महिला क्रिकेटच्या भरारीचा नवा अध्याय; नवी मुंबईत आजपासून रंगणार WPLचे चौथे पर्व; सलामीला गतविजेत्या मुंबईची बंगळुरूशी गाठ

वुमेन्स प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएलच्या (महिलांची आयपीएल) चौथ्या हंगामाला शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत गतविजेत्या मुंबई इंडियन्सची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी गाठ पडणार आहे.
महिला क्रिकेटच्या भरारीचा नवा अध्याय; नवी मुंबईत आजपासून रंगणार WPLचे चौथे पर्व; सलामीला गतविजेत्या मुंबईची बंगळुरूशी गाठ
Published on

नवी मुंबई : दोन महिन्यांपूर्वी नवी मुंबईतील ज्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर ऐतिहासिक विश्वविजेतेपद पटकावले, तेथेच शुक्रवारपासून महिला क्रिकेटच्या भरारीचा नवा अध्याय सुरू होणार आहे. वुमेन्स प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएलच्या (महिलांची आयपीएल) चौथ्या हंगामाला शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत गतविजेत्या मुंबई इंडियन्सची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी गाठ पडणार आहे. प्रामुख्याने दोन वेळच्या विजेत्या मुंबईला रोखण्याचेच आव्हान यावेळी अन्य संघांसमोर असेल.

यंदा ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या काळात चाहत्यांना डब्ल्यूपीएलचा थरार अनुभवायला मिळणार आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमसह बडोदा येथील कोटांबी स्टेडियमवर यंदा दोन टप्प्यांत डब्ल्यूपीएलचे आयोजन करण्यात येणार आहे. ९ ते १७ जानेवारी दरम्यानचे ११ सामने नवी मुंबई येथे, तर १९ जानेवारी ते ५ फेब्रुवारीपर्यंतच्या उर्वरित ११ लढती बडोदा येथे होतील. जून-जुलै महिन्यात महिलांची टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्या दृष्टीने ही डब्ल्यूपीएल निर्णायक ठरेल.

२ नोव्हेंबर, २०२५ रोजी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने विश्वचषक उंचावला. त्यांनी अनुक्रमे ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका या बलाढ्य संघांना उपांत्य व अंतिम सामन्यात धूळ चारली. या ऐतिहासिक यशानंतर महिला क्रिकेटचे रूप पालटले असून चोहीकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. हरमनप्रीतच्या संघाने केलेल्या कामगिरीमुळे असंख्य महिलांना प्रेरणा मिळाली आहे. आता डब्ल्यूपीएलमध्ये युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची आणखी एक संधी मिळेल.

आतापर्यंत महिलांच्या आयपीएलचे तीन हंगाम झाले असून त्यापैकी २०२३ व २०२५मध्ये हरमनप्रीतच्या नेतृत्वात मुंबईने, तर २०२४मध्ये स्मृती मानधनाच्या नेतृत्वात बंगळुरूने विजेतेपद पटकावले होते. यापूर्वी दोन हंगामांमध्ये मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर अंतिम सामना झाला, तर एकदा नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर महाअंतिम लढत रंगली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, बंगळुरू, यूपी, गुजरात व दिल्ली या पाच संघांचा स्पर्धेत समावेश असेल.

मुंबई, बंगळुरू व गुजरात (ॲश्लेघ गार्डनर) संघांचे कर्णधार कायम असले, तरी दिल्ली, यूपी या संघांचे कर्णधार बदलले आहेत. यंदा यूपीचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग करणार आहे, तर दिल्लीचे कर्णधारपद मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्ज भूषवणार आहे. तसेच एलिस पेरी, ॲनाबेल सदरलँड या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी वैयक्तिक कारणास्तव यावेळी स्पर्धेतून माघार घेतली आहे. दिल्लीने लेगस्पिनर एलाना किंग, तर बंगळुरूने मुंबईची वेगवान गोलंदाज सायली सतघरेला संघात घेतले आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या लिलावात भारताच्या दीप्ती शर्मावर यूपीने सर्वाधिक ३.२० कोटींची बोली लावली. एलिसा हीलीला यावेळी कुणीही खरेदी केले नाही.

पहिल्या लढतीचा विचार करता मुंबईकडे हरमनप्रीत, नॅट शीव्हर ब्रंट, अमेलिया कर, शबनिम इस्माइल असे एकापेक्षा एक उत्तम खेळाडू आहेत. बंगळुरूकडेही स्मृतीसह रिचा घोष, लॉरेन बेल, नडिन डी क्लर्क असे चांगले खेळाडू आहेत. त्यामुळे स्पर्धेची सुरुवात दमदार लढतीने होईल. दव निर्णायक ठरत असल्याने शक्यतो धावांचा पाठलाग करण्यालाच संघांचे प्राधान्य असेल.

तिकिटांचे दर वाढले

डब्ल्यूपीएलच्या चौथ्या हंगामासाठी तिकिटांचा दर वाढले आहेत. पहिल्या हंगामात महिलांना डब्ल्यूपीएलसाठी मोफत प्रवेश देण्यात आला होता, तर पुरुषांसाठी १०० रुपयांचे एक तिकीट होते. मात्र आता सर्वांना प्रत्येकी ५०० रुपयांपासून तिकीट सुरू होण्याची दाट शक्यता आहे. २ ते ३ हजारांपर्यंत तिकिटांचा दर वाढणार आहे. महिला क्रिकेटला चाहत्यांचा लाभणारा वाढता प्रतिसाद व विश्वचषकामुळे मिळालेल्या ग्लॅमरचा हा प्रभाव असल्याचे समजते. डबल हेडरच्या दिवशी दुपारपासूनच चाहते गर्दी करण्याची शक्यता आहे. तसेच नवी मुंबईतील स्टेडियममध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत मोफत पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

स्पर्धेचे स्वरूप कसे?

गतवर्षीप्रमाणे यंदाही पाच संघ स्पर्धेत असून प्रत्येक संघ एकूण ८ साखळी सामने खेळणार आहे. सर्व संघांविरुद्ध प्रत्येकी दोनदा लढती होतील. या स्पर्धेत एकूण २२ सामने खेळवण्यात येतील.

साखळी फेरीअखेरीस अग्रस्थानावरील संघ थेट अंतिम फेरी गाठेल, तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावरील संघात एलिमिनेटर लढत होईल. चौथ्या व पाचव्या क्रमांकावरील संघ साखळीतच गारद होईल. भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० आणि सायंकाळी ७.३० वाजता सामने सुरू होणार असून स्टार स्पोर्ट्स वाहिनी आणि जिओहॉटस्टार ॲपवर चाहत्यांना लढतींचे थेट प्रक्षेपण पाहता येईल.

मुंबईच्या प्रशिक्षक फळीत सर्व महिलाच

डब्ल्यूपीएलमध्ये प्रथमच एखाद्या संघाच्या ताफ्यात महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षकपद ऑस्ट्रेलियाच्या लिसा काइटली भूषवत आहेत. भारताची माजी क्रिकेटपटू झुलन गेल्या तीन हंगामांपासून या संघाची गोलंदाजी प्रशिक्षक आहे. यंदा तिच्याकडे मार्गदर्शकाची सूत्रेसुद्धा सोपवण्यात आली आहेत. देविका पळशीकर फलंदाजी प्रशिक्षक आहेत. निकोल बोल्टन क्षेत्ररक्षणात, तर कर्स्टन बीम्स फिरकी विभागात मुंबईला मार्गदर्शन करतील.

