कारगिलनंतरचे बदलाचे वारे

कारगिलमध्ये आपला भूभाग वाचविण्यासाठी ५२७ अधिकारी आणि सैनिकांनी आपले प्राण दिले
कारगिलनंतरचे बदलाचे वारे

दरवर्षी २६ जुलै हा दिवस भारताचा १९९९मध्ये कारगिल युद्धात झालेला विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. या युद्धात भारतीय सैन्याने भारतीय हद्दीतील डोंगर शिखरांवर लपून बसलेल्या पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावले आणि तो भूभाग पुन्हा ताब्यात घेतला. सर्व अडथळे पार करून, मोठी किंमत चुकवून विजय मिळविणाऱ्या भारतीय सैनिकांच्या शौर्याचा हा महोत्सव आहे. या युद्धात कारगिलमध्ये आपला भूभाग वाचविण्यासाठी ५२७ अधिकारी आणि सैनिकांनी आपले प्राण दिले. त्यांचा देशाला अभिमान आहे. आम्ही त्यांना वंदन करतो.

कारगिलची लढाई ही तांत्रिकदृष्ट्या युद्ध नव्हती; मात्र ती अनेक बाबींत युद्धापेक्षा कमी नव्हती, किमान आपल्या सैनिकांनी आणि तरुण अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या शौर्याच्या बाबतीत तर नव्हतीच. कारगिल हा लडाख प्रांतातला एक जिल्हा आहे, जिथे अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नियंत्रणरेषा कारगिलच्या डोंगराळ आणि कठीण भूभागातून जाते. या बर्फाच्छादित पर्वतरंगांची उंची ११००० ते १८००० फूट आहे.

कारगिलमधल्या या दुर्गम बर्फाच्छादित पर्वतांवर ताबा मिळविण्याचा पाकिस्तानने प्रयत्न का केला? हे समजून घेताना प्रथमतः कारगिलच्या पश्चिमेला, सियाचीन ग्लेशियरमध्ये, जवळपास एक दशकापूर्वी जे घडले, ते आपण समजून घेतले पाहिजे. ८०च्या दशकात भारत आणि पाकिस्तानच्या सैन्याचा सियाचीन ग्लेशियर येथे आमना-सामना झाला होता. तेव्हा आमच्या तुकडीने जगातील सर्वात उंच पर्वतावर चढाई केली आणि २१,१५३ फूट उंचीवर असलेल्या पाकिस्तानने बळकावलेले ‘कैद’ हे ठाणे ताब्यात घेतले. ज्याचे नंतर ऑनररी कॅप्टन बना सिंह पीव्हीसी, यांच्या सन्मानार्थ बना ‘टॉप’ असे नामकरण करण्यात आले. त्यांच्या तुकडीनेच या ठाण्यावर निर्णायक हल्ला केला होता.

या पराभवामुळे चिडलेल्या पाकिस्तानच्या विशेष सेवा गटाने तीन महिन्यानंतर प्रतिहल्ला केला, जो यशस्वीपणे परतवून लावण्यात आला. पाकिस्तानचे कमांडर, ब्रिगेडियर परवेझ मुशर्रफ यांनी त्या हल्ल्याचे नेतृत्व केले होते. त्या पराभवाचे शल्य त्यांना बोचत होते आणि त्याचा बदला घेण्यासाठी, लष्करप्रमुख झाल्यावर कारगिल हल्ल्याची योजना आखली, ज्याला सुरुवातीला पाकिस्तान सरकारची सहमती नव्हती. या पर्वतांवर ताबा मिळवून श्रीनगर ते लेह आणि सियाचीनला जोडणारा रस्ता बंद करण्याची त्यांची योजना होती.

पाकिस्तानने १९९९मध्ये कारगिलमध्ये नियंत्रणरेषा ओलांडून सैनिक पाठवले, या भागात हिवाळ्यात दोन्ही देशांचे तुरळक सैन्य असते. ही घटना घडली, तेव्हा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी शांतता प्रक्रिया पुढे नेण्यासाठी दिल्लीहून लाहोरला बसने गेले होते. भारताचा पाकिस्तानने विश्वासघात केला होता. आपल्या पाठीत खंजीर खुपसला होता.

जरी एकमेवाद्वितीय नसली, तरी युद्ध म्हणून ही लढाई अतिशय दुर्मीळ मानली जाते, भारताच्या जबाबदार वर्तणुकीमुळे आणि आपल्या सैनिकांनी दाखविलेल्या अपार शौर्यामुळे त्या घटनेचे रूपांतर मोठ्या युद्धात झाले नाही. हे युद्ध केवळ नियंत्रणरेषेपुरतेच मर्यादित ठेवण्यात आले नाही, तर कारगिल पुरतेच ठेवण्यात आले होते. हे कसे काय शक्य झाले?

खरे तर,

नियंत्रणरेषा

ओलांडून

पाकिस्तानी

सैन्याची

मदत

करणारी,

त्यांना रसद पुरविणारी ठिकाणे उद्ध्वस्त करणे योग्य ठरले असते, तरीही भारतीय सैन्याने आणि भारतीय वायुसेनेने नियंत्रणरेषा ओलांडली नाही. नियंत्रणरेषेपलीकडे जाऊन आपली लढाऊ विमाने त्यांच्या ठिकाणांचे खूप मोठा नुकसान करू शकली असती.

