जेमिमाच्या शतकामुळे विजयी आघाडी; दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिलांचे आयर्लंडवर ११६ धावांनी वर्चस्व

मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जने रविवारी अखेर सात वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत प्रथमच शतक झळकावताना ९१ चेंडूंत १०२ धावा केल्या. तिच्या शतकाला गोलंदाजांच्या कामगिरीची उत्तम साथ लाभली.
जेमिमाच्या शतकामुळे विजयी आघाडी; दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिलांचे आयर्लंडवर ११६ धावांनी वर्चस्व
एक्स @BCCIWomen
Published on

राजकोट : मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जने रविवारी अखेर सात वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत प्रथमच शतक झळकावताना ९१ चेंडूंत १०२ धावा केल्या. तिच्या शतकाला गोलंदाजांच्या कामगिरीची उत्तम साथ लाभली. त्यामुळे भारतीय महिला संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडला ११६ धावांनी धूळ चारली. याबरोबरच भारताने ३ लढतींच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. भारताने या सामन्यात एकदिवसीय प्रकारातील विक्रमी धावसंख्या नोंदवली.

राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या लढतीत भारताने उभारलेल्या ३७१ धावांच्या डोंगराइतक्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ ५० षटकांत ७ बाद २५४ धावांपर्यंतच मजल मारू शकला. ख्रिस्टिना कुल्टरने ८० धावांची एकाकी झुंज दिली. भारताकडून फिरकीपटू दीप्ती शर्माने ३, तर प्रिया मिश्राने २ बळी मिळवले. २४ वर्षीय शतकवीर जेमिमा सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली. बुधवारी उभय संघांतील तिसरी लढत खेळवण्यात येईल.

हरमनप्रीत कौर आणि रेणुका सिंग या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्यामुळे महाराष्ट्राची स्मृती मानधना या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. सप्टेंबरमध्ये भारतातच होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने संघबांधणी करण्यासह युवा खेळाडूंना संधी देण्याचे भारताचे उद्दीष्ट आहे. रविवारी झालेल्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना भारताने दणक्यात सुरुवात केली. स्मृती व प्रतिका रावल यांनी १९ षटकांतच १५६ धावांची सलामी नोंदवली.

स्मृतीने ५४ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह ७३ धावा करताना २९वे अर्धशतक साकारले. तर प्रतिकाने ६७ धावा करताना तिसरे अर्धशतक झळकावले. लागोपाठच्या चेंडूवर या दोघीही बाद झाल्या. २ बाद १५६ धावांवरून मग हरलीन देओल आणि जेमिमा यांची जोडी जमली. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी तब्बल १८३ धावांची भागीदारी रचली. हरलीनने ८९ धावा तडकावताना १२ चौकारांसह दुसरे अर्धशतक पूर्ण केले. तिलाही शतकाने हुलकावणी दिली. जेमिमाने मात्र १२ चौकारांसह ९० चेंडूंतच पहिले एकदिवसीय शतक साकारले. तसेच एकदिवसीय कारकीर्दीतील १,००० धावांचा टप्पा गाठला. अखेरच्या षटकात जेमिमा बाद झाली. रिचा घोष (१०) व तेजल हसबनीस (नाबाद २) यांनी मग भारताला ५० षटकांत ५ बाद ३७० धावांपर्यंत नेले.

लक्ष्याचा पाठलाग करताना ख्रिस्टिना, सारा फोर्ब्स (३८), लॉरा डेलानी (३७) यांनी आयर्लंडकडून कडवी झुंज दिली. मात्र तिथास साथूने ख्रिस्टिनाचा, तर मुंबईकर सायली सातघरेने कर्णधार गॅबी लेविसचा (१२) अडसर दूर करून भारताचा विजय जवळपास पक्का केला. त्यांना फिरकीपटूंनी साथ दिली. त्यामुळे आयर्लंडने ५० षटकांत जेमतेम २५० धावांपर्यंत मजल मारली.

संक्षिप्त धावफलक

भारत : ५० षटकांत ५ बाद ३७० (जेमिमा रॉड्रिग्ज १०२, हरलीन देओल ८९; अर्लिन केली २/८२) विजयी वि. g आयर्लंड : ५० षटकांत ७ बाद २५४ (ख्रिस्टिना कुल्टन ८०, सारा फोर्ब्स ३८; दीप्ती शर्मा ३/३७)

सामनावीर : जेमिमा रॉड्रिग्ज

भारतीय महिलांनी ५ बाद ३७० धावांचा डोंगर उभारून एकदिवसीय प्रकारातील सर्वोत्तम सांघिक धावसंख्या नोंदवली. आयर्लंडविरुद्ध २०१७मध्ये त्यांनी २ बाद ३५८ धावा केल्या होत्या.

जेमिमाने (९० चेंडू) भारतीय महिला संघासाठी संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकाचे जलद शतक साकारले. हरमनप्रीतने २०१७मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९० चेंडूंतच शतक केले होते. हरमनप्रीतच या यादीत ८७ चेंडूंतील (वि. दक्षिण आफ्रिका, २०२४) शतकासह अग्रस्थानी आहे.

logo
marathi.freepressjournal.in