IND vs AUS, World Cup Final: फायनलवर ३५ हजार कोटींचा सट्टा; भारताला ४५, तर ऑस्ट्रेलियाला ५७ पैसे दर

या सामन्यावर जवळपास ३५ हजार कोटींची उलाढाल होण्याची सट्टेबाजांना अपेक्षा आहे.
IND vs AUS, World Cup Final: फायनलवर ३५ हजार कोटींचा सट्टा; भारताला ४५, तर ऑस्ट्रेलियाला ५७ पैसे दर

क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी अहमदाबाद येथे होत आहे. या सामन्यातील दोन्ही संघ तगडे असल्याने सट्टाबाजारातही या दोन्ही संघांवर सट्टा लागला आहे. भारताला ४५ पैसे, तर ऑस्ट्रेलियाला ५७ पैसे इतका दर निघाला आहे. या सामन्यावर जवळपास ३५ हजार कोटींची उलाढाल होण्याची सट्टेबाजांना अपेक्षा आहे. सट्टाबाजारात नाणेफेकीपासून शेवटच्या चेंडूपर्यंत सट्टा लागलेला असतो.

मुंबई, इंदूर, दिल्ली, अहमदाबाद, कराची, दुबई आणि बँकॉकमध्ये पसरलेल्या बुकींच्या नेटवर्कद्वारे दाऊद इब्राहिम टोळी पूर्ण फॉर्ममध्ये आहे. छोटा राजन टोळीचा पाठीराखा असलेल्या विनोद चेंबूरसारख्या टॉप बुकींनी पूर्वी डी कंपनीला बेटिंग रॅकेटची मक्तेदारी करण्यापासून रोखले होते. परंतु, एप्रिल २०१५ मध्ये विनोद चेंबूर याचा यकृताच्या आजारामुळे मृत्यू झाल्यानंतर, कराचीस्थित दाऊद इब्राहिमची जवळपास सर्व बेटिंग सिंडिकेटवर मक्तेदारी आहे. कोणत्याही सिंडिकेटने विजेत्या पंटरना पैसे देण्यास नकार दिल्यास, विजेत्यांना पैसे देण्याची हमी या टोळ्या देतात. मुंबई पोलिसांनी अलीकडेच काही पंटरांना अटक केली होती. पण, दाऊदचे संरक्षण मिळवणारे मुख्य ऑपरेटर मुंबई आणि इतर शहरांतील गुप्त ठिकाणांवरून कारवाया करत आहेत.

पंचतारांकित हॉटेल पोलिसांच्या रडारखाली असल्याने ते जाणूनबुजून टाळत आहेत. मोबाईल फोनवर ऑपरेशन्स करण्यासाठी वेगळ्या फार्म हाऊसना प्राधान्य दिले जाते. एका नियमित पंटरने शुक्रवारी दै. 'नवशक्ति'ला सांगितले, ‘‘मी पूर्वीइतका तणाव आणि उत्साह कधीच पाहिला नव्हता. फायनलच्या सामन्याने बाजारात अभूतपूर्व उत्साह आहे.” दरम्यान, रविवारी अंतिम सामना पाहण्यासाठी अनेक जिमखाने आणि मोठ्या गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या सदस्यांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. उत्साह वाढवण्यासाठी त्यांनी ढोल, समोसे आणि शेकडो बिअरची व्यवस्था केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in