भवताल
ॲड. वर्षा देशपांडे
धार्मिक, जातीय, लैंगिक समानता आणि सलोखा प्रस्थापित करणारी वारकरी परंपरा नासविणाऱ्या प्रवृत्तींनी आधी आवई उठविल्याप्रमाणे लवकरात लवकर फेटा खाली ठेवला तर बरे होईल.
अलीकडेच वर्षाला शंभर कीर्तने करणाऱ्या आणि पुढील दोन वर्षे फुल्ल बुकिंग असणारे (त्याला कीर्तन तरी कसे म्हणावे?) महाराष्ट्रातील सर्वात जास्त किमतीची सुपारी घेणारे आणि हजारो लोकांच्या उपस्थितीत सवंग टाळ्या घेऊन तद्दन फालतू विनोद करत स्टँडिंग कॉमेडी शो करणारे, स्त्रिया आणि महिलांविषयी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीकाटिप्पणी करणारे, पुरुषी प्रवृत्तीचे ‘कलाकार’ महाराज मुलीच्या साखरपुड्यामुळे ट्रोल केले गेले. म्हणून फेटा खाली ठेवणार अशी त्यांनी आवई उठवली. त्याचाच आदर्श समोर ठेवून कीर्तन आणि वारकरी विचाराला काळीमा फासणारे प्रति ××× महाराज होण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील अनेक तरुण सो कॉल्ड कीर्तनकारांची संख्या बोकाळली आहे. सोप्या मार्गाने पैसे मिळवण्याचा हा धंदा झाला आहे. अशा या शिक्षक राहिलेल्या आणि शिक्षकी पेशा सोडून लाखो रुपयांची बिदागी घेऊन शो करणाऱ्या माणसाने आपल्या मुलीचा खर्चिक साखरपुड्याचा सार्वजनिक इव्हेंट करून आणखीन एक चुकीचा पायंडा आणि परंपरा समाजासमोर आणली. त्यासाठी अतिशय हीन पातळीवर जाऊन त्यांना आणि त्यांच्या मुलीला ट्रोल केले ही गोष्ट अमान्य आणि निषेधार्ह आहे.
परंतु आपल्या शोमध्ये इतरांच्या मुलींवर, बायकांवर ट्रोलरपेक्षा खालच्या पातळीवर जाऊन ज्या पद्धतीचे वक्तव्य या महाराजांनी केले आहे, जे त्या वेळच्या त्यांच्या वक्तव्यामुळे टीकेला आणि कायदेशीर कारवाईला पण पात्र ठरले आहेत. सदर महाराज यांच्याविरुद्ध संगमनेर कोर्टामध्ये गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भधारणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. आपल्या शो मध्ये कायद्याचे उल्लंघन करणारे वक्तव्य केले म्हणून केस दाखल आहे. उच्च न्यायालयात अपील प्रलंबित आहे. ‘दुसऱ्याचं ते कार्ट आणि आपला तो बाळ्या’ अशीच भूमिका असणाऱ्या या महाराजांना महाराष्ट्रात कायदेशीर कारवाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ट्रोलरने जेव्हा ट्रोलधाड टाकून त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलीवर त्यांच्याच पातळीवर उतरून ट्रोलिंग सुरू केले तेव्हा व्यथित झालेल्या या महाराजांनी फेटा खाली ठेवण्याची आवई उठवली आहे.
धार्मिक, जातीय, लैंगिक समानता आणि सलोखा प्रस्थापित करणारी वारकरी परंपरा नासविणाऱ्या या प्रवृत्तीने लवकरात लवकर फेटा खाली ठेवला तर बरे होईल. त्यामुळे महाराष्ट्रातील वारकरी समतेच्या परंपरेतील व्हायरस आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या मिनी व्हायरसची फौज आटोक्यात राहील. कीर्तनाच्या नावाखाली तद्दन भंपकगिरी करणारी ही वृत्ती नाहीशी झाल्यास शाही साखरपुड्याचे आभारच मानावे लागतील.
परंतु एवढा मोठा आर्थिक लाभ आणि प्रसिद्धी मिळवून देणारा हा धंदा कोणी सुखासुखी सोडणार नाही. साखरपुड्यावर झालेल्या ट्रोलिंगमुळे चर्चेत असणारे हे कुटुंब आता लग्न कसे करणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे.
जेवढी चूक या तथाकथित महाराज लोकांची आहे तेवढ्याच चुका अशा महाराजांना मोठी आर्थिक बिदागी देऊन हजारोंच्या संख्येने लोक जमावेत व त्यांना सवंग विनोदी शो पाहायला मिळावा अशी भूमिका असणाऱ्या संस्था-संघटनांची ही महाराष्ट्रातील सांस्कृतिक धार्मिक उंची नासवणारी प्रवृत्ती म्हणून निषेध करायला हवा. सुपारी देणारेही तेवढेच जबाबदार आहेत.
