चैत्र नवरात्री सुरू आहे. नवरात्रीसाठी अनेकजण नऊ दिवस उपवास करतात. उपवासासाठी नेहमी साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा येतो. त्याऐवजी करा साबुदाण्याचे स्वादिष्ट पराठे सोबत चवीला कोथिंबिरीची चटणी. चला जाणून घ्या रेसिपी-
साबुदाण्याचे पराठे करण्यासाठी साबुदाणा आणि उकडलेले बटाटे स्मॅश करून घेणे आवश्यक आहे.
तुम्हाला नेहमी साबुदाण्याचे पराठे खायचे असेल तर तुम्ही एकदाच साबुदाण्याचे पीठ करून ठेवा. साबुदाण्याचे पीठ करण्यासाठी प्रथमतः साबुदाणा छान भाजून घ्या.
मिक्सरमध्ये साबुदाणा एकदम बारीक करून घ्या.
थोडासा साबुदाणा पराठे लाटताना आवश्यक असेल त्यासाठी आधीच एका प्लेटमध्ये काढून घ्या.
आता साबुदाण्याचे पीठ, कोथिंबीर, बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या किंवा हिरव्या मिरचीची चटणी, जिरा आणि सैंधव मीठ एकत्र करून हे मिश्रण पीठ मळतो त्याप्रमाणे मळून घ्या.
हे पीठ किमान १५ मिनिटे तसेच ठेवा. जेणेकरून ते मुलायम होईल.
तोपर्यंत कोथिंबिरीची हिरवी चटणी मिक्सरमध्ये हिरव्या मिरची आणि जिरे घालून तयार करून घ्या.
मळलेले पीठ चांगले मऊ झाले आहे का ते बोटाने तपासून पाहा.
आता या मळलेल्या पीठाचे छोटे-छोटे गोळे करून ते छान लाटून घ्या. पराठे थोडे जाडसरच लाटावे.
पराठे पॅनवर घेऊन छान भाजावे. निम्मा पराठा भाजत आला की त्याला तूप लावावे.
अशा प्रकारे पराठा बदामी रंगापर्यंत भाजावा.
तयार झालेले पराठे कोथिंबिरीच्या हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करावे.