
कझाकस्तानात आयोजित करण्यात आलेल्या ‘आयर्नमॅन’ स्पर्धेत नाशिकच्या १९ जणांनी ‘आयर्नमॅन’ उपाधीचा मान मिळविला. स्वीमिंग, सायकलिंग आणि रनिंग या क्रीडाप्रकारांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत सलग तीन वेळा अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करीत प्रशांत डबरी, महेंद्र छोरीया आणि अरुण गचाले यांनी आयर्नमॅन स्पर्धा जिंकत हॅटट्रिक साधली.
आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणाऱ्यांमध्ये नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील महिला पोलिस अश्विनी देवरे यांचाही समावेश आहे. त्या आयर्नमॅन उपाधी मिळविणाऱ्या महाराष्ट्र पोलिस दलातील पहिल्याच महिला पोलिस कर्मचारी असण्याची शक्यता आहे. स्वीमिंग, सायकलिंग आणि धावणे, अशी ही खडतर आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगभरात अनेक ठिकाणी ‘आयर्नमॅन’ स्पर्धा आयोजित केली जाते. कझाकस्तानात आयोजित करण्यात आलेल्या ‘आयर्नमॅन’ स्पर्धेसाठी नाशिकमधील १९ जणांनी सहभाग घेतला होता.
एक दोन नव्हे तर सर्वच स्पर्धकांनी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करत एकप्रकारे विक्रमच साधला आहे. यापूर्वी प्रशांत डबरी, महेंद्र छोरीया आणि अरुण गचाले या खेळाडूंनी दोन आयर्नमॅन स्पर्धा जिंकल्या आहेत. यामुळे नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला आहे. ३.८ किमी स्वीमिंग, १८० किमी सायकलिंग आणि ४२ किमी रनिंग असे या स्पर्धेचे स्वरूप होते.
‘आयर्नमॅन’चे मानकरी
डॉ. वैभव पाटील, डॉ. पंकज भदाणे, डॉ. दुष्यंत चोरडिया, डॉ. देविका पाटील, डॉ. अरुण गचाळे, किशोर काळे, माणिक निकम, अनिकेत झंवर, प्रशांत डाबरी, अश्विनी देवरे, नीलेश झंवर, नीता नारंग, आविष्कार गचाळे, निसर्ग भामरे, अरुण पालवे, महेंद्र छोरिया, किशोर घुमरे, विजय काकड, धीरज पवार.