हुंडाबंदीच्या कायद्यानुसार हुंडा देणे-घेणे दोन्ही गुन्हा आहे. म्हणून अशा साखरपुड्यांमध्ये झालेल्या खर्चाचा लेखाजोखा काढून त्यासाठी खर्चण्यात आलेला पैसा काळा होता की पांढरा, याचा शोध घेऊन तो खर्च करणाऱ्यावर देखील कायदेशीर कारवाई व्हायला हवी. मुलींना माहेरच्या स्थावर जंगम मालमत्तेमध्ये हक्क नाकारणारे आईबाप आपल्या स्टेटससाठी म्हणून अशा शाही साखरपुड्याचे, लग्नाचे आयोजन करत असतात. यावरच महाराष्ट्रासह देशभरातील इव्हेंट मॅनेजमेंट करणारे आणि अशा लॉन्सच्या माध्यमातून धंदा करणारे टिकून आहेत.अशा ठिकाणी जाऊन तिथली शोभा वाढवून मिरवणाऱ्या राजकीय नेत्यांच्या अकलेचे, वैचारिक आणि नैतिकतेच्या पातळीचे दिवाळे कधीचेच निघाले आहे. त्यांच्याविषयी आता किती आणि काय बोलावे?
स्वतः सभागृहामध्ये बसून हुंडाबळी, लैंगिक अत्याचार, शक्ती बिल, स्त्रियांची सुरक्षा, स्त्री सन्मान, कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक हिंसा, बाल लैंगिक शोषण, अशा विषयांवर बोलून सभागृहात कायदे पारित करणारे हे नेते उघडपणे कायद्याचे उल्लंघन होत असताना कायदा मोडणाऱ्यांच्या सोबत उभे असतात. असल्या बेकायदेशीर इव्हेंटमध्ये ते सहभागी आणि साक्षीदार होतात. फौजदारी कायद्यांतर्गत ज्या महाराजांविरुद्ध गुन्हा दाखल आहे त्या तथाकथित महाराजांच्या या शाही साखरपुड्याला उपस्थित असणाऱ्या राजकीय नेत्यांनाही खासदार, आमदार म्हणून अपात्र ठरवले पाहिजे. अशा या समारंभांना समाजमाध्यमांवर मिळणारी अफाट प्रसिद्धी व लाइक्सना जेव्हा रोलरच्या माध्यमातून आव्हान उभे केले गेले तेव्हा राजकीय नेते पळ काढताना दिसतात आणि महाराज लोक फेटा खाली ठेवण्याची भाषा करतात. पुन्हा मात्र परिस्थितीचा बळी स्त्रीच ठरते आणि मग हुंडाबळी वैशाली हगवणे ठरते आणि आत्महत्या करते. शाही साखरपुड्यातील नवरी मुलगी ट्रोल होते आणि पुन्हा अशा प्रसंगी स्त्रिया आणि मुलीच त्यांची प्रतिमा आणि चारित्र्य पणाला लावतात. जोपर्यंत स्त्रिया आपल्या मनावर आणि शरीरावर आपलाच हक्क आहे, आपण आपला ऑब्जेक्ट म्हणून वापर होऊ देणार नाही, कोणीही आपले लग्न-साखरपुडा यासारखे इव्हेंट आपले स्टेटस आणि आपली श्रीमंती दाखवण्यासाठी वापरणार नाही अशी भूमिका घेत नाहीत तोपर्यंत मुक्त अर्थव्यवस्थेत बायकांच्या खांद्यावर आपल्या प्रतिष्ठेची बंदूक ठेवून तिला आत्महत्या करायला लावतील किंवा ट्रोलचे बळी ठरवतील. टांगत्या तलवारी बायकांच्याच डोक्यावर टांगून हे पुरुषी लोक प्रतिष्ठा मिरवत राहतील.
हे इव्हेंट्स साजरे होत असताना ‘सैराट’मधल्या आर्चीप्रमाणे डोळ्याला गॉगल लावून बॉलीवूड किंवा तमिळ सिनेमातल्या नटीप्रमाणे अंगविक्षेप करत गाड्यांच्या ताफ्यासमोर आमच्या शालीन महाराष्ट्रातील ज्ञानेश्वरी वारकरी परंपरेला सुरुंग लावत राहणार आणि आपल्या सवंग प्रसिद्धीच्या मागे लागणाऱ्या बापामुळे पुन्हा पुन्हा ट्रोल होत राहणार.
टोळधाडीचा आणि त्यांनी वापरलेल्या भाषेचा आम्ही निषेधच करतो. फेटा खाली ठेवण्याच्या त्यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. त्यामुळे भविष्यकाळात तरी महाराष्ट्रातील समतावादी शालीन, सुसंस्कृत, धार्मिक वारकरी परंपरेचे आणखी होणारे नुकसान थांबेल असे आम्हाला वाटते. मुलीच्या लग्नापूर्वीच त्यांनी हा निर्णय घ्यावा हे बरे होईल. परंतु त्यांनी तसे न केल्यास महाराष्ट्राने त्यांच्या तथाकथित स्टॅँडिंग कॉमेडी शोमध्ये त्यांनी स्त्रियांविषयी आणि महिलांविषयी वापरलेल्या असंवैधानिक टिप्पणीबद्दल जनसुनवाई घेण्यात यावी आणि महाराष्ट्रातील जनतेने वारकरी संप्रदायाला स्मरून ते दोषी आढळल्यास त्यांना दंड ठोठावा किंवा शिक्षा द्यावी आणि महाराष्ट्रातील जनतेची माफी मागायला लावावे. त्यामुळे भविष्यकाळात ‘बोले तैसे चाले त्याची वंदावी पावले’ असे म्हणणे शक्य होईल, पण हे धाडस महाराष्ट्रात कोण दाखवणार?
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेक लाडकी अभियानच्या संस्थापक