दिल्लीला नमवून महाराष्ट्राचा बाद फेरीत प्रवेश ; आदित्य शिंदे ठरला विजयाचा शिल्पकार; हिमाचल, राजस्थानचीही आगेकूच

दिल्लीला नमवून महाराष्ट्राचा बाद फेरीत प्रवेश ; आदित्य शिंदे ठरला विजयाचा शिल्पकार; हिमाचल, राजस्थानचीही आगेकूच

‘७०व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी’ स्पर्धेत महाराष्ट्राने साखळीत सलग दुसरा विजय मिळवित बाद फेरीतील आपला प्रवेश जवळपास निश्र्चित केला.

अहिल्यानगर : ‘७०व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी’ स्पर्धेत महाराष्ट्राने साखळीत सलग दुसरा विजय मिळवित बाद फेरीतील आपला प्रवेश जवळपास निश्र्चित केला. वाडिया पार्क क्रीडा संकुलात मॅटवर सुरू असलेल्या या स्पर्धेत हिमाचल प्रदेश, राजस्थान या संघांनीही आगेकूच केली.

महाराष्ट्राने ब-गटातील शेवटच्या साखळी सामन्यात दिल्लीचा प्रतिकार ४३-३० असा मोडून काढला. क्षणाक्षणाला काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या सामन्यात अखेर महाराष्ट्राने बाजी मारली. सुरवातीला गुण घेत दिल्लीने आपला इरादा स्पष्ट केला. पण महाराष्ट्राने त्याला प्रतिउत्तर देत १४व्या मिनिटाला पहिला लोण देत १४-०९ अशी आघाडी घेतली. पहिल्या सत्रात २३-१२ अशी महाराष्ट्राकडे आघाडी होती. दुसऱ्या सत्रात पहिल्याच चढाईत दिल्लीच्या खेळाडूची पकड करीत आपली आघाडी २६-१३ अशी वाढविली.

यानंतर दिल्लीने आपले आक्रमण आणखी धारदार करीत महाराष्ट्रावर पहिला लोण देत ही आघाडी २४-२८अशी कमी केली. शेवटी दिल्लीने आणखी काही गुण घेत ही आघाडी २ गुणांवर आणली. त्यावेळी महाराष्ट्राचे ३ खेळाडू मैदानात शिल्लक होते. अशावेळी आदित्य शिंदेने अव्वल पकड करीत महाराष्ट्राच्या आशा पुन्हा वाढविल्या. शेवटी सौरभ राऊतने दिल्लीचे शिलकी ३ गडी टिपत दिल्लीवर लोण दिला आणि पंचानी सामना संपल्याची शिट्टी वाजविली. महाराष्ट्राकडून आदित्य, आकाश शिंदे, संकेत सावंत, हर्ष लाड यांनी विजयात महत्त्वाचा खेळ केला. दिल्लीकडून सुरिंदर, विनीत माळी, गौरव यांनी शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीची लढत दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in