अभिषेकचा शतकी झंझावात; झिम्बाब्वेवर १०० धावांनी मात, भारताची टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी; ऋतुराज, आवेश-मुकेश यांचीही छाप

ZIM vs IND, 2nd T20I: भारताचा हा टी-२० प्रकारातील झिम्बाब्वेविरुद्धचा सर्वात मोठा विजय ठरला.
अभिषेकचा शतकी झंझावात; झिम्बाब्वेवर १०० धावांनी मात, भारताची टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी; ऋतुराज, आवेश-मुकेश यांचीही छाप
Published on

हरारे : भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगकडून प्रशिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय अभिषेक शर्माने रविवारी त्याच्याच शैलीत धडाकेबाज फटकेबाजी केली. डावखुरा सलामीवीर अभिषेकने अवघ्या ४७ चेंडूंत साकारलेल्या वेगवान शतकी खेळीच्या बळावर भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेला १०० धावांनी धूळ चारली. भारताचा हा टी-२० प्रकारातील झिम्बाब्वेविरुद्धचा सर्वात मोठा विजय ठरला.

भारताने उभारलेल्या २३५ धावांच्या डोंगरापुढे झिम्बाब्वेचा संघ १८.४ षटकांत १३४ धावांत गारद झाला. या विजयासह भारताने पाच लढतींच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड (४७ चेंडूंत नाबाद ७७ धावा) आणि मुकेश कुमार व आवेश खान (प्रत्येकी ३ बळी) यांच्या वेगवान जोडीनेसुद्धा भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. उभय संघांतील तिसरा सामना बुधवारी खेळवण्यात येणार आहे.

हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या या लढतीत भारताचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात यजमानांनी भारताला पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे या लढतीत भारतीय फलंदाजांवर दडपण होते. त्यातच गिल दुसऱ्याच षटकात अवघ्या २ धावांवर माघारी परतला. मात्र पंजाबच्या अभिषेकने सुरुवातीपासूनच आक्रमण केले. पदार्पणाच्या लढतीत शून्यावर बाद झालेल्या अभिषेकने षटकाराद्वारे टी-२० कारकीर्दीची सुरुवात केली. त्याला ऋतुराजचीही उत्तम साथ लाभली.

या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी रचली. अभिषेकने ३३ चेंडूंत अर्धशतकाची वेस ओलांडली. मात्र त्यानंतर त्याने दुसऱ्या गिअरमधून थेट पाचव्या गिअरला फलंदाजी केली. ७ चौकार व ८ षटकारांची आतषबाजी करताना अभिषेकने पुढील ५० धावा अवघ्या १३ चेंडूंत फटकावून ४६व्या चेंडूवर धडाकेबाज शतक पूर्ण केले. त्याने १४ व्या षटकातील तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या चेंडूवर षटकार लगावून शतक साकारले, हे विशेष. दोन्ही हात उंचावून त्याने चाहत्यांचे अभिवादन केले. शतक झाल्यावर पुढच्याच चेंडूवर अभिषेकला वेलिंग्टन मसाकाद्झाने बाद केले.

दुसऱ्या बाजूने ऋतुराजने पाचवे टी-२० अर्धशतक साकारताना ११ चौकार व १ षटकार लगावला. चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या रिंकू सिंगनेही संधी साधून २२ चेंडूंतच २ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ४८ धावा फटकावल्या. ऋतुराज व रिंकू यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताला सव्वादोनशे धावांपलीकडे नेले.

लक्ष्याचा पाठलाग करताना आवेश व मुकेश यांच्या वेगवान माऱ्यापुढे झिम्बाब्वेची डाळ शिजली नाही. तसेच फिरकीपटू रवी बिश्नोईने धोकादायक वेस्ले मधवीरेचा ४३ धावांवर अडथळा दूर केला. कर्णधार सिकंदर रझा (४) अपयशी ठरला. त्यामुळे झिम्बाब्वेचा डाव १३४ धावांत आटोपला. वॉशिंग्टन सुंदरने एक बळी मिळवला. याबरोबरच भारताने मालिकेत बरोबरी साधली.

संक्षिप्त धावफलक

  • भारत : २० षटकांत २ बाद २३४ (अभिषेक शर्मा १००, ऋतुराज गायकवाड नाबाद ७७, रिंकू सिंग नाबाद ४८; ब्लेसिंग मुझरबानी १/३०) विजयी वि.

  • झिम्बाब्वे : १८.४ षटकांत सर्व बाद १३४ (वेस्ले मधवीरे ४३, लूक जोंगवे ३३; आवेश खान ३/१५, मुकेश कुमार ३/३७)

  • सामनावीर : अभिषेक शर्मा

  • अभिषेक हा कारकीर्दीतील दुसऱ्याच टी-२० सामन्यात शतक झळकावणारा भारताचा पहिलाच फलंदाज ठरला. तसेच सलग ३ षटकार लगावून टी-२० शतक साकारणाराही तो भारताच पहिलाच फलंदाज आहे.

  • अभिषेकने (४६ चेंडू) भारतासाठी टी-२० प्रकारातील संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकाचे वेगवान शतक झळकावले.

  • अभिषेक शर्मा: ४७ चेंडू

    ७ चौकार

    ८ षटकार

  • भारताने डावातील अखेरच्या १० षटकांत तब्बल १६१ धावा कुटल्या. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये भारताने प्रथमच अशी कामगिरी केली. नेपाळने मोंगोलियाविरुद्ध २०२३ मध्ये अखेरच्या १० षटकांत तब्बल १९२ धावा फटकावल्या होत्या.

  • भारताने झिम्बाब्वेविरुद्ध टी-२० प्रकारातील सर्वोत्तम धावसंख्या रचली. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने २०१८ मध्ये त्यांच्याविरोधात २२९ धावा केल्या होत्या.

logo
marathi.freepressjournal.in