विश्वविजेत्या संघावर BCCI कडून पैशांचा पाऊस, टीम इंडिया'ला तब्बल १२५ कोटी रुपये बक्षीस

बीसीसीआयकडून विश्वविजेत्या संघाला तब्बल १२५ कोटी रुपये बक्षिस रुपात दिले जाणार असल्याची माहिती, बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी एक्स (पूर्वीचे ट्वीटर) पोस्टच्या माध्यमातून दिली.
विश्वविजेत्या संघावर BCCI कडून पैशांचा पाऊस, टीम इंडिया'ला तब्बल १२५ कोटी रुपये बक्षीस
bcci

मुंबई : काल बार्बाडोसमध्ये झालेल्या T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला आणि विश्वचषकावर नाव कोरलं. प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियातील सर्वच खेळाडूंनी दमदार सांघिक कामगिरीच्या जीवावर विश्वचषकातील सर्वच्या सर्व सामने जिंकून विश्वविजेत्यांचा किताब मिळवला. दरम्यान टीम इंडियाच्या या कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय-BCCI) टीम इंडियांवर पैशांचा पाऊस पाडला आहे. बीसीसीआयकडून विश्वविजेत्या संघाला तब्बल १२५ कोटी रुपये बक्षिस रुपात दिले जाणार असल्याची माहिती, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक्स (पूर्वीचे ट्वीटर) पोस्टच्या माध्यमातून दिली.

विश्वविजेत्या संघाला १२५ कोटी रुपयांचं बक्षीस-

जय शाह यांनी एक्स पोस्टमध्ये विजेत्या भारतीय संघाचा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, "ICC पुरुष T20 विश्वचषक २०२४ जिंकल्याबद्दल टीम इंडियासाठी १२५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करताना मला आनंद होत आहे. संपूर्ण स्पर्धेत संघाने प्रतिभा, दृढनिश्चय आणि खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन केले आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन!"

रोमहर्षक सामन्यात भारताचा विजय-

वेस्ट इंडिय येथील बार्बाडोस येथे झालेल्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताची गाठ दक्षिण आफ्रिकेशी पडली. दोन्हीही संघांनी या विश्चचषकातील सर्वच्या सर्व सामने जिंकत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळं हा सामना अटीतटीचा होणार, हे निश्चित होतं. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या पडझडीनंतर विराट कोहलीच्या ७६ आणि अक्सर पटेलच्या ४७ धावांच्या जीवावर भारतानं २० षटकांत ८ बाद १७६ धावा केल्या.

टीम इंडियाच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिका संघाला २० षटकांत ८ बाद १६९ धावाच करता आल्या. टीम इंडियाने सात धावांनी विजय मिळवला, आफ्रिकेच्या फलंदाजांना रोखण्यामध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली. हार्दिक पंड्या ३ तर बुमराह आणि अर्शदीप यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. दरम्यान विराट कोहलीला सामनावीर, तर जसप्रीत बुमराहला मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. दरम्यान या सामन्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्तीची घोषणा केली, तर आज अष्टपैलू रविंद्र जडेजानंही टी २० मधून निवृत्तीची घोषणा केली.

logo
marathi.freepressjournal.in