‘हॅप्पी विमेन्स डे’ : जग बदलण्यासाठी हवा महिलांचा सहभाग!

‘हॅप्पी विमेन्स डे’ असे म्हणत महिलांना जे अभिवादन केले जाते त्याचा इतिहास सव्वाशे वर्षं इतका जुना आहे आणि त्याला स्त्रियांच्या संघर्षाची पार्श्वभूमी आहे.
‘हॅप्पी विमेन्स डे’ : जग बदलण्यासाठी हवा महिलांचा सहभाग!

- डाॅ. तनुजा परुळेकर

स्त्री विश्व

‘हॅप्पी विमेन्स डे’ असे म्हणत महिलांना जे अभिवादन केले जाते त्याचा इतिहास सव्वाशे वर्षं इतका जुना आहे आणि त्याला स्त्रियांच्या संघर्षाची पार्श्वभूमी आहे. जागतिक महिला दिनाची सुरुवात १९००च्या दशकापासून झाली. त्याआधी ८ मार्च १८५७ साली न्यूयॉर्क शहरात वस्त्रोद्योग क्षेत्रातील कामगार महिलांनी एक संघटित संप पुकारला होता. कामाची अन्यायकारक परिस्थिती आणि स्त्रियांना दिली गेलेली असमान वागणूक व अधिकार याच्या निषेधार्थ हा संप करण्यात आला होता. हा काळ औद्योगिक उत्क्रांतीचा, लोकसंख्यावाढीचा तसेच अनेक उलथापालथींचा होता. याच काळात स्त्रीवादी विचारसरणीचा उगम होत होता. साधारण १९०८ साली स्त्रियांच्या विचारसरणीत आमूलाग्र बदल होत होता, तसेच त्यांच्यात वैचारिक क्रांती होताना दिसत होती. महिलांमध्ये एक अस्वस्थता पसरली होती आणि तीच त्यांच्या चळवळीची सुरुवात म्हणता येईल. त्यांच्यावर होणारे अत्याचार व दुर्बलता यांची त्यांना जाणीव होत होती आणि त्याविरुद्ध बंड पुकारण्याची मानसिक तयारी सुरू होती. यातूनच १५००० महिला सुई कामगारांनी न्यूयॉर्क शहरामध्ये मोर्चा काढला. महिलांना मतदानाचा हक्क, चांगले वेतन व कामाचे कमी तास या मागण्यांसाठी तो मोर्चा काढण्यात आला होता. बालमजुरीचा मुद्दासुद्धा या महिला कामगारांनी आपल्या मागण्यांमधून पुढे आणला.

नंतर १९०९ मध्ये ‘सोशालिस्ट पार्टी ऑफ अमेरिका’ने २८ फेब्रुवारी या दिवशी संपूर्ण अमेरिकेत ‘राष्ट्रीय महिला दिन’ साजरा करण्याची घोषणा केली. तिथून पुढे मग प्रत्येक वर्षी १९१३ पर्यंत फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा रविवार हा ‘राष्ट्रीय महिला दिन’ म्हणून मुक्रर केला गेला. पुढे १९१० मध्ये कोपनहेगन इथे स्त्रीच‌ळवळीत कार्यरत असलेल्या महिलांची दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जर्मनीतील सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या महिला विभागाच्या नेत्या क्लारा झेटकिन यांनी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’चा प्रस्ताव सर्वांपुढे मांडला. त्याची संकल्पना अशी होती की, दरवर्षी प्रत्येक देशात एक दिवस ‘महिला दिन’ म्हणून स्त्रियांच्या मागण्यांसाठी दबाव आणण्याकरिता साजरा केला जावा. १७ देशांतील शंभरहून अधिक महिला उपस्थित असलेल्या त्या परिषदेत तो प्रस्ताव लगेच मंजूर झाला. १९ मार्च १९११ साली ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये प्रथमच ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा झाला. त्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये दहा लाखांहून अधिक महिला आणि पुरुष उपस्थित होते. ती रॅली महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी होती. स्त्री-पुरुष समानता, महिलांचे सबलीकरण, मतदानाचा अधिकार, आर्थिक स्वातंत्र, सार्वजनिक क्षेत्रात पदाधिकार, प्रशिक्षण असे विविध मुद्दे यावेळी विचारात घेतले होते. पण त्याच सुमारास २५ मार्च रोजी न्यूयॉर्क शहरात एक दुःखद घटना घडली ज्यामध्ये १४० हून अधिक कामगार महिलांना आगीत होरपळून जीव गमवावा लागला. त्यातल्या बहुतेक महिला स्थलांतरित ज्यू व इटालियन होत्या. या भयंकर घटनेनंतर अमेरिकेतील कामाच्या ठिकाणी, कारखान्यांमध्ये, गिरण्यांमध्ये असलेल्या असुविधाजनक परिस्थितीकडे, तेथील सुरक्षा व्यवस्थेकडे आणि कामगार कायद्यांकडे लक्ष वेधले गेले. त्यानंतरच्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या कार्यक्रमांमधला हा महत्त्वाचा मुद्दा होता.

