पहिली लढाई जिंकली

भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करून बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता.
पहिली लढाई जिंकली

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेना आणि भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्या सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करून बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. दोन दिवसांच्या या अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला तो विधानसभाध्यक्षांच्या निवडीने. या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या गटाने आणि भाजपने अध्यक्षपदासाठी आमदार राहुल नार्वेकर यांना उभे केले होते. तर विरोधकांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमदार राजन साळवी यांना उभे केले होते. विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अध्यक्ष निवडण्यासाठी झालेल्या शिरगणतीत राहुल नार्वेकर यांना १६४ मते मिळाली आणि त्यांचे प्रतिस्पर्धी राजन साळवी यांना १०७ मते मिळाली. मतदानावेळी समाजवादी पक्ष आणि एमआयएमचे आमदार तटस्थ राहिले. एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना आमदार, भाजप आणि अपक्ष आमदार यांच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याने राहुल नार्वेकर हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले. अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांचा विजय झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली लढाई जिंकली आहे! राहुल नार्वेकर हे देशातील सर्वात तरुण विधानसभाध्यक्ष असल्याचा उल्लेख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकर यांचे अभिनंदन करतांना केलेल्या भाषणात केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन करणारी भाषणे झाली. या भाषणांच्या निमित्ताने विविध नेत्यांनी आपल्या विरोधकांवर केलेली जोरदार फटकेबाजी सभागृहास अनुभवण्यास मिळाली. राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांचे जावई आहेत. त्यामुळे सासरे विधान परिषदेचे सभापती आणि जावई विधानसभेचे अध्यक्ष असल्याचे चित्र विधिमंडळात पाहावयास मिळणार आहे. कायद्याचे जाणकार असलेल्या राहुल नार्वेकर यांच्याकडून पूर्वसुरींप्रमाणे सभागृहाचा लौकिक वाढविला जाईल, अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे, भाजप यांना कोपरखळ्या मारण्याची संधी सोडली नाही! एकनाथ शिंदे यांनी आपल्या कानात सांगितले असते तर आपण आधीच त्यांना तिथे बसविले असते,असे अजित पवार म्हणाले. तसेच भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची उपेक्षा झाल्याचे निदर्शनास आणून दिले. सत्तारूढ पक्षाच्या पहिल्या रांगेत ‘आमचीच’ माणसे असल्याचे लक्षात आणून देऊन भाजपच्या नेत्यांबद्दल आपणास वाईट वाटते, याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले. नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ते भाजप अशा प्रवासाचा उल्लेख करून, नार्वेकर कोठेही गेले तरी ते पक्ष नेतृत्वाच्या अगदी जवळ जातात, असे अजित पवार म्हणाले. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात अजित पवार यांच्यावर पलटवार केला. एकनाथ शिंदे यांनी अजितदादांच्या कानात काही सांगितले नाही, ती त्यांची चूक होती; पण तुम्हाला भविष्यात असे कधी वाटले तर आमच्या कानात मात्र नक्की सांगा,अशी कोपरखळी त्यांनी मारली. अध्यक्षांचे अभिनंदन करण्याच्या ओघात काहींची भाषणे मूळ विषयापासून भरकटत गेल्याचे पाहण्यास मिळाले. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, १३ कोटी जनतेच्या इच्छा आकांक्षांचे प्रतिनिधीत्व करणारी राज्याची विधानसभा असल्याचे नमूद करून सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. हा धक्क्यांचा महिना असून मलाही एक धक्का बसल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. विधानसभा अध्यक्ष या नात्याने उचित दुरुस्त्या करण्यामध्ये आपलाही सहभाग राहील, असे आश्वासन त्यांनी सभागृहास दिले. विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड करून एकनाथ शिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली आहे. आता विश्वासदर्शक प्रस्ताव संमत करून घ्यायचा आहे. विद्यमान संख्याबळ पाहता त्यातही ते यशस्वी होतील; पण आणखी एक कायदेशीर लढाई जिंकणे बाकी आहे. पक्षादेश झुगारून मतदान केल्याचा दावा दोन्ही बाजूंकडून करण्यात आला आहे. ‘शिवसेनेचे प्रतोद’ असा उल्लेख करून भरत गोगावले यांचे पत्र अध्यक्ष नार्वेकर यांनी सभागृहात वाचून दाखविले. त्यात १६ सदस्यांनी पक्षादेशाविरुद्ध मतदान केल्याचे म्हटले आहे. त्याआधी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनीही शिवसेनेकडून सादर केलेल्या पत्राचे वाचन केले. त्यामुळे कोणत्या आमदारांनी कोणत्या प्रतोदाचा पक्षादेश झुगारून मतदान केले, याच्या निर्णयावर राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे. शिंदे सरकारने पहिली लढाई जिंकली आहे, आजचीही जिंकतील, मात्र पक्षादेश झुगारल्या संदर्भातील कायदेशीर लढाई कोण जिंकते याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in