

वैभव सूर्यवंशीने विजय हजारे ट्रॉफीच्या (२०२५-२६) पहिल्याच सामन्यात इतिहास रचला. १४ वर्षीय वैभव 'लिस्ट ए' क्रिकेटमध्ये शतक करणारा जगातील सर्वात युवा खेळाडू ठरला. बुधवारी (दि.२४) बिहारकडून खेळताना वैभव सूर्यवंशीने अरुणाचल प्रदेशविरुद्ध ८४ चेंडूत १९० धावा केल्या. या खेळीदरम्यान वैभवने १६ चौकार आणि १५ षटकार मारले. त्याने फक्त ३६ चेंडूत आपले तुफानी शतक पूर्ण केले. या शतकासह त्याने अनेक दिग्गज खेळाडूंचे रेकॉर्ड्स मोडले.
लहान वयात मोठी कामगिरी
वैभव हा पुरुषांच्या 'लिस्ट ए' क्रिकेटमध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू (१४ वर्षे, २७२ दिवस) ठरला. यापूर्वी, हा विक्रम पाकिस्तानच्या झहूर इलाहीच्या नावावर होता. त्याने १९८६ च्या विल्स कपमध्ये १५ वर्षे २०९ दिवसांच्या वयात पाकिस्तान ऑटोमोबाईल्सकडून रेल्वेविरुद्ध शतक झळकावले होते.
AB डिव्हिलियर्सचा मोडला रेकॉर्ड
बिहारकडून डावाची सुरुवात करताना वैभव सूर्यवंशीने दक्षिण आफ्रिकेचा माजी महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा एक मोठा विक्रमही मोडला. वैभवने फक्त ५९ चेंडूत १५० धावांचा टप्पा गाठला. यापूर्वी 'लिस्ट ए' क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० धावांचा विक्रम डिव्हिलियर्सच्या नावावर होता. २०१५ च्या विश्वचषकात डिव्हिलियर्सने ६४ चेंडूत १५० धावा केल्या होत्या.
'लिस्ट ए' क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक
बिहारचा कर्णधार साकिब गनीने भारतीय 'लिस्ट ए' क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम केला. साकिबने फक्त ३२ चेंडूत शतक ठोकले. ईशान किशन आता यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने झारखंडकडून खेळताना कर्नाटकविरुद्ध ३३ चेंडूत शतक ठोकले. यापूर्वी, हा विक्रम अनमोलप्रीत सिंग यांच्या नावावर होता, ज्यांनी २०२४ मध्ये अरुणाचल प्रदेशविरुद्ध पंजाबकडून ३५ चेंडूत शतक झळकावले होते. आता, वैभव सूर्यवंशीदेखील या क्लबमध्ये सामील झाला आहे.
'लिस्ट-ए' क्रिकेटमधील सर्वात जलद शतक ठोकणारे फलंदाज (जागतिक क्रमवारी):
जेक फ्रेझर-मॅकगर्क - २९ चेंडू (ऑस्ट्रेलिया)
एबी डिव्हिलियर्स-३१ चेंडू (दक्षिण आफ्रिका)
अनमोलप्रीत सिंग- ३५ चेंडू (भारत)
वैभव सूर्यवंशी- ३६ चेंडू (भारत)
कोरी अँडरसन- ३६ चेंडू (न्यूझीलंड)
ग्रॅहम रोझ-३६ (इंग्लंड)
शाहिद आफ्रिदी-३७ चेंडू (पाकिस्तान)
ग्लेन मॅक्सवेल-४० चेंडू (ऑस्ट्रेलिया)
युसूफ पठाण-४० चेंडू (भारत)
वैभवचा शतकी झंझावात सुरूच
आयपीएलपासून सुरू झालेला वैभव सूर्यवंशीचा शतकी झंझावात विजय हजारे स्पर्धेतही कायम आहे. रांची येथील जेएससीए ओव्हल मैदानावर बुधवारी (दि.२४) बिहार आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात सामना खेळला गेला. वैभवने ८४ चेंडूंत १६ चौकार व १५ षटकारांचा वर्षाव करताना तब्बल १९० धावा काढल्या. त्यामुळे बिहारने प्लेट गटात अरुणाचल प्रदेशविरुद्ध ५० षटकांत ६ बाद ५७४ धावांचे शिखर रचले. याच लढतीत बिहारचा कर्णधार सकिबुल घानीने ४० चेंडूंत १२८ धावा फटकावल्या. त्याने अवघ्या ३२ चेंडूंत शतक झळकावले. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा मान त्याने मिळवला. तसेच बिहारने लिस्ट-ए प्रकारातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या रचली. प्रत्युत्तरात अरुणाचल प्रदेशचा संघ १७७ धावांत गारद झाला. त्यामुळे बिहारने ३९७ धावांनी विक्रमी विजय मिळवला. वैभवने लिस्ट-ए प्रकारात सर्वात वेगवान दीडशतक साकारण्याचा पराक्रम केला.