
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि.६) मुंबई पुष्पोत्सवाचे उद्घाटन होणार असून रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात ६ ते ८ फेब्रुवारी या तीन दिवसांच्या कालावधीत यंदाचा पुष्पोत्सव भरवला जाणार आहे.
संगीत मैफिलीत आपण बासरी, वीणा, टाळ-मृदुंग, सतार, सनई-चौघडा, हार्मोनियम, पखवाज, तबला, तुतारी, सेक्साफोन, गिटार यांसारख्या संगीत वाद्यांतून आतापर्यंत स्वर झंकारलेले ऐकले असतील. त्यात मंत्रमुग्धही झाले असाल. पण आता याच वाद्यांतून यंदाच्या मुंबई पुष्पोत्सवात मन मोहून टाकणारा सुगंध दरवळणार आहे.
यंदाच्या पुष्पोत्सवात संगीत विश्वातील विविध वाद्यांची प्रतिकृती विविधरंगी पाना-फुलांनी साकारण्यात आले आहे.
मुंबई पुष्पोत्सवाची खासियत म्हणजे आपल्याला एकाच छताखाली वेगवेगळ्या रंगांची, सुगंधाची फुलझाडे पाहायला मिळतात. त्यासाठी महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून विशेष परिश्रम घेतले जातात.
रोपांची लागवड, त्यांची निगा राखणे, त्यांची सजावट करणे या गोष्टींवर उद्यान विभागाचे अधिकारी-कर्मचारी लक्ष ठेवून असतात.
यंदाचा हा २९वा पुष्पोत्सव आहे. आतापर्यंत या पुष्पोत्सवात कार्टून, आमची मुंबई, संगीत, सेल्फी पॉइंट, डिस्ने लँड, जलजीवन, ॲक्वाटिक वर्ल्ड, ॲनिमल किंग्डम, भारताची राष्ट्रीय प्रतीके आदी संकल्पनांवर आधारित फुलांची सजावट करण्यात आली आहे.
पुष्पोत्सवातील देखाव्यात बासरी, वीणा, टाळ-मृदूंग, सतार, सनई-चौघडा, हार्मोनियम, पखवाज, तबला, तुतारी, सेक्सोफोन, गिटारची प्रतिकृती साकारली आहे.
वाद्यांची सुंदर प्रतिकृती संगीत आणि पुष्पप्रेमींना खिळवून ठेवणारी आहे. दरवर्षी हा उत्सव एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित असतो.