दखल - अरविंद गुरव
सध्या सर्वत्र आयपीएलची धूम आहे. जिओ सिनेमाने आयपीएल सामन्यांचे थेट प्रक्षेपण विनामूल्य उपलब्ध करून दिल्याने आजची युवापिढी दुपारी साडेतीननंतर मोबाईलमध्ये शिरलेली पाहायला मिळत आहे. शहरातील तसेच खेडेगावातील युवावर्ग आपल्या हातातील कामधंदा सोडून मोबाईलवर क्रिकेटचे सामने बघण्यात व्यस्त आहे. तसेच एसटी बस व लोकलने प्रवास करणारे बहुतांश प्रवासी हेही मोबाईलमध्ये क्रिकेटचे सामने पाहण्यात मग्न झालेले दिसत आहेत. काही महाभाग या सामन्यांत एवढे गुंतून जातात की उतरायचे स्थानक येऊन गेले तरी त्यांना भान राहत नाही.
आतापर्यंत होऊन गेलेल्या आयपीएल सामन्यांपेक्षा यंदाचे आयपीएल एका विशेष कारणासाठी वेगळे ठरले आहे. यंदाचे आयपीएल सामने खेळाच्या मैदानापेक्षा मैदानाबाहेरच अधिक प्रमाणात खेळले जात आहेत. गेल्या वर्षभरापासून ‘ड्रीम इलेव्हन’च्या स्वप्नवत दुनियेत रमलेली युवापिढी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी नियोजित सामन्याकरिता टीम बनवण्यात व्यस्त दिसत आहे. पूर्वी आयपीएल सामन्यांची जाहिरातबाजी महिनाभर आधीपासून विविध वाहिन्यांवर आणि सामाजिक माध्यमांवर पाहायला मिळत असे. आयपीएल सामन्यांत सहभागी होणाऱ्या संघांतील खेळाडू विविध भागांतील आणि देशांतील असले तरी आपल्या संघाचे प्रतिनिधित्व करताना ते संघाशी एकरूप होत असत. प्रत्येक संघाची त्यांच्या ‘थीम साँग’सह लांबच्या लांब जाहिरात प्रसारित होत असे. या जाहिराती पाहण्यातही एक वेगळी गंमत होती.
यंदा मात्र आयपीएलच्या जाहिराती कमी आणि ‘ड्रीम इलेव्हन’च्याच जाहिराती समस्त वाहिन्यांवर आणि सामाजिक माध्यमांवर पाहायला मिळत आहेत. प्रत्येक संघातील नामवंत खेळाडू आयपीएलचे सामने पाहायचे नव्हे, तर ड्रीम इलेव्हनवर टीम बनवण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. जे ड्रीम इलेव्हनवर टीम बनवत नाहीत त्यांची गणना ही मंडळी मूर्खात करताना दिसत आहेत. क्रिकेटच्या खेळाडूंसह काही सिनेअभिनेते आणि अभिनेत्रीही ड्रीम इलेव्हनवर टीम बनवण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देत आहेत आणि त्यासाठी कोट्यवधी रुपयांचे गाजरही दाखवत आहेत. सोबत ड्रीम इलेव्हनवर आपले स्वप्न पूर्ण झाल्याचे, एक कोटी रुपये जिंकल्याचे अनुभव सांगणारी मंडळीही अधुनमधून दिसून येत आहेत. त्यामुळे ज्यांना क्रिकेटचे काडीमात्र ज्ञान नाही अशी मंडळीही ड्रीम इलेव्हनवर टीम कशी बनवायची याचे धडे इतरांकडून घेताना दिसत आहेत.
सिगारेट आणि गुटख्याच्या पाकिटांवर जसा वैधानिक इशारा छापलेला असतो, तशाप्रकारे हे ड्रीम इलेव्हनची जाहिरात करणारे प्रथितयश खेळाडू आणि नायक-नायिका जाहिरातींतून ‘या खेळांचे व्यसन लागू शकते. त्यामुळे हे खेळ आपल्या जबाबदारीवर खेळा’ अशा प्रकारचा वैधानिक इशाराही देतात. सिगारेट फुंकणारे आणि गुटखा-तंबाखूचे व्यसन जडलेले जसे पाकिटावरील वैधानिक इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात तशी ड्रीम इलेव्हनच्या आहारी गेलेली मंडळी सेलिब्रेटींनी दिलेल्या या इशाऱ्याकडे दुर्लक्षच करतात. ड्रीम इलेव्हनसोबत ‘माय इलेव्हन सर्कल’, ‘लीग इलेव्हन’ यांसारख्या इतरही काही ॲप्सच्या जाहिराती सामन्यादरम्यान पाहायला मिळतात.
ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर खेळला जाणारा जुगार ही आज एक मोठी समस्या बनली आहे; मात्र यातून सरकारला टॅक्ससुद्धा मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने सरकार त्यावर बंदी घालण्याच्या बाबतीत उदासीनच आहे. ऑनलाईन गेमिंग ॲप्सवर जुगार खेळण्याचे व्यसन आज युवापिढीला उद्ध्वस्त करत आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई का केली जात नाही? हा प्रश्नच आहे. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार जुगाराला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिराती करणे गुन्हा आहे, तरीही या ऑनलाईन जुगाराची जाहिरातबाजी रेल्वे-बससारख्या शासनाच्या अखत्यारितील वाहनांवरही बिनदिक्कतपणे सुरू आहे. या जाहिरातींवर बंदी आणण्याचे आदेश केंद्र आणि राज्य सरकारला देण्यात यावेत आणि कायद्यातील तरतुदींनुसार या ऑनलाईन खेळांवर कारवाई करण्यात यावी, अशा विनंती याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. याचा अर्थ सरकारने मनात आणले तर ऑनलाईन गेमिंग ॲप्सवर बंदी आणणे अवघड नाही.
ऑनलाईन जुगारामुळे युवापिढीची पर्यायाने त्यांच्या कुटुंबाची होणारी हानी थांबावी असे सरकारला वाटत नाही का? २०२३-२४ या आर्थिक वर्षात राज्याने मद्यविक्रीतून २१ हजार ५५० कोटी रुपयांचा महसूल जमवला आहे. यावरून राज्यात किती मोठ्या प्रमाणात मद्य रिचवले गेले असेल याची कल्पना येते. ऑनलाईन जुगारातून सरकारला मिळणाऱ्या धनाची आकडेवारी जाहीर केल्यास तीही अशीच भयावह असू शकते. युवापिढीला दारूच्या आणि जुगाराच्या नादाला लावून राज्यातील युवापिढी देशोधडीला लावण्याचा संकल्प सरकारने केला आहे का? असा संतप्त सवाल काही जागरूक नागरिकांकडून केला जात आहे. ड्रीम इलेव्हनसारख्या ॲप्समधून करोडपती झालेल्यांची माहिती दिली जाते; मात्र कितीजण कंगाल झाले याची माहिती कुठेच दिली जात नाही. ज्या ‘गेम्स’मुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत त्याकडे सरकार दुर्दैवाने केवळ अधिक उत्पन्न मिळवून देणारे साधन म्हणून पाहात आहे.
मध्यंतरी भारतरत्न सचिन तेंडुलकर याने एका गेमिंग ॲपची जाहिरात केली म्हणून आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या संघटनेसह सचिन तेंडुलकर याच्या विरोधात आंदोलन पुकारले होते. सचिनच्या घरापुढे निदर्शने करण्यात आली होती. सचिन तेंडुलकरने भारतरत्न परत करावा अशीही मागणीही यावेळी कडू यांनी केली होती. सचिन तेंडुलकर याला पैसे कमी पडत असतील तर गणेशोत्सवात प्रत्येक मंडळात त्याच्या नावाची एक दानपेटी ठेवली जाईल आणि त्यातून जमा होणारे पैसे अनंत चतुर्दशीनंतर सचिन तेंडुलकरला दिले जातील, मात्र त्याने जुगाराची जाहिरात करणे सोडावे, असा आग्रह आमदार बच्चू कडू यांनी धरला होता. आगामी काळात सरकारने जुगाराच्या ॲप्सवर बंदी न आणल्यास समस्त जनता या गेमिंग ॲप्सच्या जाहिराती करणाऱ्या खेळाडू, नायक-नायिकांसह राज्य सरकारच्या विरोधात अशा प्रकारचे निधी संकलन आंदोलन उभे करण्यास मागेपुढे पाहणार नाही हे सरकारने लक्षात ठेवावे!