नवी दिल्ली : २०२७मध्ये रंगणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत १० ऐवजी १४ संघांचा समावेश करण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांत संयुक्तपणे आयोजित करणाऱ्या येणाऱ्या या स्पर्धेत साखळी फेरीनंतर सुपर-सिक्स फेरीही असणार आहे.
२०२३मध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात १० संघांचा समावेश होता. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारताला अंतिम फेरीत नमवून सहाव्यांदा विश्वचषक उंचावला. २०१९मध्येसुद्धा १० संघ विश्वचषकात होते. २०१५मध्ये मात्र १४ संघ होते. आता २०२७च्या विश्वचषकाचे प्रारूप हे २००३च्या विश्वचषकाप्रमाणे असेल. यामध्ये १४ संघांना दोन गटांत विभागण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक गटातील आघाडीचे ३ संघ सुपर-सिक्ससाठी पात्र ठरतील. मग सुपर-सिक्स फेरीत प्रत्येक संघ अन्य गटातून आलेल्या ३ संघांशी मुकाबला करेल. यांपैकी महत्त्वाचे म्हणजे साखळी फेरीतील गुण सुपर-सिक्स फेरीतही गणले जाणार आहेत. उदाहरणार्थ भारताने ब-गटातून अग्रस्थान मिळवत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांच्यासह आगेकूच केली. तर सुपर-सिक्स फेरीत त्यांना पुन्हा या दोन संघांविरुद्ध खेळावे लागणार नाही.
सुपर-सिक्स फेरीतील मग आघाडीचे चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. येथे पहिल्या क्रमांकावरील संघाची चौथ्या संघाशी, तर दुसऱ्या क्रमांकावरील तिसऱ्या संघांशी गाठ पडेल. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या काळात हा विश्वचषक आयोजित करण्यात येणार असून २००३नंतर प्रथमच आफ्रिकेत एकदिवसीय विश्वचषक रंगणार आहे. नामिबिया देश प्रथमच एका आयसीसी स्पर्धेचे यजमानपद भूषवणार असला तरी त्यांना स्पर्धेत प्रवेश मिळणार नाही. नामिबियाकडे आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व नसल्याने त्यांना ब-श्रेणीतील संघांसह पात्रता फेरी खेळावी लागणार आहे.
१४ संघ कसे ठरणार?
२०२३च्या विश्वचषकात अव्वल ८ क्रमांकात राहिलेले संघ विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत, तर आफ्रिका व झिम्बाब्वेसुद्धा यजमानपदामुळे थेट पात्र ठरले आहेत.
श्रीलंका, नेदरलँड्स, वेस्ट इंडिज, नामिबिया, आयर्लंड, ओमान, स्कॉटलंड, अमेरिका या आठ संघांसह आणखी ८ संघांमध्ये पुढील ३ वर्षे पात्रता फेरीच्या अंतर्गत विविध मालिका खेळवण्यात येतील. त्यांना त्यानुसार गुणही देण्यात येतील. त्याद्वारे उर्वरित ४ ते ५ संघांचा फैसला होईल. डिसेंबर २०२६पर्यंत एकदिवसीय विश्वचषकातील १४ संघ ठरतील, असे अपेक्षित आहे.