खान कुटुंबासाठी २०२४ ठरतंय आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष! मुंबईच्या ४२व्या रणजी जेतेपदाचा शिल्पकार ठरलेल्या मुशीरचे मनोगत

खान कुटुंबासाठी २०२४ ठरतंय आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष! मुंबईच्या ४२व्या रणजी जेतेपदाचा शिल्पकार ठरलेल्या मुशीरचे मनोगत

माझ्या वडिलांनी आम्हा दोन्ही भावांसाठी गेली अनेक वर्षे सातत्याने मेहनत घेतली आहे. त्याचे फळ आता मिळण्यास सुरुवात झाली असून...

ऋषिकेश बामणे/मुंबई

माझ्या वडिलांनी आम्हा दोन्ही भावांसाठी गेली अनेक वर्षे सातत्याने मेहनत घेतली आहे. त्याचे फळ आता मिळण्यास सुरुवात झाली असून २०२४ हे वर्ष आमच्या कुटुंबासाठी खास ठरत आहे, अशा शब्दांत १९ वर्षीय युवा अष्टपैलू मुशीर खानने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

मुशीरने १३६ धावांची खेळी साकारून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. मुंबईने विदर्भाचा १६९ धावांनी धुव्वा उडवून तब्बल ४२ वेळा रणजी करंडक उंचावला. त्यानंतर मुशीरने मैदानातच उपस्थित असलेले वडील नौशाद खान यांना कडाडून आलिंगन दिले. मुशीरला अंतिम फेरीतील सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. यावेळी नौशाद यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.

विशेष म्हणजे मुशीरचा मोठा भाऊ सर्फराझ खाननेसुद्धा फेब्रुवारीत भारतीय कसोटी संघाकडून पदार्पण केले. सर्फराझने पहिल्याच कसोटीत अर्धशतक झळकावून सर्वांची मने जिंकली. दुसरीकडे मुशीरने १९ वर्षांखालील युवा विश्वचषकात दोन शतकांसह लक्ष वेधले होते. रणजीतील कामगिरीद्वारे त्याने आपले नाणे आणखी खणखणीत वाजवून दिले आहे. ५२ वर्षीय नौशाद हे स्वत: एकेकाळी मुंबईकडून रणजी क्रिकेट खेळायचे. मात्र आपल्या दोन्ही मुलांना आता भरारी घेताना पाहून तेसुद्धा नक्कीच समाधानी असतील.

“अंतिम फेरीत प्रत्येक धाव केल्यानंतर मी माझे वडील आणि एमसीए प्रेसिंडट बॉक्समध्ये बसलेल्या सचिन तेंडुलकर यांच्याकडे पाहत होतो. त्यावेळी संघासाठी खेळपट्टीवर ठाण मांडून एकेरी-दुहेरी धावा वसूल करणे गरजेचे होते. माझ्यावर फक्त तेव्हाच दडपण असते, जेव्हा नेटमध्ये फलंदाजी करत असताना पाठीमागे माझे अब्बू (वडील) उभे असतात. आता फक्त माझ्या रणजी कारकीर्दीची सुरुवात झाली आहे. अद्याप बराच मोठा पल्ला गाठायचा आहे,” असे मुशीर म्हणाला. मुशीरने रणजी स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात द्विशतक, उपांत्य सामन्यात अर्धशतक तर अंतिम लढतीत शतक साकारून चमक दाखवली.

“माझ्या फलंदाजीविषयी सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र मी कारकीर्दीची सुरुवात एक डावखुरा फिरकीपटू म्हणूनच केली होती. मुंबईच्या संघात मला गोलंदाजी करण्याची फारशी संधी लाभली नाही,” असेही मुशीरने सांगितले.

तो फिर वानखेडे पर मिलेंगे!

मुशीरचे वडील नौशाद यांना आयपीएलमध्ये भेटू असे म्हटल्यावर, दोन मुलांपैकी एकालाही यंदाच्या आयपीएलमध्ये संधी मिळाली, तर लवकरच वानखेडेवर पुन्हा भेटू, असे त्यांनी गमतीत उत्तर दिले.

आयपीएलमध्ये नसल्याचे दु:ख नाही!

आयपीएलमध्ये मुशीर अथवा सर्फराझचा कोणत्याही संघात समावेश नाही. मात्र याची आपल्याला खंत नसल्याचे मुशीर म्हणाला. “माझ्या वडिलांनी मला नेहमी देशासाठी खेळण्याला प्राधान्य देण्याचे सुचवले. मी देशासाठी सातत्याने चांगली कामगिरी केली, तर आयपीएलमध्ये संधीही एक दिवस मिळेलच, असे मुशीरने नमूद केले. तसेच पुढील आयपीएल हंगामापर्यंत आपण टी-२० प्रकारातील खेळ सुधारण्याकडेही लक्ष देऊ, असे मुशीर म्हणाला. त्याशिवाय युवा विश्वचषकात उत्तम कामगिरी झाल्याने रणजीत संधी मिळाल्यावर धावा करणे सोपे गेल्याचे मुशीरने अखेरीस सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in