भारताच्या तन्वीचा आशियात डंका! कनिष्ठ आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतील १५ वर्षांखालील गटात विजेतेपदावर मोहोर

Tanvi Patri: भारताच्या तन्वी पत्रीने शनिवारी कनिष्ठ आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतील मुलींच्या १५ वर्षांखालील गटात विजेतेपदाला गवसणी घातली.
भारताच्या तन्वीचा आशियात डंका! कनिष्ठ आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतील १५ वर्षांखालील गटात विजेतेपदावर मोहोर
Badminton Association of India
Published on

नवी दिल्ली : भारताच्या तन्वी पत्रीने शनिवारी कनिष्ठ आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतील मुलींच्या १५ वर्षांखालील गटात विजेतेपदाला गवसणी घातली. ओदिशाच्या तन्वीने केलेल्या या चमकदार कामगिरीमुळे आशियात भारताचा तिरंगा डौलाने फडकला आहे. चीनमध्ये ही स्पर्धा पार पडली.

१३ वर्षांच्या तन्वीने एकेरीच्या अंतिम सामन्यात व्हिएतनामच्या थि ह्युएन एन्गुएनला ३४ मिनिटांत धूळ चारली. अग्रमानांकित तन्वीने दुसऱ्या मानांकित एन्गुएनवर २२-२०, २१-११ असे सरळ दोन गेममध्ये वर्चस्व गाजवले. भारतासाठी १५ वर्षांखालील गटात आशियाई जेतेपद मिळवणारी तन्वी ही तिसरी महिला खेळाडू ठरली. यापूर्वी समिया फारुकी (२०१७) आणि तस्निम मिर (२०१९) यांनी अशी कामगिरी नोंदवली होती.

तन्वीने या स्पर्धेत एकही गेम न गमावता विजेतेपद पटकावले. तिने सलग पाच लढती जिंकल्या. अंतिम फेरीतही एकवेळ तन्वी पहिल्या गेममधअये ११-१७ अशी पिछाडीवर होती. मात्र तिने झोकात पुनरागमन करताना एन्गुएनला चुका करण्यास भाग पाडल्या. मग दुसऱ्या गेममध्ये तन्वीने जबरदस्त खेळ करत एन्गुएनला निष्प्रभ केले.

याव्यतिरिक्त, १७ वर्षांखालील मुलांच्या गटात भारताच्या घाना दत्तूने कांस्यपदक पटकावले. त्याला उपांत्य सामन्यात इंडोनेशियाच्या रादिध्या वर्धनने नमवले होते. भारताच्या अन्य तीन स्पर्धकांना मात्र उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला.

भारतीय बॅडमिंटनचे भवितव्य उज्ज्वल आहे, हे तन्वीच्या आशियाई जेतेपदाद्वारे अधोरेखित झाले. तसेच कांस्यपदक विजेत्या दत्तूचेही अभिनंदन. यापुढील स्पर्धांमध्येही आपले युवा खेळाडू अशीच चमकदार कामगिरी करत राहतील, याची मला खात्री आहे.
- संजय मिश्रा, भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सचिव

भारतासाठी १५ वर्षांखालील गटात आशियाई जेतेपद मिळवणारी तन्वी ही तिसरी महिला खेळाडू ठरली. यापूर्वी समिया फारुकी (२०१७) आणि तस्निम मिर (२०१९) यांनी अशी कामगिरी नोंदवली होती.

logo
marathi.freepressjournal.in