नवी दिल्ली : प्रमुख शहरांच्या माघारीमुळे चर्चेत राहिलेली २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आता स्कॉटलंडची राजधानी ग्लोसगो येथे आयोजित केल्या जातील. या स्पर्धा कमी खेळांच्या (स्केल डाऊन) ओळखल्या जातील.
या स्पर्धा सुरुवातीला ऑस्ट्रेलियात व्हिक्टोरियात होणार होत्या. मात्र, आयोजनाच्या प्रस्तावित खर्चात प्रचंड वाढ झाल्याचे लक्षात आल्यावर व्हिक्टोरियाने जुलै २०२३ मध्ये आयोजनातून माघार घेतली होती. यानंतर या स्पर्धेच्या योग्यते आणि दर्जाविषयी शंका घेतल्या जाऊ लागल्या. राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने ऐनवेळी घेण्यात आलेल्या निर्णयामुळे व्हिक्टोरियाकडे २५६ दशलक्ष डॉलर इतकी नुकसानभरपाई मागितली होती.
या निर्णयानंतर स्पर्धेच्या आयोजनावरच टांगती तलवार आली होती. अखेर ऑस्ट्रेलियन पदाधिकाऱ्यांना स्पर्धेची विश्वासार्हता आणि महत्त्व टिकविण्यासाठी ग्लासगोच्या अंतिम प्रस्तावास मान्यता देऊन आयोजनात गुंतवणुकीत मोठा वाटा उचलण्याचे वचन दिले.
यानंतरही स्पर्धा आयोजनाविषयी सुरू असलेल्या चर्चेत ग्लासगो येथील स्पर्धा या ‘स्केल डाऊन’ प्रकारातील म्हणजेच कमी खेळाच्या असतील असे मानले जात आहे. अखेरच्या २०२२ बर्मिंगहॅम येथील स्पर्धेत २० खेळांचा समावेश होता. ग्लासगोत मात्र या वेळी दहा ते तेराच क्रीडा प्रकार असण्याची शक्यता आहे. ग्लासगोने आयोजनासाठी दाखवलेल्या धाडसामुळे राष्ट्रकुल स्पर्धेच्या चळवळीमधील हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे म्हणणे आहे.
भारतानेसुद्धा प्रथम या स्पर्धेच्या आयोजनासाठी उत्साह दर्शवला होता. आता भारत २०३०चे युवा ऑलिम्पिक आणि २०३६च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी दावेदारी सादर करणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल.