जागतिक उच्च रक्तदाब दिन ; ६२ हजार मुंबईकर उच्च रक्तदाबाने त्रस्त

नियमित व्यायाम, योगा करण्याचे पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आवाहन
जागतिक उच्च रक्तदाब दिन ; ६२ हजार मुंबईकर उच्च रक्तदाबाने त्रस्त

बदलत्या जीवनशैलीमुळे आजारांना आमंत्रण असून उच्च रक्तदाब आणि मधुमेह सायलेंट किलर आहेत. २४ प्रभागांतील तब्बल २ लाख ६१ हजार १८५ घरांना भेटी देऊन ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ४ लाख ४५ हजार ५४९ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. नमुन्याची तपासणी करण्यात आली असता २९ हजार ६२४ उच्च रक्तदाबाचे संशयीत रूग्ण आढळून आले.

सर्वेक्षणाच्या १९व्या टप्प्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ६२ हजार ३९१ नागरिकांना आधीपासूनच उच्च रक्तदाब असल्याचे असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे योग्य उपचार आणि जीवनशैलीत बदल केला, तर उच्च रक्तदाब आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेहाला दूर ठेवण्यासाठी सर्वांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित योगा आणि व्यायाम करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १७ मे रोजीच्या ‘जागतिक उच्च रक्तदाब दिना’निमित्त केले आहे.

लठ्ठपणा, आहारातील मीठाचा अतिवापर, धुम्रपान व मद्यपान, ताण-तणाव आणि कोलेस्ट्रॉलच्या अतिउच्च पातळीमुळे उच्च रक्तदाबासारखे आजार जडण्याची शक्यता असते. परंतु, योग्य उपचार पद्धती आणि जीवनशैलीत बदल केले तर उच्च रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. रोजच्या आहारातील मीठाचे प्रमाण ५ ग्रॅम पेक्षा कमी ठेवा, पुरेशी झोप व विश्रांती घ्या, आहारात फळे, भाज्या व कमी चरबीयुक्त अन्नाचे सेवन करा आणि सर्वात म्हत्वाचे म्हणजे रक्तदाबाची नियमित तपासणी करा, असेही आवाहन पालिकेने केले आहे.

उच्च रक्तदाबाची लक्षणे

सतत डोके दुखणे, थकवा जाणवणे, छातीत दुखणे, धाप लागणे, अनियमित ह्दयाचे ठोके, अस्पष्ट/दुहेरी दृष्टी आणि अस्वस्थ वाटणे, ही उच्च रक्तदाबाची लक्षणे आहेत.

इतक्या जणांना त्रास

२ ऑगस्ट २०२२ ते ६ मे एप्रिल २०२३ या कालावधीत एकून १५ तपासणी केंद्रात १ लाख ३७ हजार ७३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यातील १४ हजार ३४२ उच्च रक्तदाबाचे संशयीत रूग्ण आढळून आले. तर १४ हजार ६८३ मधुमेहाचे संशयीत रूग्ण आढळून आले. शिवाय ५ हजार ५८९ रूग्णांना दोन्ही म्हणजे उच्च रक्तदाब आणि मधुमेह संशयीत असल्याचे आढळून आले आहे.

१५ रुग्णालयांत तपासणी

महानगरपालिकेने एकूण १५ रूग्णालयांमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी केंद्र सुरू केली आहेत. येथे रूग्णांची तपासणी व पाठपुरावा करून त्यांना पुढील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in