खाद्यपदार्थाइतकेच वेष्टन महत्वाचे!

वर्तमानपत्रात पॅक केलेले पदार्थ सेवन केल्यास वृत्तपत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये असलेली रसायने त्या पदार्थात मिसळून आपल्या पोटात जातात. ही रसायने घातक असल्याने त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात.
खाद्यपदार्थाइतकेच वेष्टन महत्वाचे!

ग्राहक मंच

जेव्हा आपण ठरवून जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी हॉटेलमध्ये पदार्थ आणायला स्वतः जातो तेव्हा आपण घरातूनच आपले स्टीलचे डबे घेऊन गेलो तर कोणतेही खाद्यवेष्टन आपल्याला लागणार नाही. याचा दुसरा फायदा म्हणजे या वेष्टनांचा नवीन कचरा घरी तयार होणार नाही. सुरुवातीला असे करणे आपल्याला गैरसोयीचे वाटू शकते. पण यामुळे थोड्या प्रमाणात पर्यावरण रक्षणही होईल.

अमिताला आज ऑफिस मधून निघायला खूपच उशीर झाला होता. त्यामुळे घरी पोहोचून जेवण करायला तिला वेळच मिळणार नव्हता आणि तिला खूप दमायलाही झाले होते. त्यामुळे तिने नवऱ्याला अनिशला फोन करून तसे कळवले आणि हॉटेलमधून जेवण मागवायला सांगितले. त्याप्रमाणे त्याने जेवण ऑर्डर केले. घरी आलेले ते गरमागरम पदार्थ पाहून त्यांना फारच बरे वाटले पण ते पाहून तिच्या मनात मात्र चरकले. डाळ प्लास्टिकच्या पिशवीत, चपात्या ॲल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळलेल्या होत्या तर भाजी प्लास्टिकच्या डब्यात आली होती. तसेच शिल्पासुद्धा संध्याकाळी घरी जाताना तिच्या नेहमीच्या वडेवाल्याकडून वडा/सामोसा असा काहीतरी नाश्ता वर्तमानपत्रात बांधून नेत असे; फार सोयीचे पडायचे ते तिला.

घरून ऑफिससाठी डबा नेताना पोळी गरम आणि मऊसूत राहावी म्हणून आपण ती ॲल्युमिनिअम फॉईलमध्ये गुंडाळून नेतो किंवा वरील उदाहरणाप्रमाणे हॉटेलमधूनही आपण डोसा, नान, तत्सम पदार्थ मागवतो; तेव्हा ते आपल्याला अशाच फॉईलमध्ये पॅक केलेले मिळतात. असे पदार्थ खूप वेळाने सेवन करतानासुद्धा आपल्याला आवडतात. तसेच काही वेळा रस्त्यावरील स्टॉलवर गरम पदार्थ, ताजे पदार्थ आपल्याला वर्तमानपत्रात पॅक करून मिळतात. कारण ही वर्तमानपत्रे स्वस्त आणि सहज उपलब्ध असतात. याबरोबरच गरम पदार्थ (उदा. सांबार) किंवा चहा/ कॉफीसुद्धा प्लास्टिकच्या पिशवीतून मिळते. ही वेष्टने आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करतात.

वर्तमानपत्रात पॅक केलेले पदार्थ सेवन केल्यास वृत्तपत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये असलेली रसायने त्या पदार्थात मिसळून आपल्या पोटात जातात. ही रसायने घातक असल्याने त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. यामुळे पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात, कर्करोग होऊ शकतो, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, शरीरातील महत्त्वाचे अवयव कमकुवत होतात. यासारख्या गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच अन्नाच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो. शिवाय आपण रद्दीत दिलेली वर्तमानपत्रे हाताळताना, वितरित करताना ती स्वच्छ ठिकाणी ठेवली जात नाहीत. त्यामुळे ती जंतुयुक्त आणि विषाणू असलेली असू शकतात. त्यातून आपण जर पदार्थ बांधून घेतले तर ते आपल्या पोटात जातात. फक्त छोटी हॉटेल्स आणि रस्त्यांवरचे विक्रेतेच कशाला काही घरांमध्येसुद्धा तळणीचे तेल टिपायला घरात सहज उपलब्ध असणारा वृत्तपत्राचा कागद वापरतात. तेव्हा हा विचारच करत नाहीत की, तेल कागदात शोषलं जातंय, पण त्याबदल्यात त्यावरील शाईतील घातक रसायने त्या पदार्थात मिसळली जात आहेत. असे शरीराचे होणारे नुकसान पाहता भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI – Food Safety and Standards Authority of India) च्या सीईओनी सर्व अन्नविक्रेते आणि ग्राहकांना 'खाद्यपदार्थ साठवण्यासाठी, डिलिव्हरी करण्यासाठी किंवा पॅकिंग करण्यासाठी वर्तमानपत्रे वापरणे त्वरित थांबवावे' असे आवाहन केले आहे.

