्या आग्र्याच्या ताज महालाचाही प्रश्न येऊ शकतो. महाराष्ट्र ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे. टोकाची भूमिका घेऊन राज्य चालवले जात नाही. त्यासाठी संयम व उपाययोजना या महत्त्वाच्या असतात. एरव्ही शांत असलेले नागपूर अचानक पेटले हे या राज्याला शोभणारे नाही. याप्रकरणी कडक पोलीस यंत्रणेने कठोर भूमिका घेतली तरच दंगलींना आळा बसेल. नागपूर दंगलीची पाळेमुळे कुठे आहेत हे शोधून त्याचा नायनाट करणे आवश्यक आहे. अशी प्रवृत्ती वाढली तर राज्याबरॊबर देशाला हे घातक ठरू शकते. अलीकडे कायदा हातात घेण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. नागपूरमध्ये तर ट्रॉलीमधून दगड-धोंडे आणेल गेले, पेट्रोल बॉम्ब टाकण्यापर्यंत दंगलखोरांची मजल गेली हे साधेसुधे नव्हते. यापुढे नागपुरात दंगलीसदृश परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही, अशी अपेक्षा करूया.