ठाणे : रविवार, १८ ऑगस्ट रोजी एनएससीआय डोम, वरळी येथे रंगणाऱ्या प्रो गोविंदा स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वातील विजेत्याला २५ लाखांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.
गेल्या वर्षीपासून दहीहंडीचा एक आगळा-वेगळा कार्यक्रम प्रो गोविंदाच्या रुपात आमदार प्रताप सरनाईक व प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. मागील वर्षी प्रो गोविंदा स्पर्धेला फार मोठा प्रतिसाद मिळाला होता. यंदा प्राथमिक फेरीत ३२ संघांनी सहभाग नोंदवला. त्यातील १६ संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत बक्षीसाची रक्कमही वाढवण्यात आली आहे.
प्रथम क्रमांक मिळवणाऱ्यास २५ लाख, दुसऱ्या क्रमांकास १५ लाख, तिसऱ्या स्थानावरील संघास १० लाख, तर चौथ्या क्रमांकावरील चमूस ५ लाख रुपये देऊन गौरवण्यात येईल. उर्वरित १२ संघांनाही प्रत्येकी १ लाख रुपये दिले जाणार आहेत, अशी माहिती उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रो गोविंदा स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. पुढील काळात या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय स्वरुप प्राप्त होईल, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब क्रीडाप्रेमी असल्याने त्यांनी गोविंदांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या. त्यामध्ये गोविंदांच्या विम्याची मागणी होती. त्यासाठी राज्य शासनाने ५६ लाख रुपये भरले आहेत. या विम्याचा १ लाख गोविंदांना फायदा होणार आहे, असेही सामंत यांनी सांगितले. दहीहंडी हा पारंपारिक खेळ असून त्याचा क्रीडा प्रकारात समावेश करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल.
या स्पर्धेसाठी गोविंदा पथक गेल्या वर्षभरापासून मेहनत घेत असल्याने अवघ्या राज्याचे प्रो गोविंदाच्या दुसऱ्या पर्वाकडे लक्ष लागून आहे.
"दहीहंडी हा उत्साहाचा व अभिमानाचा क्षण आहे. २७ ऑगस्टला राज्यभरात हा सण साजरा होईल. मात्र दहीहंडीचे क्रीडा प्रकारात रुपांतर व्हावे, याकरता मी गेल्या १० वर्षांपासून झटत होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्यामुळे या प्रयत्नांना यश आले. गोविंदाना इजा होऊ नये, यासाठीही आम्ही शासनाच्या सहकार्याने विशेष नियमावली राबवणार आहोत." - प्रताप सरनाईक, आमदार
या पथकांचा सहभाग
कोकण नगर (कोकण जायंट्स)
जय जवान (सातारा सिंघम)
यश गोविंदा पथक (लातूर लेजेण्ड्स)
श्री आग्रेश्वर गोविंदा पथक (नाशिक चॅलेंजर)
शिव गणेश गोविंदा (संभाजी नगर रॉयल)
हिंदू एकता गोविंदा पथक (रायगड रॉयल)
ओम ब्रह्मांड साई गोविंदा (सेंट्रल मुंबई)
ओम साई सेवा मंडळ (नवी मुंबई स्ट्राईकर)
बाल उत्सव गोविंदा (मीरा-भाईंदर योद्धा)
विघ्नहर्ता गोविंदा पथक (पुणे पँथर)
अष्टविनायक गोविंदा पथक (अमरावती ग्लाडीटर्स)
बालवीर गोविंदा पथक (कोल्हापूर किंग)
शिव साई क्रीडा मंडळ (नागपूर निन्जा)
आर्यन्स गोविंदा पथक (ठाणे टायगर)
साईराम गोविंदा पथक (बारामती ब्लास्टर)
हिंदमाता गोविंदा पथक (वेस्टर्न मुंबई)