लंडन : ल्यूटन संघाचा कर्णधार टॉम लॉकयरला यावर्षी दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका आल्याने तो मैदानात कोसळला. यामुळे प्रीमियर लीग फुटबॉलमधील ल्यूटन-बोर्नमाऊथ यांच्यातील सामना रद्द करावा लागला. लॉकयरला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले, आता त्याची स्थिती स्थिर आहे. त्याचे कुटूंब त्याच्यासोबत आहे, असे त्याच्या संघाकडून सांगण्यात आले.
वेल्सचा हा बचावपटू सामन्याच्या ५९व्या मिनिटाला मैदानावर कोसळला. यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू त्याच्याजवळ पोहोचले. ल्यूटनचे प्रशिक्षक रॉब एडर्वड्स लगेच मैदानात आले. लॉकयरला मैदानात उपचार देण्यात आले व नंतर स्ट्रेचरच्या सहाय्याने त्याला बाहेर नेण्यात आले. त्यावेळी त्याच्या स्थितीमध्ये सुधारणा झाली होती. त्यावेळी सामना १-१ असा बरोबरीत होता आणि पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. सामना रद्द केल्यानंतरही चाहते स्टेडियममध्ये उपस्थित होते. लॉकयर यापूर्वी मे महिन्या वेम्बले स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यादरम्यानही खाली कोसळला होता. त्याच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली व नंतर त्याला खेळण्याची परवानगी मिळाली होती.