Abhinav Bindra : 'ऑलिम्पिक मेडल जिंकणं हे वेंड‍िंग मशीनमधून....' विनेश फोगाट अपात्र प्रकरणाबाबत काय म्हणाले अभिनव बिंद्रा?

अभिनव बिंद्रा यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या परफॉर्मन्सबाबत माध्यमांशी संवाद साधला.
Abhinav Bindra With Vinesh Phogat
अभिनव बिंद्रा आणि विनेश फोगाट
Published on

मुंबई : रविवार ११ ऑगस्ट रोजी ऑलिम्पिकचा समारोप होणार आहे. भारताने यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत एकूण ६ पदकांची कमाई केली असून यात एक रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताला यंदा अनेक खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा होती परंतु खेळाडू पदक पटकावण्यात अयशस्वी ठरले. तर महिला कुस्तीच्या ५० किलो वजनी गटात हातातोंडाशी आलेलं पदक विनेश फोगाटला अपात्र ठरवल्यामुळे मिळू शकलं नाही. यावरून बराच वाद सुद्धा पाहायला मिळत आहे. अभिनव बिंद्रा हे भारताचे असे खेळाडू आहेत ज्यांनी २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकून भारताला पहिलं वैयक्तिक गोल्ड मेडल जिंकून दिलं होतं. अभिनव बिंद्रा यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या परफॉर्मन्सबाबत माध्यमांशी संवाद साधला.

मेडल मिळवणं वेंड‍िंग मशीनमधून कॉईन काढण्या इतकं सोपं नाही :

आजतक या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अभिनव बिंद्रा म्हणाले, 'ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धेत मेडल जिंकणं हे वेंड‍िंग मशीनमधून कॉईन काढण्या इतकं सोपं नाही ती खूप अवघड गोष्ट आहे. जवळपास १० हजार स्पर्धक ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतात. यापैकी केवळ ३०० स्पर्धक असतात जे गोल्ड मेडल घेऊन जातात. अशावेळी नशिबासोबत तुमचे कष्ट देखील महत्वाचे ठरतात'. पुढे ते म्हणाले, ' पॅरिस ऑलिम्पिक संपल्यावर दोन दिवसांनी लोक याला विसरतील आणि लॉस एंज‍िल्समध्ये २०२८ रोजी होणाऱ्या ऑलिम्पिकबाबत बोलू लागतील'.

विनेश फोगाट प्रकरणी काय म्हणाले अभिनव?

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीच्या ५० किलो वजनी गटातील अंतिम फेरीत स्थान मिळवलेली भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिला ओव्हरवेटमुळे अपात्र घोषित करण्यात आले. संपूर्ण भारताला विनेशकडून पदकाची अपेक्षा होती मात्र केवळ १०० ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला अंतिम फेरीत अपात्र ठरवण्यात आलं होत. तिला रौप्य पदक देण्यात यावं याविषयी आज अंतिम निकाल सुनावला जाणार आहे. विनेश फोगाट सोबत झालेल्या अपात्रतेच्या कारवाईवर अभिनव म्हणाले, 'हे खरंच खूप कठीण आहे. अशात मी काय बोलू नियम क्लिअर आहेत. खेळ हा पूर्णपणे नियमांनुसार चालतो. परंतु माझी सहानुभूती विनेश सोबत आहे. आम्ही तिच्या सोबत आहोत. आशा आहे की काहीतरी सकारात्मकच घडेल'. विनेश अपात्र ठरल्यावर अभिनव बिंद्रा यांनी सुद्धा पोस्ट करून विनेशला धीर दिला होता.

मनू भाकरची केली प्रशंसा :

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर हिने शूटिंगच्या प्रकारात भारतासाठी दोन कांस्य पदकांची कमाई केली. अभिनव बिंद्रा यांनी मनू भाकरचे खूप कौतुक केले. अभिनव म्हणाले, 'टोकियो ऑलिम्पिकमध्ये मनू ही मेडल मिळवण्यापासून थोडक्यात चुकली होती. मात्र त्यानंतर तिने अगदी मनापासून मेहनत केली ज्याचं फळ तिला या ऑलिम्पिकमध्ये मिळालं'.

logo
marathi.freepressjournal.in