भारतात काही राज्यांमध्ये असे दिसून आले आहे की, किडनी, घशाचे आजार, कर्करोग आणि वंध्यत्वाने ग्रस्त लोकांची संख्या वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे प्लास्टिक पिशवीतून आलेले गरम पदार्थ खाणे किंवा पेय पिणे. प्लास्टिकमध्ये पॉलिथिलीन, पॉलिव्हिनाईल क्लोराईड, पॉलिस्टीरिन असते, ते शरीराला हानिकारक असते. ग्रामीण भागात तर अशी उदाहरणे जास्त संख्येने आढळतात. प्लास्टिक जे पुनर्चक्रित (Recycled) प्लॅस्टिकपासून बनलेले आहे, ते प्लास्टिक खाद्यपदार्थ साठवण्यास, पॅकिंग करण्यास आणि वितरित करण्यास वापरणे यासाठी FSSAI ने मनाई केली आहे. सर्वसाधारणपणे (Polyethylene terephthalate - PET) आणि High-density polyethylene - HDPE) या संरचनेचे प्लास्टिक वापरायला हरकत नाही. ते शरीराला अपायकारक नाही. अशा प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या किंवा कॅटेनर्स खाद्यपदार्थ साठवायला किंवा वितरित करायला आपण वापरू शकतो. याचप्रमाणे ॲल्युमिनिअम फॉईलमध्ये गरम पोळी, डोसा, पराठा बांधतो किंवा ॲल्युमिनिअमच्या पिशवीत गरम पदार्थ ओततो, तेव्हा त्या पदार्थाची ॲल्युमिनिअम फॉईलबरोबर रासायनिक प्रक्रिया होते व तो पदार्थ आपल्याला सेवन करण्यास घातक ठरतो. त्यामुळे आपल्या निरामय आरोग्यासाठी असे करणे आपण टाळूया.

या कारणासाठी खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठी वर्तमानपत्रे आणि ॲल्युमिनिअम फॉईल व पुनर्चक्रित(Recycled) प्लॅस्टिक न वापरण्याचे FSSAI ने सर्वांना आवाहन केले आहे. FSSAI चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, खाद्यपदार्थांचे वेष्टन (पॅकेजिंग मटेरियल) असे हवे, जे कोणत्याही वातावरणात आतील अन्नपदार्थांचे योग्य प्रकारे जतन करेल (त्याचे शेल्फ लाइफ वाढवेल), पदार्थाच्या गुणवत्तेत कोणताही बदल करणार नाही, शिवाय ग्राहकांच्या आरोग्याचेही रक्षण होईल.

खाद्यपदार्थांची साठवणूक किंवा वितरण करण्यासाठी स्टील, झाडाची स्वच्छ व कोरडी पाने, काचेच्या बाटल्या यांचा उपयोग करावा असे FSSAI ने सूचित केले आहे. या निर्देशानुसार काही ठिकाणी आपल्याला आशादायक चित्र दिसते. ते म्हणजे बाहेरून प्लास्टिक किंवा पेपर असतो, पण आतून केळीची पाने असे खाद्यवेष्टन काही हॉटेल्स किंवा खाद्यविक्रेत्यांकडून आपल्याला मिळते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण या संस्थेच्या fssai.gov.in या वेबसाईटवर आपण पाहिल्यास खाद्यपदार्थांच्या वेष्टनांबद्दल सखोल माहिती मिळते. त्यांनी काढलेल्या पत्रकात कोणत्या खाद्यप्रकाराला कोणत्या आवरणाचे वेष्टन साठवणुकीसाठी आणि वितरणासाठी योग्य आहे, याची विस्तृत माहिती मिळते. ती माहिती वाचून आपण आरोग्यासाठी हानिकारक नसलेले खाद्यवेष्टन देण्याचे विक्रेत्यांना आवाहन करूया.

याचबरोबर अजून एक गोष्ट करता येईल ती म्हणजे, जेव्हा आपण ठरवून जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी हॉटेलमध्ये पदार्थ आणायला स्वतः जातो तेव्हा आपण घरातूनच आपले स्टीलचे डबे घेऊन गेलो तर कोणतेही खाद्यवेष्टन आपल्याला लागणार नाही. याचा दुसरा फायदा म्हणजे या वेष्टनांचा नवीन कचरा घरी तयार होणार नाही. सुरुवातीला असे करणे आपल्याला गैरसोयीचे वाटू शकते. पण यामुळे थोड्या प्रमाणात पर्यावरण रक्षणही होईल.

mgpshikshan@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in