World Consumer Day 2024: जाहिरातींच्या भूलभुलैयात ‘फुकट’चा हव्यास

आज जागतिक ग्राहक दिन आहे. ग्राहक म्हणून नागरिकांचे काही अधिकार असतात आणि काही जबाबदाऱ्याही असतात. तुम्ही नागरिक म्हणून सजग असाल तरच एक उत्तम ग्राहक बनू शकता आणि ग्राहक म्हणून आपल्याला मिळणारी सेवा योग्य आहे की नाही, याचा विचार करू शकता.
World Consumer Day 2024: जाहिरातींच्या भूलभुलैयात  ‘फुकट’चा हव्यास

- मधुसूदन जोशी

ग्राहक मंच

आज जागतिक ग्राहक दिन आहे. ग्राहक म्हणून नागरिकांचे काही अधिकार असतात आणि काही जबाबदाऱ्याही असतात. तुम्ही नागरिक म्हणून सजग असाल तरच एक उत्तम ग्राहक बनू शकता आणि ग्राहक म्हणून आपल्याला मिळणारी सेवा योग्य आहे की नाही, याचा विचार करू शकता. फुकट गोष्टींना भूललात तर फसवणूक अटळ आहे. या ऑनलाईन तंत्रज्ञान युगात आपली रक्षा आपल्यालाच करायची आहे, हे ग्राहकाने लक्षात ठेवावे. फसवणूक झाल्यास तक्रार करण्याची सक्रियताही दाखवावी. तरच फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसू शकतो.

आपण दैनंदिन जीवनात अनेक वस्तूंची खरेदी करतो. या वस्तू खरेदी करताना आपल्याला मदत होते ती जाहिरातींची. वर्तमानपत्रं, टीव्ही, रस्त्यावरील होर्डिंग्ज या माध्यमांतून या जाहिरातींचा मारा वाचक-प्रेक्षकांवर होत असतो. एकाच वस्तूचे अनेक उत्पादक असतात जे वेगवेगळ्या कल्पक जाहिरातींचा भडीमार आपल्यावर करतात. जाहिरातीत स्त्रिया, मुले, ज्येष्ठ नागरिक या सगळ्या पात्रांचा वापर करून सर्वसामान्यांचे लक्ष वेधले जाते. या व्यतिरिक्त आता व्हाॅट्सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या समाजमाध्यमांवरूनही सातत्याने जाहिराती फ्लॅश होत राहतात. वस्तूंच्या योग्य त्या माहितीसाठी जाहिरात आवश्यक असते, पण अनेकदा जाहिरातींमध्ये वस्तुस्थितीचा अपलाप करत खोटे दावे केले जातात आणि ग्राहकांना फसवले जाते.

जाहिरात ही वर्षभर, अगदी कुठल्याही सिझनमध्ये केली जाऊ शकते, पण विशेषतः सण-वारांच्या काळात ज्या जाहिराती केल्या जातात त्या जास्त धोकादायक असतात. सणांच्या निमित्ताने आपण खरेदी करणारच असतो. मग बाय वन-गेट वन/टू/थ्री अशा जाहिराती ग्राहकांवर ओतल्या जातात. ग्राहकही त्या प्रवाहात वाहवत जातो. जाहिरात करताना समाजमाध्यमांवर प्रभाव पडतील अशा चित्रपट, नाट्य, संगीत, क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींचा उपयोग केला जातो. अशा मान्यवरांच्या तोंडून एखाद्या उत्पादनावर इतकी स्तुतिसुमने उधळली जातात की, ग्राहकाला ते उत्पादन विकत घेणे आवश्यक वाटते. यातील काही जाहिराती तर दिवाळी, दसरा, गणेश चतुर्थी, ख्रिसमस या सणांच्या निमित्ताने वारंवार दाखवल्या जातात. सायबर गुन्हेगार तर फसव्या वेबसाइट्स तयार करून ग्राहकांना अक्षरश: लुटतात. यात सगळ्यात धोकादायक असतात त्या ‘फुकट’ दिल्या जाणाऱ्या वस्तूंच्या जाहिराती.

सायबर गुन्ह्यांवर अभ्यास करणाऱ्या क्लाऊडसेक (CLOUDSEK) या संस्थेच्या पाहणीनुसार अशा भुलवणाऱ्या वेबसाइट्स बनवून फसवणूक करणाऱ्या प्रकरणांमध्ये अलीकडच्या काळात वाढ झाली आहे. अशा वेबसाइट्समध्ये ‘दिवाळी’, ‘पूजा’ असे शब्द वापरलेले असतात ज्याचे सर्वसामान्य माणसांना आकर्षण असते. या वेबसाइट‌्स ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मना जोडलेल्या असतात. क्लाऊडसेकच्या अभ्यासानुसार फेसबुकवरच्या जाहिरातींद्वारे ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढणारी अशी ८२८ डोमेन आढळली आहेत. क्लाऊडसेकच्या तज्ज्ञ अभ्यासक रिषिका देसाईंच्या म्हणण्यानुसार, यावर्षी अशी अनेक बोगस डोमेन तयार करण्यात आली आहेत. त्यावरून केवळ ऑनलाईन शॉपिंगच नव्हे तर आर्थिक गुन्हेसुद्धा करण्यात आले. असे डोमेन बनवताना अगदी थोडेसे बदल करून मूळ डोमेनसारखी दिसणारी डोमेन बनवली जातात. उदा. shop.com ऐवजी shoop.xyz हे डोमेन मूळ वेबसाइट्शी बऱ्याच अंशी जुळणारे असते. तपशिलातही साम्य असते. असे डोमेन बनविताना सामान्य माणसाच्या कमजोर आकलनशक्तीचा म्हणजेच तांत्रिक बाबींच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातो. मलेशियास्थित एएसएन (ASN) या मेगालेयर टेक्नॉलॉजिसकडून ‘दिवाळी’, ‘पूजा’ असे शब्द वापरून डोमेन बनविले जातात. या अशा डोमेनची लिंक वापरून चिनी कंपन्या त्या जुगाराच्या वेबसाइट्सकडे वळवितात. असे अनेक फसवे वापरकर्ते ग्राहकांना फेसबुक आणि इतर सोशल मीडिया साइट्सवर किंवा क्रिप्टो करन्सीच्या वेबसाइट्सवर नोंदणी करायला सांगतात. याचे एक उदाहरण म्हणजे काही साइट्सवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला एक कोटी रुपयांचा आयुर्विमा आणि पाच टीएलसी (TLC) कॉइन्सचे प्रलोभन दाखवले जाते.