यंदाच्या हंगामात हे प्रथमच

यंदा स्पर्धेत प्रथमच दोन शनिवारी प्रत्येकी दोन लढतींचे आयोजन करण्यात येईल. १० जानेवारीला यूपी-गुजरात, मुंबई-दिल्ली नवी मुंबईत खेळतील. त्यानंतर १७ जानेवारीच्या शनिवारी मुंबई-यूपी, दिल्ली-बंगळुरू यांच्यात लढती होतील. स्पर्धेच्या इतिहासात आजवर कधीच शनिवार अथवा रविवारी दोन-दोन सामने झाले नव्हते. दुपारचे सामने ३.३० वाजता, तर सायंकाळचे सामने ७.३० वाजता सुरू होतील.

यावेळी प्रथमच स्पर्धेचा अंतिम सामना शनिवार किंवा रविवारी न होता गुरुवारी खेळवण्यात येईल. तसेच प्रथमच स्पर्धा फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात संपणार आहे. यापूर्वी तीन हंगाम फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होऊन मार्चच्या १५ तारखेपर्यंत लांबायचे. मात्र भारतात होणारा पुरुषांचा टी-२० विश्वचषक, आयपीएल या स्पर्धांमुळे यंदा डब्ल्यूपीएल जानेवारीत सुरू होत आहे.

भारतीय पुरुषांचा ज्या दिवशी न्यूझीलंडशी टी-२० सामना असेल, तेव्हा डब्ल्यूपीएलमध्ये विश्रांतीचा दिवस ठेवण्याची काळजीही आयोजकांनी घेतली आहे. जेणेकरून चाहत्यांना महिलांच्या सामन्यांचाही मनमुराद आनंद लुटता येईल.

असे आहेत पाच संघ

मुंबई इंडियन्स : हरमनप्रीत कौर (कर्णधार), नॅट शीव्हर ब्रंट, अमेलिया कर, हायली मॅथ्यूज, अमनजोत कौर, सजीवन सजना, शबनिम इस्माइल, गुनालन कमलिनी, साईका इशाक, निकोला कॅरी, त्रिवेणी वशिष्ठ, संस्कृती गुप्ता, नल्ला रेड्डी, मिली इलिंगवर्थ, पूनम खेमनार, राहिला फिरदोस.

दिल्ली कॅपिटल्स : जेमिमा रॉड्रिग्ज (कर्णधार), शफाली वर्मा, मॅरीझेन काप, श्री चरिणी, चिनेल हेन्री, लॉरा वोल्वर्ड, निकी प्रसाद, स्नेह राणा, मिन्नू मणी, तानिया भाटिया, लिझेल ली, नंदिनी शर्मा, दीया यादव, लुसी हॅमिल्टन, ममता मडिवाला, एलाना किंग.

गुजरात जायंट्स : ॲश्लेघ गार्डनर (कर्णधार), बेथ मूनी, सोफी डिवाईन, जॉर्जिया वेरहॅम, भारती फुलमाली, काशवी गौतम, रेणुका सिंग, यास्तिका भाटिया, किम गार्थ, डॅनिएल व्हॅट, अनुष्का शर्मा, तनुजा कन्वर, राजेश्वरी गायकवाड, कनिका अहुजा, तिथास साधू, आयुषी सोनी, हॅप्पी कुमारी, शिवानी सिंग.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : स्मृती मानधना (कर्णधार), रिचा घोष, लॉरेन बेल, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, ग्रेस हारिस, राधा यादव, नडिन डी क्लर्क, श्रेयांका पाटील, जॉर्जिया वॉल, दयालन हेमलता, लिन्सी स्मिथ, प्रेमा रावत, गौतमी नाईक, कुमार प्रत्युषा, सायली सतघरे.

यूपी वॉरियर्स : मेग लॅनिंग (कर्णधार), दीप्ती शर्मा, शिखा पांडे, फोबे लिचफील्ड, आशा शोबना, सोफी एक्केलस्टोन, दिएंड्रा डॉटिन, किरण नवगिरे, क्रांती गौड, प्रतीका रावल, श्वेता सेहरावत, हरलीन देओल, क्लो ट्रायन, शिप्रा गिरी, सिमरन शेख, त्रिशा घोंगडी, सुमन मीना, चार्ली नॉट.

logo
marathi.freepressjournal.in