लखनऊ : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शुक्रवारी रंगणाऱ्या लढतीत के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स संघाला विजयी चौकार लगावण्याची संधी आहे. त्यामुळे घरच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना ते ही कामगिरी करणार का, हे पाहणे रंजक ठरेल. दुसरीकडे दिल्लीचा संघ मात्र पराभवाची हॅट्ट्रिक टाळण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.
गेल्या तीन हंगामांपासून आयपीएलचा भाग असलेल्या लखनऊने २०२२ व २०२३मध्ये बाद फेरी गाठली. मात्र दोन्ही वेळेस त्यांना एलिमिनेटरमध्ये पराभव पत्करावा लागला. यंदा राजस्थानकडून सलामीच्या लढतीत पराभव पत्करल्यानंतर मात्र लखनऊने चांगली लय मिळवली आहे. त्यांनी पंजाब, बंगळुरू आणि गुजरात या संघांना धूळ चारून गुणतालिकेत तिसरे स्थान टिकवले आहे. त्यामुळे त्यांचे पारडे निश्चितच जड मानले जात आहे.
ऋषभ पंतच्या दिल्लीला मात्र ५ पैकी फक्त एकच लढत जिंकता आली आहे. त्यामुळे दिल्लीचा संघ गुणतालिकेत तळाच्या १०व्या स्थानी आहे. दिल्लीला २०२१नंतर दोन हंगामांत बाद फेरी गाठता आलेली नाही. त्याशिवाय ते प्रतिस्पर्धीच्या मैदानातही अपयशी ठरत आहे. आता लखनऊच्या खेळपट्टीवर १६० ते १७० धावा करणेही आव्हानात्मक ठरत असल्याने दिल्लीच्या फलंदाजांचा कस लागणार आहे. मिचेल मार्श व कुलदीप यादव यांच्या दुखापतींचा दिल्लीला फटका बसला आहे.
फलंदाजी लखनऊची ताकद
राहुलसह क्विंटन डीकॉक, निकोलस पूरन, मार्कस स्टोइनिस असे धडाकेबाज फलंदाज लखनऊच्या ताफ्यात आहेत. विशेषत: पूरनने जवळपास प्रत्येक लढतीत १५०हून अधिकच्या स्ट्राइक रेटने फटकेबाजी केली आहे, तर डीकॉकने आतापर्यंत दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्याशिवाय कृणाल पंड्या व आयुष बदोनीसुद्धा गरजेप्रमाणे फलंदाजी करू शकतात. त्यामुळे लखनऊची फलंदाजी घातक वाटत आहे. १५६ किमी वेगाने गोलंदाजी करणारा मयांक यादव या लढतीसाठी अनुपलब्ध असला तरी यश ठाकूर, नवीन उल हक यांची वेगवान जोडी व लेगस्पिनर रवी बिश्नोई लखनऊसाठी सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. डावखुरा फिरकीपटू मनिमरन सिद्धार्थ लखनऊच्या खेळपट्टीवर प्रभावी ठरू शकतो.
दिल्लीला गोलंदाजांची चिंता
दिल्लीच्या गोलंदाजांनी सलग दोन सामन्यांत अनुक्रमे २७२ आणि २३४ अशा धावा लुटल्या आहेत. त्यामुळे त्यांना गोलंदाजी क्रमात मोठे बदल करावे लागू शकतात. आनरिख नॉर्किएचे अपयश दिल्लीला महागात पडत आहे. त्याशिवाय कुलदीपच्या अनुपस्थितीत अक्षर पटेलही फारसा छाप पाडू शकलेला नाही. खलिल अहमद व इशांत शर्मा पॉवरप्लेमध्ये प्रभावी ठरत असले, तरी अखेरच्या षटकांत त्यांची धुलाई करण्यात येत आहे. त्यामुळे फलंदाजीवर अतिरिक्त दडपण येत आहे. पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर व पंत यांच्यावर दिल्लीची फलंदाजी अवलंबून आहे. ट्रिस्टन स्टब्सही लयीत असून अभिषेक पोरेलच्या रूपात दिल्लीला चांगला खेळाडू गवसला आहे. मार्शच्या तंदुरुस्तीबाबत संभ्रम असल्याने दिल्ली फलंदाजी क्रमात बदल करू शकते. दिल्लीला बाद फेरीचा विचार करता सर्व सामने यापुढे महत्त्वाचे असतील.