
कॅनबेरा : जवळपास ४ वर्षांपूर्वी ॲडलेड येथील ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच गुलाबी चेंडूने खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यात भारताचा संघ ३६ धावांत गारद झाला होता. त्या पराभवाच्या आठवणी काही चाहत्यांच्या मनात आजही कायम आहेत. त्यामुळे आता आगामी दुसऱ्या कसोटीपूर्वी गुलाबी चेंडूने पुरेसा सराव करण्याची संधी भारतीय खेळाडूंना मिळणार आहे.
कॅनबेरा येथील मनुका ओव्हल येथे भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान एकादश संघात शनिवारपासून गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात (डे-नाईट) दोन दिवसीय सराव सामना खेळवण्यात येणार आहे. कर्णधार रोहित शर्मासह शुभमन गिल व भारताचे अन्य प्रमुख खेळाडूही या लढतीत सहभागी होणार आहे. भारतीय संघ एका दिवशी फलंदाजी, तर एका दिवशी गोलंदाजीचा सराव करणार आहे. मात्र या लढतीवर पावसाचे सावट आहे. शुक्रवारी भारताचे सराव सत्रही पावसामुळे लवकर संपवण्यात आले.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी खेळवण्यात येणाऱ्या या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताने जसप्रीत बुमराच्या नेतृत्वाखाली २९५ धावांनी दमदार विजय मिळवला. ६ डिसेंबरपासून ॲडलेड येथे दुसरी कसोटी प्रकाशझोतात म्हणजेच डे-नाईट स्वरूपात गुलाबी चेंडूने खेळवण्यात येईल. त्यामुळेच त्यापूर्वी दोन दिवसीय सराव लढत भारतासाठी मोलाची ठरेल.
या सराव लढतीत ऑस्ट्रेलिया एकादशचे नेतृत्व जॅक एडवर्ड्स करणार आहे. तसेच वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंडही या संघाचा भाग आहे. त्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या मुख्य संघातील कोणीही खेळाडू नाही. भारताचे मात्र सर्वच खेळाडू या सराव लढतीत खेळतील, असे अपेक्षित आहे. डिसेंबर २०२०मध्ये ॲडलेडच्या डे-नाईट कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताला ३६ धावांत गुंडाळले होते. त्यामुळे यावेळी भारताचे खेळाडू ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज देतील, अशी चाहत्यांना आशा आहे.
४ भारतीय संघ आतापर्यंत ४ डे-नाईट कसोटी सामने खेळला आहे. त्यापैकी २०१९ वि. बांगलादेश, २०२१ वि. इंग्लंड व २०२२ वि. श्रीलंका या तीन लढती भारताने मायदेशात सहज जिंकल्या. मात्र २०२०मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दारुण पराभव पत्करला.
११ ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत १२ डे-नाईट कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांनी तब्बल ११ लढती जिंकल्या आहेत. फक्त जानेवारी २०२४मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या लढतीत कांगारूंना पराभव पत्करावा लागला.
सराव सामन्याची वेळ : सकाळी ९.१० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि हॉटस्टार ॲप