दीडशतक पृथ्वीचे, वर्चस्व मुंबईचे; रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा

दीडशतक पृथ्वीचे, वर्चस्व मुंबईचे; रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा

भूपेननेसुद्धा १० चौकारांसह हंगामातील पहिले शतक झळकावले. या दोघांनी २४४ धावांची सलामी नोंदवली.

रायपूर : अखेर पृथ्वी शॉने (१८५ चेंडूंत १५९ धावा) पुनरागमनातील दुसऱ्या लढतीत शानदार दीडशतक साकारले. त्याला भूपेन लालवाणीच्या (२३८ चेंडूंत १०२ धावा) शतकाची उत्तम साथ लाभली. त्यामुळे मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यात पहिल्या दिवसअखेर ८६ षटकांत ४ बाद ३१० धावांपर्यंत मजल मारली.

शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर सुरू असलेल्या ब-गटातील या लढतीच्या पहिल्या दिवसअखेर सूर्यांश शेडगे १७, तर हार्दिक तामोरे १ धावेवर खेळत आहे. २४ वर्षीय पृथ्वी गुडघ्यावरील शस्त्रक्रिया तसेच विविध कारणांमुळे गेली जवळपास सहा महिने क्रिकेटपासून दूर होता. बंगालविरुद्धच्या गेल्या सामन्याद्वारे त्याने रणजी स्पर्धेत पुनरागमन केले. मात्र शुक्रवारी त्याने १८ चौकार व ३ षटकारांसह शतक साकारून खऱ्या अर्थाने पुनरागमन केल्याची घोषणा केली. पृथ्वीचे हे प्रथम श्रेणी कारकीर्दीतील १३वे शतक ठरले. भूपेननेसुद्धा १० चौकारांसह हंगामातील पहिले शतक झळकावले. या दोघांनी २४४ धावांची सलामी नोंदवली.

पृथ्वी बाद झाल्यावर कर्णधार अजिंक्य रहाणे (१), अमोघ भटकल (१६) यांनी निराशा केली. मग दिवसाच्या अखेरीस भूपेनही बाद झाला. त्यानंतर सूर्यांश व हार्दिक यांनी उर्वरित षटके खेळून काढली. ५ सामन्यांतील ४ विजयांच्या २७ गुणांसह मुंबई गटात अग्रस्थानावर आहे. शिवम दुबेला या लढतीसाठी विश्रांती दिली गेली आहे.

logo
marathi.freepressjournal.in