आभूषणांची ऑनलाईन विक्री करणाऱ्या एका जाहिरातीच्या लिंकवर अशीच फसवी लिंक प्रसृत करण्यात आली. बऱ्याच जाहिराती संक्षिप्त लिंक देतात ज्यात मूळ लिंक लपवलेली असते. खास दिवाळी भेट, फ्री, पूजा असे शब्द वापरून आपल्याला व्हाॅट‌्सॲप, एसएमएस, मेल पाठविले जातात आणि या परिचित शब्दांना भुलून आपण त्या दुव्यांवर क्लिक करतो आणि तिथेच फसतो. यापैकी बहुतांश डोमेन (.cn) हे चिनी आहेत. विशेष म्हणजे .top, .xyz असे शब्द असलेल्या डोमेनपासून आपण नेहमीच सावध राहिले पाहिजे. आपल्याला कुणी भेट पाठवली आहे हे पाहण्याच्या उत्सुकतेपोटी आपण या अशा फसव्या लिंकवर क्लिक करतो. अशा फसव्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपली माहिती या सायबरचोरांकडे उघड होते व यातून पुढे आर्थिक गुन्हे घडतात. अशा संक्षिप्त लिंक न उघडण्याचे बंधन आपण स्वतःवर घालून घ्यायला हवे. अगदी उत्सुकतेपोटीही आपल्याला अशा वेबसाइट्सवर जायचे असेल तर त्यापूर्वी wheregoes.com किंवा checkshorturl.com या वेबसाइट्सवर अशा संक्षिप्त लिंकच्या मूळ वेबसाइट्स सापडतात. याबाबत काही सामान्य नियम कायम लक्षात ठेवा-

१. दिवाळी किंवा इतर सणांच्या निमित्ताने फुकट काहीच मिळत नाही. जे प्रस्थापित उत्पादक आहेत ते व्हाॅट्सॲपसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कधीच प्रलोभने दाखवत नाहीत.

२. प्रस्थापित उद्योगांच्या उत्पादनाविषयी असे संदेश आपल्याला आल्यास त्या उद्योगाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन कंपनी अशी कोणती योजना देते आहे का ते तपासा.

३. संपर्क संदेशातील मसुद्याकडे लक्ष द्या. अशुद्ध भाषेत लिहिलेले संदेश तसेच आपली वैयक्तिक माहिती मागणारे संदेश फसवे असतात.

४. संशयास्पद अशा कुठल्याही दुव्यावर क्लिक करू नका. कारण अशा दुव्यांवरून आपली वैयक्तिक माहिती चोरणारे सॉफ्टवेअर- मालवेअर आपल्या मोबाईलमध्ये किंवा संगणकात उतरवले जाते.

५. सोशल मीडियावरील फुकट वस्तू वाटणाऱ्या संदेशांवर भुलू नका. एकदा विचार करा की, आपल्याला कोण कशाला काही फुकट देईल? अशा संदेशांद्वारे आपली माहिती घेऊन या लिंक पुन्हा गायब होतात. त्या पकडल्या जात नाहीत.

६. पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकेचे खाते क्रमांक, ओटीपी यांसारखे वैयक्तिक तपशील कधीही सोशल मीडियावरील लिंकवर देऊ नका. कोणतीही अधिकृत संस्था असे तपशील कधीच ऑनलाईन मागत नाहीत.

७. एखाद्या उत्पादनात आपल्याला स्वारस्य असल्यास त्या उत्पादकाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन पडताळणी करा. त्यांची खरोखर असे मोफत देण्याची काही योजना आहे का ते तपासा.

८. आपल्या संगणकासाठी, मोबाईलसाठी नेहमीच चांगल्या प्रतीचे अँटीव्हायरस वापरा. त्यामुळे अशा फसव्या दुव्यांपासून आपले संरक्षण होऊ शकेल.

सगळी काळजी घेतल्यानंतही काही फसवणूक झाली तर आपल्या फसवणुकीची तक्रार http://cybercrime.gov.in या लिंकवर करा. तसेच राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक १९३० वर सुद्धा संपर्क करावा. एक्स (ट्विटर) वर @cyberdost, फेसबुकवर CyberdostI4C, इन्स्टाग्रामवर cyberdostl4C यावर संपर्क करून तक्रार करू शकता. ग्राहक हा राजा आहे, पण या ग्राहकराजाला आपली सुरक्षा आपणच डोळसपणे करायची आहे, याचे भान असायला हवे. जाहिरातींना भुलू नका, अविश्वसनीय लिंकवर क्लिक करू नका. सुरक्षित राहा, सजग राहा आणि आपले संगणकीय ज्ञान वेळोवेळी अद्ययावत करत राहा.

- मुंबई ग्राहक पंचायत

(mgpshikshan@gmail.com)

logo
marathi.freepressjournal.in