जागतिक टी-२० क्रमवारी : अभिषेक, वरुणची दुसऱ्या स्थानी झेप

भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा आणि फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांनी बुधवारी आयसीसीच्या जागतिक टी-२० क्रमवारीत अनुक्रमे फलंदाज व गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली.
जागतिक टी-२० क्रमवारी : अभिषेक, वरुणची दुसऱ्या स्थानी झेप
Published on

दुबई : भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा आणि फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांनी बुधवारी आयसीसीच्या जागतिक टी-२० क्रमवारीत अनुक्रमे फलंदाज व गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडला टी-२० मालिकेत नुकताच ४-१ अशी धूळ चारली. या मालिकेत अभिषेकने १ शतक व १ अर्धशतकासह सर्वाधिक २७९ धावा केल्या. तसेच वानखेडेवर त्याने अवघ्या ३७ चेंडूंत शतक झळकावताना भारतासाठी टी-२०तील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवली. त्यामुळे अभिषेकने तब्बल ३८ धावांची झेप घेत ४०वरून थेट दुसरा क्रमांक मिळवला आहे. अभिषेकचे आता ८२९ गुण आहेत. तिलक वर्मा व सूर्यकुमार या यादीत अनुक्रमे तिसऱ्या व पाचव्या स्थानी आहेत. ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड ८५५ गुणांसह अग्रस्थानी आहे.

गोलंदाजी विभागात वेस्ट इंडिजचा अकील होसेन ७०७ गुणांसह पहिल्या स्थानी विराजमान आहे. मात्र इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांत १४ बळी घेत मालिकावीर पुरस्कार पटकावणाऱ्या वरुणने तीन स्थानांनी आगेकूच करत प्रथमच दुसरा क्रमांक काबिज केला. वरुण व इंग्लंडचा आदिल रशिद यांचे प्रत्येकी ७०५ गुण असून दोघेही संयुक्तरिक्त दुसऱ्या स्थानी आहेत. रवी बिश्नोई सहाव्या स्थानी आहे.

कमिन्स चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकण्याची शक्यता

सिडनी: ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श पाटीच्या दुखापतीमुळे आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार आहे. ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्रयू मॅक्डोनाल्ड यांनी याविषयी माहिती दिली. तसेच कर्णधार पॅट कमिन्सही पायाच्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी असून कमिन्स या मालिकेचा भाग नाही. त्याने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली होती. मात्र कमिन्सच्या पायाला गोलंदाजी करताना वेदना होत असल्याचे समजते. त्यामुळे तो श्रीलंकेविरुद्ध १२ फेब्रुवारीपासून रंगणाऱ्या एकदिवसीय मालिकेत सहभागी होणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथच एकदिवसीय प्रकारातही नेतृत्व करू शकतो.

दक्षिण आफ्रिकेचा कोएट्झे स्पर्धेबाहेर

डर्बन: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएट्झे स्नायूंच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार आहे. दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि न्यूझीलंड या तीन संघांत ८ फेब्रुवारीपासून पाकिस्तानमध्येच तिरंगी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी बुधवारी आफ्रिकेचा संघ जाहीर करण्यात आला. मात्र आफ्रिकेत टी-२० फ्रँचायझी लीग सुरू असल्याने हेनरिच क्लासेन, मार्करम, मार्को यान्सेन, केशव महाराज असे प्रमुख खेळाडू तिरंगी मालिकेत खेळणार नाहीत. ते थेट १५ तारखेला पाकिस्तानमध्ये दाखल होतील.

logo
marathi.freepressjournal.in