पुढे रशियन महिलांनी २३ फेब्रुवारी १९१३ रोजी पहिल्या महायुद्धाच्या पूर्वसंध्येला शांततेसाठी आवाहन करत पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला. तो होता फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा रविवार. पुढे विचारांती दरवर्षी ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे मान्य करण्यात आले. तेव्हापासून ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो.

यानंतर १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय महिला दिनाची नोंद घेण्यात आली. तसेच १९७७ डिसेंबरमध्ये जनरल असेंब्लीने एक ठराव मंजूर केला. ज्यामध्ये महिला हक्क आणि आंतरराष्ट्रीय शांततेसाठी ८ मार्च हा संयुक्त राष्ट्रदिन घोषित केला गेला. प्रत्येक देश हा दिवस आपापल्या ऐतिहासिक आणि राष्ट्रीय परंपरेनुसार साजरा करतो.

प्रत्येक वर्षीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा एक विषय असतो, एक ‘थीम’ असते. २०२४ ची थीम आहे- ‘इन्स्पायर इन्क्लूजन’ म्हणजेच प्रेरित समाविष्टता. याचा अर्थ असा की, एक सुंदर सृष्टी तयार करण्यासाठी समाजातील प्रत्येकाने महिलांना महत्त्व दिले पाहिजे, त्यांना समजून घेतले पाहिजे आणि त्यांना प्रत्येक गोष्टीत समाविष्ट करून घेतले पाहिजे. तसेच ही पावले उचलण्यासाठी इतरांना प्रेरणा देणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे ठरते. थोडक्यात महिलांच्या सहभागासाठी समाजाला प्रेरित करणे. पण याबरोबरीनेच जेव्हा एक स्त्री सामाजिक चलनवलनामधील सहभागासाठी स्वतः पुढाकार घेते, तेव्हा तिचे सक्षमीकरण अधिक वेगाने होते. बदलाची गती वाढते. आंतरराष्ट्रीय महिला दिनाला जशी एक थीम असते त्याचप्रमाणे १९०८ पासून इंग्लंडमधील महिलांच्या सामाजिक आणि राजकीय संघाने महिला दिनासाठी जांभळा, हिरवा आणि पांढरा हे रंग निवडले आहेत. जांभळा रंग हा न्याय आणि प्रतिष्ठेचे प्रतीक आहेच, पण तो आपल्या तत्त्वाशी एकनिष्ठता दर्शवणारा रंग आहे. हिरवा रंग आशेचे प्रतीक आहे आणि पांढरा रंग शुद्धतेचे द्योतक आहे.

महिला दिनाच्या सुरुवातीचा हा काळ आता खूप मागे गेला आहे. समाज जीवनात खूप आमूलाग्र बदल झाला आहे. पण खरंच महिला सक्षम आणि सबल झाल्या आहेत का? स्त्रियांसाठी परिस्थिती बदलली आहे का? आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा आपण गैरफायदा तर नाही ना घेत आहोत? एकीकडे चांद्रयान मोहिमेत भाग घेतलेल्या महिला शास्त्रज्ञांचे आपण मनापासून कौतुक करतो. त्यांच्या साध्या राहणीमानाने, पण उत्तुंग कर्तृत्वाने भारावून जातो. तसेच इंदिरा गांधींसारखी एक निष्णात स्त्री आपल्या देशाची महिला पंतप्रधान होती, जे अजूनसुद्धा अमेरिकेसारख्या प्रगत देशाला घडवून आणणे जमलेले नाही. पण सध्याच्या चंगळवादी जीवनशैलीत तरुण मुली दारू, सिगारेट, ड्रग्जच्या विळख्यात अडकत आहेत. जिथे दसऱ्याला देवीची उपासना करतात, त्याच देशात तान्ह्या मुलींवर होणाऱ्या बलात्काराचे प्रमाण बघितले की जीव कासावीस होतो. अजूनही स्त्रीला उपभोगाची वस्तूच समजले जाते. मला असे वाटते की, एक स्त्री म्हणून आपण स्वतःला घडवले पाहिजे. आपल्या बुद्धिमत्तेला आव्हान दिले पाहिजे. आपल्या सबलीकरणासाठी कोणावरही अवलंबून राहता कामा नये. आपल्या असीम स्व:शक्तीचा वापर करून स्वतःला सक्षम बनवले पाहिजे. यावर्षीच्या महिला दिनाच्या थीमनुसार आपल्याला मनापासून आवडणाऱ्या गोष्टींमध्ये स्वत: पुढाकार घेऊन सहभागी झाले पाहिजे. महिलांच्या अधिकाधिक सहभागानेच हे जग बदलेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in