पाकिस्तानने भारतासोबतच्या कराराचा भंग केला असला तरी नियंत्रणरेषेचे पावित्र्य जपणे महत्त्वाचे का होते? ही कदाचित पहिलीच घटना होती, जेव्हा दोन अण्वस्त्रसज्ज देशांमध्ये युद्ध झाले आणि याकडे संपूर्ण जग श्वास रोखून बघत होते. हे युद्ध प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढू नये, यासाठी भारताने कमालीचा संयम दाखवला; मात्र यासाठी आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागली होती.

या पर्वत शिखरांवरून शत्रूला हुसकावून लावायला सैनिकांना समोरासमोर हल्ला करावा लागला आणि सगळे हल्ले पर्वतावर चढून करावे लागले होते, ज्यामुळे ते अतिशय कठीण आणि धोकादायक झाले होते. दूरदर्शनवरून प्रसारित होणारे ते भारताचे पहिलेच युद्ध होते. एकीकडे, देशाने क्षणाक्षणाला होणारी युद्धाची प्रगती बघितली, तर दुसरीकडे युद्धाची मानवी बाजूदेखील बघितली. अधिकारी आणि सैनिकांनी दिलेले बलिदान, त्यांच्या कुटुंबांचे हृदय पिळवटून टाकणारे दुःख, अंतिम संस्काराच्या वेळी ओसंडून वाहणारी देशभक्ती, हे सगळेदेखील बघितले. जेव्हा कॅप्टन विक्रम बत्रा एक पर्वत शिखर जिंकून परत आले, त्यानंतर त्याचं वाक्य खूप प्रसिद्ध झालं, ते होतं, “ये दिल मांगे मोर...” त्यांनी तरुणांमध्ये देशभक्तीची आग पेटवली, खरं म्हणजे सर्व देशातच आणि त्यानंतरच्या पुढच्या हल्ल्यात, त्यांनी प्राणांचे बलिदान दिले. या हल्ल्याचे नेतृत्व त्यांनीच केले होते. तेव्हा ते केवळ २४ वर्षांचे होते. त्यांच्याच वयाचे इतरही अनेक होते - ते सर्व विशीतले तरुण होते; मात्र ते सरावलेल्या, अनुभवी सैनिकांचे नेतृत्व करत होते, जे त्यांच्यापेक्षा १० आणि काही तर २० वर्षांनी मोठे होते.

कमांडिंग ऑफिसर म्हणून, मला माझ्या तुकडीतल्या एका अधिकाऱ्याची तार आली, जो वैद्यकीय कारणांमुळे सैन्य सोडून गेला होता. त्याला पुन्हा बटालियनमध्ये सामील होऊन युद्धात शत्रूशी लढायचे होते. जरी अशा प्रकारे युद्धात सहभाग घेण्याची कुठलीच तरतूद नसली, तरी यातून त्याची देशभक्ती, शौर्य आणि जीव धोक्यात टाकून युद्धात भाग घेण्याचा उत्साह दिसून आला. देशात अशी अनेक उदाहरणे आहेत आणि यामुळे आपण भारतीय असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो.

कारगिल युद्धानंतर सैन्यदलांत सुधारणांची सुरुवातदेखील झाली. के. सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखालील कारगिल मूल्यांकन समितीने आराखड्यात आणि प्रक्रियांत अनेक बदल सुचविले. लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वातील मंत्रिगट आणि अरुण सिंग कृती दलाने सखोल विचार करून तिन्ही सेवांचा, मुख्यालयाशी एकत्रित संरक्षण कर्मचारी, अंदमान आणि निकोबार कमांड आणि रणनीतिक दल उभारण्यात आले. सरकारने २०२०मध्ये संरक्षण दलप्रमुखांचीही नियुक्ती केली.

आपण आताच बघितले की, कारगिल युद्ध अनेक बाबींत एकमेवाद्वितीय होते; पण एक गोष्ट प्रकर्षाने पुढे आली, ती म्हणजे आपल्या सैनिकांचे शौर्य आणि समोरून नेतृत्व करणारे तरुण नायक. ते सर्व ग्रामीण आणि शहरी भागातील तरुण आहेत.

ज्या तरुणांना सैन्यदलांत कारकीर्द करायची नाही; पण देशभक्तीने ओतप्रोत आहेत, ते शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून किंवा अग्निपथच्या माध्यमातून कमी काळ सैन्यात सेवा देऊ शकतात. देशाची सेवा करण्यासाठी सैन्यात पूर्णवेळ नोकरी केलीच पाहिजे, असे नाही. तुम्ही जे करत आहात त्यात प्रावीण्य मिळवून, ते काम आपल्या क्षमतेनुसार सर्वोत्तम करूनदेखील तुम्ही देशाची सेवा करू शकता आणि जर सैनिकांबद्दल आदर दाखवायचा असेल, तर एक चांगले नागरिक बना, एक असा नागरिक ज्याच्यासाठी आयुष्याचे बलिदान द्यावेसे वाटावे. जय हिंद

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in